तब्बल २३ तास मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज 

कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि डॉल्बीचा आवाज या प्रसन्नतेत विरून गेला. 

पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज 

कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि डॉल्बीचा आवाज या प्रसन्नतेत विरून गेला. 

दरम्यान, रात्री मल्टीकलर शार्पी आणि लेसर शोने आसमंत उजळून निघाला. डॉल्बीमुक्त मिरवणूकीमुळे यंदा आबालवृध्दांनी मिरवणूकीचा मनमुराद आनंद लुटला. अंध मुलांच्या ऑकेस्ट्रानेही अनेकांची मने जिंकली.  
सकाळी मिरवणुकीचे उदघाटन झाले आणि एकापाठोपाठ गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा नदीकडे जाऊ लागल्या. रात्रीपर्यंत हा वेग अतिशय चांगला होता. त्यामुळे पहाटेपर्यंत मिरवणूक संपेल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र रात्री आठ वाजले आणि  या गतीला ब्रेक लागला. तो अखेरपर्यंत निघालाच नाही. त्यामुळे डॉल्बी नसताना आणि मोठी मंडळे सायंकाळीच मुख्य मार्गावर आल्याने मंगळवारी (ता.५) सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मिरवणूक आज सकाळी सव्वासात वाजता संपली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बीमुक्‍तीचा नारा दिल्यामुळे आणि त्याला डॉल्बी लावणाऱ्या बहुतांशी मंडळांनी पाठिंबा दिला होता. मात्र काही मंडळांनी डॉल्बी लावण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे यावेळच्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे डॉल्बीमुक्‍त मिरवणूक निघाली, मात्र वेळेचे गणीत काही जमले नाही.

सकाळी नऊ वाजता मिरजकर तिकटी येथे मिरवणुकीचे उदघाटन झाले. उद्‌घाटन होताच एका पाठोपाठ मंडळे पंचगंगा नदीच्या दिशेने जाऊ लागले. दोन तासांनी मानाचा तुकाराम माळी तालमीची गणेशमूर्ती पापाची तिकटी पार करून नदीकडे गेली. पहिल्या दोन तासात १९ गणेश मंडळांनी मिरवणूक मार्ग पार केला होता. त्यानंतर सरासरी तासाला वीस ते पंचवीस मंडळे मिरवणूक मार्ग पार करून पंचगंगा नदीवर जात होते. पाच वाजेपर्यंत हे प्रमाण चांगले होते. पाच वाजेपर्यंत १८२ गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीवर गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजल्यापासून लायटिंग लावलेली मोठी मंडळ मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर येऊ लागली.

त्यानंतर मात्र तासभर मिरवणूक रेंगाळली. पाच ते सहा या तासात केवळ दोनच मंडळांनी मिरवणूक मार्ग पार केला. त्यानंतर पुन्हा दोन तास मिरवणुकीचा वेग वाढला. पाच ते सहा या तासात २७ तर सहा ते सात या वेळेत १३ गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीचा मार्ग पार केला. 

पाटाकडील तालीम मंडळ, सुबराव गवळी तालीम मंडळ, छत्रपती शिवाजी तालीम मंडळ, साठमारी तरुण मंडळ, शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळ ही मोठी मंडळे सव्वा एक वाजताच तर लेटेस्ट तरुण मंडळ, बजाप माजगावकर मंडळ चार वाजता पंचगंगा नदीजवळ पोहचले होते. सायंकाळी पाच ते सहा या तासात केवळ दोनच मंडळांनी मिरवणुकीचा मार्ग पार केला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या खंडोबा तालीम मंडळ व हिंदवी स्पोर्टस ही दोन मोठ्या मंडळांनी तसेच नृत्य पथक आणल्याने गर्दी खेचण्यात यशस्वी झालेले शाहूनगर मित्र मंडळाने आठ वाजताच मिरवणुकीचा मार्ग पार केला  होता.  

