निधी खर्च; पण गडांची अवस्था तशीच...

निधी खर्च; पण गडांची अवस्था तशीच...

कोल्हापूर - वन खाते, पुरातत्त्व खाते आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यात एकमत किंवा त्यांनी एकमेकांच्या विचाराने गडकिल्ल्यांचे संवर्धन केले नाही तर फक्‍त निधी खर्च टाकण्यासाठी म्हणून खर्च, अशी परिस्थिती होणार आहे.

सुदैवाने अलीकडच्या काळात बऱ्यापैकी गडकिल्ले संवर्धनासाठी निधीची तरतूद होत आहे; पण हा निधी वापरण्यासाठी कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हेच निश्‍चित करण्याची गरज आहे. 
उदाहरण द्यायचं झालं तर चंदगड तालुक्‍यातल्या पारगड किल्ल्यावर पर्यटकांच्या निवासासाठी विश्रामगृहाची दुरुस्ती, नूतनीकरण होणार आहे. पण पुरातत्त्व व वन विभागाच्या दोन टोकांच्या भूमिकांमुळे विश्रामगृह ‘जैसे थे’ पडलेल्या अवस्थेत आहे. पर्यटकांना या गडावरची रात्र, चांदणी, भन्नाट वारा, दूरवर दरीत विसावलेले कोकण हे अनुभवता येत नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यातील संरक्षित ४९ किल्ल्यांपैकी २८ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी गडसंवर्धन समितीने जरूर पुढाकार घेतला.

३२ कोटींची कामे पूर्ण झाली. दूरच्या टप्प्यातील ६३ कोटींची कामे सुरू आहेत. कामे सुरू असताना वन खाते व पुरातत्त्व खाते यांच्यात समन्वय नसल्याने सामानगड किल्ल्यावरील काम थांबवण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाने दिले आहेत. काही ठिकाणी पुरातत्त्वची मान्यता आहे, पण वन खात्याची नाही. त्यामुळे कामे थांबली आहेत. वास्तविक वन खाते व पुरातत्त्व खाते वेगवेगळे असले तरी राज्य शासनाचेच घटक असल्याने व निधी राज्य शासनाचा असल्याने एकमताची गरज आहे. 

गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे, ही सर्वांची भूमिका आहे. गडकिल्ल्यांची गेली शेकडो वर्षे ऊन, वारा, पावसामुळे झालेली दुरवस्था पाहता सगळेच्या सगळे गडकिल्ले दुरुस्त होणे अशक्‍य, हे वास्तव आहे. बहुतेक किल्ल्यांच्या डागडुजीचे अधिकार पुरातत्त्व खाते, गडसंवर्धन समितीला असले तरी गडकिल्ले वन विभागाच्या हद्दीत आहेत. त्यामुळे त्यावर सुधारणा करण्यासाठी वन विभागाची मान्यता आवश्‍यक आहे. काही ठिकाणी ही मान्यता आहे.

काही गडांवर आमदार, खासदारांच्या निधीतून कामे सुरू आहेत. त्यांचीही यामागची भावना चांगली आहे; पण आपल्याला हव्या त्या पद्धतीने गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची कामे झाली तर त्याचे मूळ स्वरूप हरवले जाण्याची भीती आहे. भुदरगड किल्ल्याचा विचार करता काही वर्षांपूर्वी केवळ निधी उपलब्ध आहे, म्हणून या गडाच्या पठाराला कोकणी चिऱ्यातून लांबच्या लांब भिंतच बांधली. जरूर शासनाचा निधी या कामावर खर्च झाला. पण चौफेर पसरलेले पठार हे या भुदरगडाचे जे मूळ वैशिष्ट्य होते तेच हरवले व गडाच्या काठाकाठाने चिऱ्याची कृत्रिम भिंत उभी केली. जी मूळ भुदरगडच्या रचनेशी पूर्ण विसंगत ठरली. 

आता गडहिंग्लज तालुक्‍यातील सामानगडावर हेच घडते आहे. या गडाच्या विकासासाठी निधी आला. काम चालू झाले; पण पुरातत्त्व खात्याला ज्या पद्धतीने ते काम हवे आहे, तसे ते नसल्याने काम थांबवावे, असे पत्र पुरातत्त्व विभागाने दिले. अशा एकमेकांशी विसंगत भूमिकांमुळे निधी वेळेत खर्च करण्यात नक्‍की अडचणी येणार आहेत व संवर्धन पूर्ण क्षमतेने होणे कठीण होणार आहे.

आणखी २५ ते ३० कोटी रुपयांचे प्रस्ताव गडकिल्ले संवर्धनासाठी समिती देणार आहे. ही कामे सर्वांच्या एकमताने व पूर्ण विचारांती व्हावीत. नाहीतर निधी आहे म्हणून तो खर्च करायचा, असे चित्र राहिले तर निधी खर्च होऊनही गडकिल्ले तसेच राहतील.
- प्रमोद पाटील,
गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com