बनावट डिजिटल कंपनीद्वारे 30 लाखाची फसवणूक 

राजेश मोरे
सोमवार, 30 एप्रिल 2018

कोल्हापूर - "झीपकॉईंन क्रिप्टो करन्सी' ही आंतरराष्ट्रीय डिजीटल कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकदारांची 30 लाखाची फसवणूक पाच जणांच्या टोळीने केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

कोल्हापूर - "झीपकॉईंन क्रिप्टो करन्सी' ही आंतरराष्ट्रीय डिजीटल कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकदारांची 30 लाखाची फसवणूक पाच जणांच्या टोळीने केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत गुन्हा नोंद झाला. जादा व्याज व लाभांशाच्या अमिषाने हजारो गुंतवणूकदारांना 25 कोटीहून अधिकचा गंडा या टोळीने घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. 

अटक केलेल्या संशयितांची नांवे - राजेंद्र भिमराव नेर्लेकर (वय 41), अनिल भिमराव नेर्लेकर (वय 46, दोघे रा. हुपरी, ता. हातकणंगले) आणि संजय तमन्ना कुंभार (वय 42, रा. 42, रा. शिरढोण, ता. शिरोळ) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, राजेंद्र ,अनिल नेर्लेकर आणि संजय कुंभार हे तिघे मित्र आहेत. ते यापूर्वी मार्केटींग, एजन्सी आदी व्यवसाय करायचे. नोव्हेंबर 2017 मध्ये त्या तिघांनी लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे गाळा घेतला. तेथे "झीपकॉईन क्रिप्टो करन्सी' नावाची कंपनी सुरू केली. त्यात राजेंद्रची पत्नी पद्मा आणि मुलगा बालाजी हे दोघेही सहभागी झाले. त्यांनी ही आंतरराष्ट्रीय कंपनी असून आंतरराष्ट्रीय बाजारात ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. त्यात गुंतवणूक केल्यास 15 टक्के व्याज लाभांश आम्ही देतो असे अमिष गुंतवणूकदारांना दाखविले. सुरवातीला गुंतवणुकीवर जादा व्याज देऊन गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन केला. कंपनीत शिवाजी पार्क येथील बाळासाहेब झालटे व त्यांच्या मित्रांनी 29 लाख 50 हजाराची रोखीने गुंतवणूक केली. मात्र गुंतवलेल्या रक्कमेवर व्याज तर सोडाच गुंतवणुक केलेली रक्कमही परत मिळत नसून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची तक्रार पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे केली.

तपासाअंती मध्यरात्री फसवणूक प्रकरणी त्या पाच भामट्यांवर गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नोंद झाला. तसे संशयित राजेंद्र, अनिल आणि संजय या तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली. त्यांचे साथिदार संशयित पद्मा आणि बालाजी नर्लेकरनाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विदेशी पर्यटनाचे अमिष  
कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात चढत्या उतरत्या भावाचा विचार करून खरेदी विक्रीचे व्यवहार कशी करते. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. हे पटवून देण्याबरोबर पाचही संशयित गुतवणुकदाराला विदेशी सहलीचेही अमिष दाखवत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 

ब्लॅकमनी मुरविण्याचा प्रयत्न? 
कंपनीत अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी आपला ब्लॅकमनी गुंतविला असावा. तो रेकॉर्ड येऊ नये म्हणून रोखीने व्यवहार केले गेले असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत. 

कार्यालयाची झडती 
पोलिसांनी आज लक्ष्मीपुरीतील कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. येथील संगणक, कागदपत्रे, मोबाईल, बॅंक पासबुक आदी ताब्यात घेतले. सायबर सेलच्या मदतीने त्यांनी कंपनीने केलेल्या व्यवहाराची व गुंतवणुकदारांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासबरोबर पाचही संशयितांची मालमत्तेचीही माहिली घेतली जात आहे. 

मोठ्या रॅकेटची शक्‍यता  
फसवणुकीच्या प्रकारत मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. ते शोधण्यासाठी संशयितांचे मोबाईलही जप्त करून त्यांच्या कॉल डिटेल्स्‌द्वारे यात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. 

कंपनीत हजारो लोकांनी गुंतवणूक केली आहे. फसवणुकीचा आकडा 25 कोटीहून अधिक असण्याची शक्‍यता आहे. याबाबत संबधितांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केले आहे. 

Web Title: Kolhapur News Fraud digital company