ताराराणी रोडवरून येणारी आणि मिरवणुकीच्या रस्त्याचा कब्जा घेणारी तटाकडील तालीम मंडळ, रंकाळा वेश तालीम, क्रांती बॉईज मंडळही फार काळ मिरवणूक मार्गावर थांबली नाही. नऊ वाजता ही मंडळं महाद्वारोडवर आली अणि तासाभरात ती गंगावेशपर्यंत पोहचली. नऊ वाजेपर्यंत ही मोठी मंडळे गेल्यामुळे पहाटेपर्यंत विसर्जन मिरवणूक होईल, अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा डॉल्बीचा आग्रह धरणाऱ्या मंडळांनी फोल ठरविली.
रंकाळा टॉवरवरील यु. के. बॉईज, अवचितपीर तालीम मंडळ, शिवाजी पेठेतील दयावान, दिलबहार तालीम मंडळ, जुना बुधवार तालीम मंडळ, ऋणमुक्‍तेश्‍वर तालीम मंडळ, बीजीएम ही मोठी मंडळे मुख्य मिरवणूक मार्गावर महाद्वाररोडवर आल्यानंतर मिरवणुकीच्या वेळेची गणीतच मोडुन काढली. यातील काही मंडळे बिनखांबी मंडळाजवळ तर काही मंडळे ताराबाई रोडवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. या मंडळांना महाद्वार रोडवरून गंगावेशपर्यंत जाण्यासाठी आठ ते दहा तास लागले. काही कार्यकर्त्यांसोबत पोलिसांशी वादावादी झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

सोहेलकुमार शर्मा व त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी तर एका मंडळाच्या कार्यकर्त्याला बेदम मारले. ही घटना चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे याठिकाणी पळापळ झाल्याने गोंधळ झाला. वातावरण तणावाचे बनले. त्यानंतर श्री. शर्मा बाजुला जाऊन थांबले. या घटनेमुळे मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत बराचवेळ मिरवणूक रेंगाळली चार वाजल्यानंतर मात्र पोलिसांनी मंडळांना पुढे ढकलण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा मिरवणुकीला वेग आला. अखेर सव्वासात वाजता मिरवणुकीतील शेवटच्या क्राती युवक मंडळाच्या (रुईकर कॉलनी) गणेशमूर्तीची मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. 
 

हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना पौष्टिक आहार
मिरवणूकीत बंदोबस्तात असलेल्या पोलिस व कर्मचाऱ्यांना येथील हिंदू युवा प्रतिष्ठानतर्फे पौष्टिक आहाराचे वितरण झाले. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, संजय ढाले, महेश इंगवले, दिलीप पाटील, महादेव कुकडे, राजेंद्र सूर्यवंशी, राजेंद्र कदम, ज्ञानदेव पुंगावकर, शंभू पाटील, विनायक जाधव, मैदिनी मुनीश्‍वर, दीपक पेटकर, रामभाऊ यादव, अभिजीत चौगले आदी उपस्थित होते.

व्हाईट आर्मीचे मदतकार्य
जीवन मुक्‍ती स्वयंसेवी संस्था व्हाईट आर्मीच्या पथकाने गणेश विसर्जना वेळी मदत कार्य केले त्यासाठी पंचगंगा नदी पात्रात व्हाईट आर्मीची एक बोटी गस्त घालत होती  अनेकदा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात पोहण्याचा प्रयत्न करीत होते अशाना आवरण्यापासून ते गर्दी नियंत्रण करणे, गर्दीत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे तसेच   अत्यवस्थ रूग्णांसाठी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती अशोक रोकडे आणि त्यांच्या सहकार्यांनी या मदत कार्यात सहभाग घेतला.

जिल्हा बॅंकेचा कक्ष
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने प्रथमच यंदा पापाची तिकटी येथे स्वागत कक्ष उभारला. मंडळांच्या अध्यक्षांना येथे मानाचे श्रीफळ, पानसुपारी आणि प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्वागत कक्षाचे उद्‌घाटन झाले. 
 
माझे दोन नंबर दाखवा 
माझे दोन नंबरचे धंदे दाखवा आणि गंभीर गुन्हेही दाखवा, असे आवाहन करणारे फलक घेऊन माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले या मिरवणूकीत सहभागी झाले आपल्या कन्येलाही खांद्यावर घेऊन ते कार्यकर्त्यां समावेत फलक घेऊन मिरवणूकी सोबत निघाले... हा फलक व त्यांनी केलेली विचारणा, या विषयी कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा झाली. 
 
