मोराच्या तपासात वनविभागाचा गोल गोल... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कोल्हापूर - मोराच्या चोरीचा तपास म्हणजे वनविभागाच्या नावाने गोल गोल... असे म्हणण्याची वेळ आली आहे. कंदलगाव येथील मोर चोरीप्रकरणाला आठ दिवस उलटून गेले, तरी अद्याप फिर्यादीच मिळाला नसल्याने तपासच पुढे सरकला नाही. अशातच वनविभाग केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग झाला आहे. राष्ट्रीय पक्ष्याच्या चोरीचा प्रयत्न होऊनही घटनाच गांभीर्यांने घेतली नाही. यातून भुरट्या चोरट्यांनाच पाठबळ दिल्याचा प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार फिर्यादी मिळत नाही. वनविभागाच्या म्हणण्यानुसार आमचा स्वतंत्र तपास सुरू आहे.

कोल्हापूर - मोराच्या चोरीचा तपास म्हणजे वनविभागाच्या नावाने गोल गोल... असे म्हणण्याची वेळ आली आहे. कंदलगाव येथील मोर चोरीप्रकरणाला आठ दिवस उलटून गेले, तरी अद्याप फिर्यादीच मिळाला नसल्याने तपासच पुढे सरकला नाही. अशातच वनविभाग केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग झाला आहे. राष्ट्रीय पक्ष्याच्या चोरीचा प्रयत्न होऊनही घटनाच गांभीर्यांने घेतली नाही. यातून भुरट्या चोरट्यांनाच पाठबळ दिल्याचा प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार फिर्यादी मिळत नाही. वनविभागाच्या म्हणण्यानुसार आमचा स्वतंत्र तपास सुरू आहे. म्हणजे दोन्ही यंत्रणा जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत असल्याचा संशय बळावत आहे. 

कंदलगाव (ता. करवीर) येथील करमाळात आठ ते दहा मोरांचे वास्तव्य होते. 9 जुलैला सायंकाळी एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने जाळे लावून काही मोर पकडले. दरम्यान हा प्रकार येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पसार झाले. गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक खाडे यांनी तातडीने घटनास्थळी पथक पाठवले. त्यानंतर वायरलेसवरून मेसेज पाठवून नाकाबंदी केली; मात्र चोरटे मोटारीसह पसार झाले. दुसऱ्याच दिवशी नागरिकांना येथील खड्याच्या माळावरील बाभळीच्या झुडपात मोरांची पिसे मोटारही दिसली होती. राष्ट्रीय पक्षी मोर चोरीचे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले. त्यांनी याचा तपास करून लेखी अहवाल वनविभागाकडे पाठवला; मात्र अद्याप त्यांच्याकडून फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याने अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याकडून सांगण्यात आले. एरवी एखादा ससा मारला, की वनविभागाकडून कडक कारवाई केली जाते; मात्र मोर चोरीच्या प्रकरणाला आठवडा उलटून गेला, तरी अद्याप वनविभागाकडून कार्यवाही केली जात नाही. अगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली जात नाही. याबाबत नागरिकांतून शंका व्यक्त केली जात आहे. 

मोरांच्या चोरीच्या प्रकरणांचा गांभीर्याने तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला आहे. पोलिस खात्याचाही अहवाल प्राप्त झाला आहे. या प्रकरणाचा आम्ही लवकरच छडा लावू. 
प्रभुनाथ शुक्‍ला, उपवनसंरक्षक 

Web Title: kolhapur news Forest section Peacock