लक्ष्मी पतसंस्थेत सात कोटींचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

कोल्हापूर - रुई (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेत बनावट कागदपत्रांआधारे सात कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात आजी-माजी संचालकांसह कर्मचारी अशा २९ जणांवर आज गुन्हा दाखल झाला. 

कोल्हापूर - रुई (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी नागरी पतसंस्थेत बनावट कागदपत्रांआधारे सात कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात आजी-माजी संचालकांसह कर्मचारी अशा २९ जणांवर आज गुन्हा दाखल झाला. 

त्यात रोखपाल सुरेश जिनपाल मुरचिटे, लिपिक-रोखपाल भरत कल्लाप्पा मगदूम, श्रीकांत बाळासाहेब मुरचिटे, सहायक व्यवस्थापक संजय श्रीपती कोरे, लिपिक रविराज रावसाहेब बलवान, रोहिणी अमोल चौगुले, पिग्मी एजंट सागर कल्लाप्पा कुंभार, अध्यक्ष जितेंद्र रामचंद्र चौगुले, संचालक आनंदा आत्माराम पोवार, अशोक श्रीपाल मुरचिटे, आंबी राजेश्री, बाबासाहेब मुरचिटे, शांताबाई बापू मुरचिटे, पद्मश्री अप्पासाहेब हुल्ले, चंद्रकांत कल्लाप्पा बलवान, जंबुकुमार धनपाल चौगुले, अशोक सीताराम कमलाकर, संजय बापू हुपरे, दस्तगीर शमशुद्दीन सुतार, बाळकृष्ण लक्ष्मण कुंभार, सुकुमार आण्णू खूळ, श्रीकांत अण्णू बिराजे, जयपाल बाळासाहेब मुरचिटे, नरसाप्पा तातोबा आंबी, उत्तम बापू कांबळे, बाळू बाबालाल पठाण, कल्लाप्पा भाऊ हुपरे, पुष्पा विठ्ठल पुजारी, कलावती बाळकृष्ण कुंभार आणि संजय गणपती कमलाकर (सर्व रा. रुई, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रुई येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था अवसायानात गेली आहे. त्याच्यावर सात महिन्यांपासून अवसायकांची नेमणूक करण्यात आली आहे. पतसंस्थेचे लेखापरीक्षणाचे काम प्रमाणित लेखापरीक्षक एस. एस. तेली यांनी केले. त्यात संस्थेच्या २००४ पासून ते २०१६ पर्यंतच्या आर्थिक व्यवहारात घोळ असल्याचे लक्षात आले. संस्थेचे आजी- माजी संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करून सभासदांची, ठेवीदारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे आणि जिल्हा लेखापरीक्षक धनंजय गोगाडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुढील लेखापरीक्षण केले. त्यात संबंधित २९ जणांनी संस्थेचा निधी, ठेवी, भागभांडवलाच्या रकमेत तब्बल ७ कोटी ५ लाख ४४ हजार ६८६ रुपये ८३ पैशाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक तेली यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्यांच्यावर कलम ४०३, ४०६, ४०८, ४०९, ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेडे तपास करत आहेत. 

आजी-माजी संचालक, कर्मचारीही
सात कोटींच्या अपहारात आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल झालेल्यांमधील अनेक कर्मचारी नोकऱ्या सोडून गेले असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. 

नियमबाह्य कर्जे सहा कोटींची
योग्य तारणाविना संस्थेने नियमबाह्य कर्जे दिली आहेत. ती सुमारे सहा कोटींच्या घरात आहेत. याबाबतच्या चौकशीचा अहवाल उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे लेखापरीक्षक एस. एस. तेली यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News fraud in Laxmi Patsanstha