‘पाटाकडील’वर दुखःचे सावट 
पाटाकडील तालमी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकत्याच्या निधनामुळे उत्सवावर दुखःचे सावट होते. मात्र प्रथेचा भाग म्हणून त्यांनी गणेश उत्सव साजरा केला. पण त्यांनी मिरवणूक साधेपणाने काढली मिरवणूक मार्गात ठिक ठिकाणी असलेल्या स्वागत मंडपात तालमि दुखःत असल्याचे सांगत त्यांनी नम्रपणे स्वागताचा नारळ स्विकारणार नसल्याचे  सांगितले. या मिरवणूकीत कार्यकर्त्यांनी गणेश मुर्ती शेकडो कार्यकर्त्यां सोबत विसर्जनास नेली. त्यावेळी इतर मंडळांनी त्यांना वाट करून दिली.    
 
महावितरणची जनजागृती 
रांगेत कशाला वेळ घालवता घर बसल्या वीज बिलभार असा संदेश देण्यासाठी महावितरण कंपनी गणेशत्सव विविध ठिकाणी स्टॉल्स लावले होते. येथे लाईनमन तसेच अभियंत्यांकडून ग्राहकांमध्ये वीज बिल भरण्यासाठी जागृती करण्यात येत होती. याचाच भाग म्हणून मोबाईल ॲपव्दारे वीज बिल कसे भरता ऑनलाईन वीज बिल भरणा म्हणजे काय आदी विषयी माहिती देण्यात येत होती. 

वीज पुरवठा सुरळीत  
विसर्जन मार्गात वीज पुरवठा खंडीत होऊन नये, यासाठी महावितरण विसर्जन मार्गावर ५० कर्मचारी नियुक्ती केले होते. यात शहर अभियंत्या नेतृत्वाखाली लाईनमन तसेच कनिष्ठ अभियंता यांचे पथक विविध भागात वीज पुरवठ्यावर लक्ष ठेवून होते दोन ठिकाणी किरकोळ दुरस्तीचे प्रसंग वगळता सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत होता. महावितरणचे कर्मचारी अभिंयंते मिरवणूक सुरू होण्यापासून ते संपे पर्यंत २४ तास कार्यरत होते.    

फिरंगाई, खंडोबा अन्‌ ऋणमुक्तेश्‍वर...!
फिरंगाई तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळाने यंदा टाळ्या वाजवत मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषेत हजारो महिलांचा सहभाग मिरवणूकीत होता. ऋणमुक्तेश्‍वर तालीम मंडळाच्या मिरवणूकीत लेसर शोने झगमगाट आणला. हजारो तरूण या मिरवणूकीत सहभागी झाले.

ताराबाई रोडवर पारंपरिक वाद्यांचा ठेका...

गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वीच्या आदल्या दिवशीच ताराबाई रोडवर डॉल्बीची जोडाजोडी सुरू होते. मिरवणुकीदिवशी सकाळी नऊलाच डॉल्बीचा ठेका सुरू होतो. यंदाचे या रोडवरचे चित्र मात्र फारच वेगळे होते. दुपारी साडे अकरापर्यंत  रोडवर सन्नाटा होता. त्यानंतर रंकाळा स्टॅंडवरून रंकाळवेस गोल सर्कलची मिरवणूक ढोल-ताशाच्या कडकडाटात रोडवर आली. ही मिरवणूक महालक्ष्मी दरवाजापासून पुढे सरकल्यानंतर पुन्हा हा रोड शांत झाला. याच वेळी दयावानचे कार्यकर्ते बेस लावण्याच्या तयारीत होते. दुपारी चारनंतर तटाकडील तालीम मंडळ, दयावान, उमेश कांदेकर युवा मंच, कपिलतीर्थ मार्केट व्यापारी मित्र मंडळ, मित्रप्रेमची मिरवणूक या मार्गावरून पुढे सरकली. सहानंतर दयावानचे कार्यकर्ते हिंदी, मराठी गीतांच्या ठेक्‍यावर थिरकले. सातनंतर हा मार्ग गर्दीने फुलून गेला. 

जत्रेत हरवले गणेश भक्त...
डॉल्बीविरहीत मिरवणूक असल्याने गणेश भक्तांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. पंचगगा नदीकडील संजय गायकवाड पुतळ्याच्या परिसराला जत्रेचे स्वरूप होते. खाद्यपदार्थांच्या गाड्या, मुखवटे, फुगे, छोट्या मण्यांच्या माळा, किचन अशा वस्तुंची विक्री येथे सुरू होती. छत्रपती शिवाजी चौकालाही जत्रेचे स्वरूप होते. चौकातील एकवीस फुटी गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणाहून आलेल्या गणेश भक्तांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. शिवाजी रोडवरून पापाची तिकटीकडे जाणाऱ्या मंडळांची रांग लागली होती. 

