एफआरपीची उर्वरित रक्‍कम जूनअखेर

सुनील पाटील
सोमवार, 18 जून 2018

कोल्हापूर - साखर दरातील घसरणीमुळे कारखान्यांकडून थकलेले एफआरपीचे सुमारे १५० कोटी रुपये जूनअखेर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. साखर कारखान्यांनीही त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षी सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मदत होणार आहे.  

कोल्हापूर - साखर दरातील घसरणीमुळे कारखान्यांकडून थकलेले एफआरपीचे सुमारे १५० कोटी रुपये जूनअखेर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. साखर कारखान्यांनीही त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षी सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास मदत होणार आहे.  

जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १५० कोटींपर्यंतची एफआरपी थकली आहे. साखरेच दर कोसळल्याने एफआरपीसह पहिला हप्ता देण्यासाठी दोन भाग करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडून पहिला हप्ता २८०० ते ३००० पर्यंत देण्याचे जाहीर केले होते. सुरूवातीच्या काळात साखरेला प्रतिक्विंटल ३२०० ते ३५०० रुपये दर मिळत होता. काही दिवसातच दरात आणखी घसरण सुरू होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० ने घट झाली. याचा फटका कारखान्यांना पर्यायाने शेतकऱ्यांनाही बसला. 

साखरेचे दर घसरल्याने दोन महिन्यांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांनी बैठक घेतली होती. त्यात एफआरपीसह जाहीर उसाच्या पहिल्या हप्त्यामध्ये ५०० रुपये कपात केली. कपात केलेली रक्कम दोन महिन्यात देण्याचेही जाहीर केले होते. साखरेच्या दरात सुधारणा झाली नसल्याने कपात केलेले ५०० रुपये दोन महिन्यानंतरही मिळालेले नाहीत. केंद्राने प्रतिक्विंटल साखर २९०० रुपयांच्या खाली विक्री करू नये, असा सूचना दिल्याने सध्या साखरेच्या दरात प्रतिक्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे साखर कारखान्यांचे सध्याचे तोटे कमी होणार आहेत.

साखरेला दर नसातानाही प्रतिटन उसाला दिलेल्या तीन हजार रुपयांची तूट भरून काढावी लागणार आहे. तरीही, ही तूट भरून शिल्लक रक्कम जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने ३० जूनपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. काही कारखाने ५०० ऐवजी ३०० ते ४०० रुपये देतील. यातूनही उर्वरित रक्कम भविष्यात देणार आहेत. कारखान्यांनी एफआरपी व पहिल्या हप्त्यात दोन टप्पे करण्याचा निर्णय घेताना शेतकरी किंवा संघटनांना विश्‍वासात घेतले नव्हती. तरीही, वास्तव पाहून त्यांनी कारखान्यांकडे कानाडोळा केला. आता मात्र दर वाढत असतील तर पहिल्या हप्त्याची रक्कम दिली पाहिजे, असा आग्रह होत आहे.

एफआरपी ३० जूनपूर्वी द्यावीच लागेल!
हंगामाच्या सुरवातील साखरेचे दर चांगले होते; मात्र ते अचानक उतरले. त्यामुळे पहिल्या हप्त्यातील पाचशे रुपये कमी करावे लागले. आता दर स्थिर आहेत. सर्वच कारखाने मागील तोटा भरून काढत एफआरपीची रक्कम ३० जूनपर्यंत देतील, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

कुंभी कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीमध्ये ५०० रुपये प्रतिटन शिल्लक राखले होते. ३० जूनपूर्वी उर्वरित ५०० पैकी ४०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. दरम्यान, इतर साखर कारखानेही एफआरपीची रक्कम देण्यास तयार आहेत. 
-चंद्रदीप नरके,
अध्यक्ष, कुंभी-कासारी कारखाना

Web Title: Kolhapur News FRP before Jully