जंगलाचे रक्षण अन्‌ उत्पन्नही

प्रमोद फरांदे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

वन विभागाचा उपक्रम - स्थानिकांना रोजगार, महिला बचत गटाला लाभ

कोल्हापूर - जिल्ह्यातील जंगलांमधील फळे, मसाले, औषधी, सुगंधी वनस्पती, मेव्याची कवडीमोल दराने विक्री होते. स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे वन विभागाने जंगलात सापडणाऱ्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग करून विकण्याचा निर्णय घेतला. वनोत्पादनांचे ‘जनवन शॉप’ नावाने मॉल उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांची ज्या रस्त्यावर वर्दळ असते, तेथे हे मॉल सुरू केले जातील.

वन विभागाचा उपक्रम - स्थानिकांना रोजगार, महिला बचत गटाला लाभ

कोल्हापूर - जिल्ह्यातील जंगलांमधील फळे, मसाले, औषधी, सुगंधी वनस्पती, मेव्याची कवडीमोल दराने विक्री होते. स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे वन विभागाने जंगलात सापडणाऱ्या उत्पादनांचे ब्रॅंडिंग करून विकण्याचा निर्णय घेतला. वनोत्पादनांचे ‘जनवन शॉप’ नावाने मॉल उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांची ज्या रस्त्यावर वर्दळ असते, तेथे हे मॉल सुरू केले जातील.

वनोत्पादने गोळा करणे, प्रक्रिया करणे त्यांची विक्री करणे हे सर्व वन समितीमार्फत स्थानिक लोक करणार असल्याने वनाचे उत्पन्नही लोकांना मिळेल. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना शाश्‍वत रोजगार मिळेल, शिवाय वनांचे संरक्षण व संवर्धनासाठी मदत होईल. जिल्ह्यातील १२ गावांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापुढे जाऊन सुमारे ४०० गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जाणार आहे. जिल्ह्यात १८.३५ टक्‍के वनक्षेत्र आहे.

आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्‍यांतील वनक्षेत्रात तमालपत्र, दालचिनी हे मसाले, औषधी, सुगंधी वनस्पती, विविध फळे, रानमेवा ही सेंद्रिय वनोत्पादने मोठ्या प्रमाणावर मिळतात. या उत्पादनांचा दरवर्षी लिलाव होतो. मजूर संस्था, अथवा व्यापारी हा लिलाव घेतात. वनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वनक्षेत्र गावांत संयुक्त वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. जिल्ह्यात ४०० समित्या आहेत. या समित्यांना अथवा गावांना या वनोत्पादनाच्या लिलावातील काहीच मोबदला दिला जात नव्हता. त्यामुळे वन संरक्षण आणि संवर्धनाचे काम काही ठिकाणी गांभीर्याने होत नव्हते.
या वनोत्पादनांचा लिलाव न करता स्थानिकांद्वारेच त्यावर प्रक्रिया करून त्यांची विक्री करण्याचा व त्याचे सर्व उत्पन्न हे संयुक्त वनव्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय जिल्हा उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला यांनी घेतला आहे.  

या उपक्रमांतर्गत वनक्षेत्र परिसरातील १२ गावे प्रायोगिक तत्त्वावर निवडली आहेत. या गावांत संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन केल्या आहेत. या समित्यांतर्गत प्रत्येक गावात महिला बचत गटही स्थापन केले. या समित्यांना वनक्षेत्रातील हद्द निश्‍चित करून दिली जात आहे. या समितीकडे हद्दीतील वनोत्पादने गोळा करण्याची जबाबदारी असेल. जमा वनोत्पादने वाळवणे, त्यांची पावडर करून पॅकिंगची जबाबदारी ही वनसमितीअंतर्गत असणाऱ्या महिला बचत गटाकडे राहणार आहे. आंबा, काजू, फणस यांची बायप्रॉडक्‍ट व बांबू उत्पादने तयार केली जाणार आहेत. त्यासाठी महिला व पुरुषांना छत्तीसगड राज्यातील धमतरी येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जंगलातील वनोत्पादनांचे मार्केटिंग हे स्थानिक लोकांची अँग्रो प्रोड्युसर कंपनी करेल तर त्याची विक्रीही स्थानिक लोकांतूनच ‘कोल्हापूर वनश्री’ या ब्रॅंडच्या नावाने होईल. मिळणारे उत्पन्न हे काम करणाऱ्या समितीच्या लोकांनाच देण्यात येईल. त्यासाठी स्थानिक लोक व वन विभाग यांच्यात करारही झाला.

उपक्रमाचे फायदे
वनोत्पादनांवर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा हक्क असणार, स्थानिकांना शाश्‍वत रोजगार मिळणार, महिलांच्या हाताला काम मिळणार, वनोउत्पादन विक्रीचा फायदा स्थानिकांनाच. जादा उत्पादनासाठी लोकांमधून वनसंरक्षण आणि संवर्धन होणार. वनाला आग लावणे, वृक्षतोड यासारखे प्रकार थांबण्यास हातभार लागेल. वनक्षेत्रातील झाडे वाढतील.

वनोत्पादन प्रक्रिया व विक्रीत प्रथम महिलांचा समावेश केला आहे. १२ गावांत हा उपक्रम सुरू करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व ४०० गावांत हा उपक्रम सुरू करणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात वनोत्पादनांचा मॉल सुरू होईल. जिल्ह्यातील वनक्षेत्राच्या संरक्षणाबरोबरच त्यामध्ये वाढ होईल
- प्रभूनाथ शुक्‍ला, उपवनसंरक्षक, कोल्हापूर

जिल्ह्यातील निवडलेली गावे
अर्जुनी, जेऊर, बर्की, येळवण जुगाई, मानोली, बोरबेट, ऐनी, वारुळ, तिरवडे, देवर्डे, वाघोत्रे, टिवडे या गावांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मॉलसाठी निवडलेली गावे
पन्हाळा, आंबा, येळवण जुगाई ही गावे सुरवातीच्या टप्प्यात निवडली आहेत. ‘जनवन शॉप’ असे या मॉलचे नाव असेल. वनोत्पादनांबरोबरच फळांपासून प्रक्रिया केलेले पदार्थ, वनरोपे आदी विक्रीसाठी उपलब्ध असतील.

Web Title: kolhapur news Forest protection and yield