जासूद गल्लीचा सेल्फी पॉइंट...
सतरा वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून कोल्हापुरातील अनिकेत जाधव प्रतिनिधीत्त्व करत आहे. त्याचे कट आऊट जासूद गल्ली मित्र मंडळाच्या मिरवणुकीत होते. सेल्फी पॉइंट म्हणून तेथे कार्यकर्ते सेल्फी घेत होते. 

मिरजकर तिकटीवर शांतता...
विसर्जन मिरवणुकीदिवशी मिरजकर तिकटीवर दरवर्षी सकाळीच दणदणाट सुरू होतो. पण, यंदा बारा वाजले तरी हा परिसर शांत होता. तिकटी ते खासबाग मैदानावर मंडळांची रांग होती. सर्वात पुढे जुना बुधवार तालीम मंडळाची मिरवणूक होती. त्या मागे असणारी मंडळांची मिरवणूक शांततेत होती. तिकटी ते कोळेकर तिकटी परिसरात तीच स्थिती होती. 

नृत्यांगनांचा डान्स, कार्यकर्ते बेभान...
यादवनगरातील शाहू क्रीडा मंडळाच्या मिरवणुकीत नृत्य पथक होते. त्यातील नृत्यांगना मराठी हिंदी गीतांवर थिरकत होत्या. त्यामुळे या मंडळाची हजारो कार्यकर्ते मिरवणुकीच्या मागे चालत होते. नृत्यांगणा थिरकल्या, की कार्यकर्ते बेहोश होऊन नाचत होते. पंचगंगा नदी घाटापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी होती. 

आर्द्रता अन्‌ असह्य उकाडा
सकाळी सहापासून वातावरण ढगाळ होते. वाऱ्याचा वेगही १० ते १२ किलोमीटर प्रतितास होता. ढगांची व्यापलेले क्षेत्र ९४ टक्के होते. आर्द्रतेचे प्रमाण ७७ टक्के होते. यामुळे दिवसभर अक्षरश: दमवून टाकणारा असह्य उकाडा जाणवला. मिरवणूक पाहायला बाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. तहानेने घसा कोरडा पडल्याने पाण्याच्या बाटल्यांचीही प्रचंड विक्री झाली. हा उकाड्याचा प्रभाव रात्री साडेबारा ते दिडपर्यंत होता. 

बॉम्बे वडा, भेळ अन्‌ पाणीपुरी 
अनेक ठिकाणी असलेल्या मिरवणूक मार्गांवर उभे असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवरुन विविध खाद्यपदार्थांची विक्रमी विक्री झाली. यातून एका दिवसात शहर परिसरातील उलाढाल कोट्यवधी रुपये झाली. सर्वसाधारणपणे दहा रुपयांच्या पुढे अनेक खाद्यपदार्थांचे दर आहेत. भेळ, पाणीपुरी, वडा, मिरची भजी, बटाटा भजी, बॉम्बे वडा, चहा, कॉफीचा प्रभाव नेहमीप्रमाणे राहीला. शिवाय मक्‍याची उकडलेली कणसे, कच्ची दाबेली, रगडा पॅटीस, कोन आईस्क्रिम, चोको बार, चॉकलेट आईस्क्रिमचे कप, विविध पेस्ट्रीज, केकचे तुकडे, उकडलेले शेंगदाणे, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, कुल्फी, चिक्की, पाण्याच्या बॉटल्स, चिरमुरे, फुटाणे, खारी डाळ, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी, अप्पे, आंबोळी, डोसा, उत्ताप्पा, पेरु-सफरचंद-अननस-कलिंगडच्या फोडी, सोडा, सरबत, कोकम, ताक, लस्सी, काजू शेक, फालुदा, मसाला दूध, कुरकुऱ्याची पाकिटे, चायनीजमध्ये गोबी मंच्युरियन, फ्राईड राईस, चिकन लॉलीपॉप, नुडल्स डिश, सॅंडविचेस, पावभाजी, अंडा आम्लेट, अंडा बुर्जी, मटण-चिकन-बिर्याणीच्या मिनी थाळ्या, पॉपकॉर्न, ऊसाचा रस, नारळ, शहाळी, वेगवेगळ्या बिस्किटांचे पुडे, चॉकोलेटस्‌ आदी खाद्यपदार्थ तुफान विकले गेले. परिसरातील हॉटेलमध्येही नेहमीपेक्षा जास्त उलाढाल झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून खाद्यपदार्थांच्या गाड्या विविध ठिकाणी उभ्या राहील्या. याशिवाय, पानांच्या दुकानात पानमसाला, मसाला पान, पानांतील अन्य प्रकार, तंबाखू, मावा, सिगरेट, सुपारी घेण्यासाठीही प्रचंड गर्दी होती.   

प्लास्टिक कचऱ्याने भरले रस्ते 
खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर खाऊची पाकिटे, वर्तमानपत्राचे बोळे, चॉकोलेटस्‌, खाद्य पदार्थाची पाकिटे, मक्‍याची कणसे, आईस्क्रिमचे कप, प्लास्टिक अन्‌ लाकडी चमचे, अन्य खाद्यपदार्थांचा कचरा जिथल्या तिथे फेकून दिला होता. यामुळे सर्व मिरवणूक मार्ग अक्षरश: कचऱ्याने भरुन गेले होते. महापालिकेने हा कचरा गोळा करण्यासाठी जागोजागी प्लास्टीक बादल्या ठेवल्या नव्हत्या. कचऱ्यामुळे मिरवणूक मार्गाचे रुप किळसवाणे झाले होते. हा कचरा सकाळी नऊ, दहावाजेपर्यंत पडून होता. महापालिकेची हा कचरा गोळ्या करण्यासाठी कसलीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. कचऱ्यामुळे गटारेही भरली होती. शिवाय काही ठिकाणी कचरा साठविण्यासाठी ठेवलेली लोखंडी पॅनेल्स भरुन वाहत होती. 

फ्लॅश मोबाईलचे; प्रत्येक क्षण रेकॉर्ड  
मुंगीच्या गतीने पुढे सरकणाऱ्या मिरवणूकीतील अनेक क्षण अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्याने टिपले, संपूर्ण मिरवणूक मार्ग मोबाईलच्या फ्लॅशने उजळला होता. अनेक मंडळांच्या गणेश मुर्तींचे वेगवेगळे आकार, सजीव, तांत्रिक देखावे, डान्स टिपण्यासाठी, रेकॉर्डिंग करुन घेण्यासाठी, मित्र, मैत्रीणी, महाविद्यालयाचे ग्रुप, कुटुंबासहित अनेकांनी गणेशमूर्तीसमोर, देखाव्यांसमोर उभे राहून सेल्फीही घेतली. दुरवरच्या गणपतींचे, डान्सवर थिरकणाऱ्या तरुणाईचे फोटो घेण्यासाठी सेल्फी स्टिकचाही वापर करण्यात आला. सोशल नेटवर्किंग साईटस्‌वरुन हा माहौल एकमेकांना ‘शेअर’ही केला. रेकॉर्डिंग, फोटो घेतल्यामुळे उतरणारी मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी विविध आकारातील बॅकअप्स्‌, पॉवर बॅंक, चार्जर बरोबर घेतले होते. यातून प्रत्येक क्षण अन्‌ क्षण रेकॉर्ड झाला. सुलभ तंत्रज्ञान काय करु शकते, याचा नमुनाच यानिमित्ताने पाहायला मिळाला.

बाज हायटेकचा  
मिरवणुकीत सजीव देखाव्यांचे प्रमाणही यंदा कमी होते आहे. हा कल आता अधिकाधिक आकर्षक गणेशमूर्ती ठेवण्याकडे झुकतो आहे. तांत्रिक, सजीव देखाव्यांचा हा ‘स्पेस’ आता एलईडी तंत्रज्ञानाने निर्माण केलेले विविधरंगी लाईटस्‌, लेझर शो भरुन काढतो आहे. शिवाय मिरवणूक काळात हमखास दिसणारे अन्य पारंपरिक खेळांचे प्रमाणही कमी झाले आहे. मिरवणूकीचे स्वरुपच आता लाईट इफेक्‍टस्‌च्या तंत्रज्ञानाकडे झुकले आहे.

मुखवटे अन्‌ खेळणी 
खाद्यपदार्थांबरोबर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, प्लास्टिकच्या खेळण्यांच्या स्टॉलवर लहान मुलांसाठी खेळणी खरेदीसाठी गर्दी झाली होती. यामध्ये चेटकीण, भूते, हडळ, फॅंटमच्या मुखवट्यांची जास्त विक्री झाली. हे मुखवटे घालून कार्यकर्ते, मुले मिरवणूकीत सहभागी झाले होते.

सजविलेल्या केएमटीचा रथ
बाप्पांना निरोप देण्यासाठी कामगार गणेशोत्सव मंडळातर्फे फुलांच्या माळांनी सजविलेल्या केएमटीचा रथ तयार करण्यात आला होता. रथाला पुढच्या बाजूला दोन टॉप जोडले होते. बसच्या मागच्या भागात गणरायासाठी देव्हारा, त्यात आसन, भगवा ध्वज, इतर सजावट करण्यात आली. केएमटीचा रथ लक्ष वेधून घेत होता.

लाडक्‍या गणरायासाठी पालखी
लाडक्‍या गणरायासाठी पालखी, ती वाहणारे भोई, भालदार, चोपदार यांची पारंपरिक वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक पद्धतीने मार्गावरील भाविक पालखीला पाणी वाहून पालखीतल्या गणरायाला वंदन करीत होते.

नऊवारीचा थाट
गाण्यावर धरलेला ठेका असो की गर्दीतली लगबग असो, तरुणींसोबतच मध्यमवयीन महिलाही मागे राहिल्या नव्हत्या. गाणे सुरू झाले की, आपल्या बाळासोबतच महिलाही थिरकत होत्या. धक्काबुक्की झाल्यानंतर काही गांगरूनही जात होती. नऊवारीतल्या पारंपरिक वेशभूषेत नाचणाऱ्या, पारंपरिक ठेका धरणाऱ्या, सेल्फी काढणाऱ्या महिलांनी पारंपरिक, आधुनिकतेचा मेळ साधला. ट्रॅक्‍टर ट्रॉलीत नाचणाऱ्या, बागडणाऱ्या, उड्या मारणाऱ्या नऊवारीतल्या चिमुकल्याही उत्साहात होत्या. धोतर-शर्ट, टोपी असा पारंपरिक वेशातले चिमुरडेही ‘गणपती बाप्पा मोरया...’ अशा घोषणा देत मिरवणुकीत जान आणत होते.

पारंपरिक वाद्ये
पापाची तिकटी येथे लहान मुलींची लेझीम रंगली. नऊवारी साडी, परकर-पोलके अशा पारंपरिक वेशभूषा केलेल्या मुलींनी मिरवणुकीत उपस्थितांची मने जिंकली. हलगी-घुमके, कैताळ, उलट्या परातीचा तयार केलेला झांज, थाळी वाजविणे या पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत जोश आणला. गंगावेश येथे प्रौढांच्या लेझीम पथकात वृद्धही तरुणांना तोडीस तोड नाचले. बाप्पाच्या मिरवणुकीसाठी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. जुने कलाप्रकार व वृद्धांचा उत्साह असा सुरेख संगम डॉल्बीच्या ठेक्‍याला लाजवणारा ठरला. डॉल्बीशिवाय झालेल्या मिरवणुकीत ‘जुनं ते सोनं’ हाच प्रत्यय आला.

ताशा वादकाला लोकांकडून बिदागी
ताशा वादकाच्या कलेला लोकांकडून वाहवा मिळाली. अनेकांनी त्याच्या आवाजावर ठेका धरला. वादकालाही दर्दी कोल्हापूरकरांमुळे उत्साह चढला. हौशी गुणग्राहक कोल्हापूरकरांनी त्याला दाद म्हणून दहा, पन्नास, शंभराची उत्स्फूर्त बिदागी देण्यास सुरुवात केली. ताशा घुमत राहिला आणि त्याच्याबरोबर लोकही. कलाकाराच्या कलेला अशा प्रकारे दाद देऊन कोल्हापूरकरांनी ‘कलापूर’ हा वारसा जपणे आपल्या रक्तातच असल्याचे दाखवून दिले. 

तरुणींचा उत्साह शिगेवर
तरुणांच्या बरोबरीने ढोल-ताशा पथकात सहभागी झालेल्या मुलींनी आपणही काही कमी नसल्याचे दाखवून दिले. छोट्या ताराराणींसाठी मिरवणूक पाहायला आलेल्या लोकांच्या नजरेत कौतुक होते. नऊवारी साडी-फेटा, सलवार-कमीज-जॅकेट-फेटा अशा वेशातील आवेशात ढोल वाजविणाऱ्या, झेंडा नाचविणाऱ्या तरुणींना पाहून उपस्थितांनाही स्फुरण चढत होते. ढोल, ताशाची महिनाभराहून अधिक प्रॅक्‍टिस केल्यानंतर या मुलींच्या मेहनतीचे चीज झाले. 

आजी मिरवणूकीत 
अनेक महिला घरातील वयस्कर महिलांना मिरवणूक दाखविण्यासाठी घेऊन आल्या होत्या. तरुणी आपल्या हौशी आजीला हाताला धरून मिरवणुकीत काळजीपूर्वक वावरत होत्या. आजींच्या चेहऱ्यावरही आनंद, उत्साह, कुतूहल होते. नातींच्या वयाच्या ढोल-ताशा वाजविणाऱ्या मुलींना आजी कौतुकाने पाहत होत्या. या तरुणींनी आजींना जास्त गर्दीच्या ठिकाणी नेण्याचे मात्र टाळले.

एकमेकांना सहकार्य
शहरातील मिरवणूक मार्गाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेटस्‌ लावून वाहनांना अटकाव केला होता. मिरवणुकीच्या ठिकाणी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्लॅनिंगला कोल्हापूरकरांनी सहकार्य केले. घर जवळच असतानाही लांबच्या मार्गाने जाण्याचे सहकार्य लोकांनी केले. गाड्या पार्किंग करतानाही नागरिकांनी एकमेकांना सहकार्य केले. एखाद्या तरुणीची किंवा महिलेची गाडी पार्किंग केलेल्या वाहनांच्या गर्दीत अडलेली असल्यास अनेक तरुणांनी स्वतः पुढाकर घेऊन त्यांना मदत केली.

मुली, महिलांकडून प्रसाद
गर्दी असल्यामुळे मिरवणुकीत सामील झालेल्या प्रत्येकाला थोडे-फार धक्के खावे लागतच होते. काही ठिकाणी हुल्लडबाज तरुण, रोडरोमियोंनी विनाकारण ढकलाढकली केल्यानंतर मात्र महिलांनीही सडेतोड उत्तर दिले. जाणूनबुजून धक्काबुक्की करणाऱ्यांना काही ठिकाणी शाब्दिक तर काही वेळा हातांनी प्रसाद देण्यात आला.

प्रॅक्‍टीसचे नेटके नियोजन
प्रॅक्‍टीस क्‍लबच्या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फुर्त सहभाग होता. त्यातील तरुणाई पारंपारिक वाद्याच्या गजतात थिरकत होत्या. महिलांसाठी क्‍लबने पाणी, नाष्ट्यासह भोजण व नदीवरून घरी सोडण्यासाठी वाहनांची सोय केली होती. गणेशोत्सवात महिलांनीही पुढे यावे यासाठी केलेल्या क्‍लबच्या या नेटक्‍या नियोजनाचे मंगळवार पेठ परिसतून कौतुक केले जात होते. 

नारळ घेण्यास नकार 
मानाचे नारळ घेणारे स्वागत मंडप मिरवणूक मार्गात उभे केले होते. मात्र मिरवणूकीत सिस्टीम लावण्याबाबत झालेल्या विरोधातून अनेक मंडळे नाराज होती. त्यातील काही मंडळांनी स्वागत मंडपातून मानाचा नारळ स्विकारण्यास नकार दिला. अध्यक्षांचे नाव पुकारल्यानंतर कार्यकर्ते केवळ मोरयाऽ मोरयाऽ चा गजर करत होते. 

महिलांची गर्दी 
संभाजीनगर येथील ओम गणेश तरुण मंडळाच्या मिरवणुकीत तरुणाई महिला संगीतावर थिरकत होत्या. बेफान होऊ नृत्य करणाऱ्या तरुणाईंना पाहण्यासाठी महिला वर्गांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हे मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले. 

‘बेस’साठी महाद्वारचा आधार 
लक्षतीर्थ वसाहत येथील एका मंडळाने महाद्वाररोड येथील कपिलतिर्थ मार्केटमधून दोन बेस आणले. ते थेट ट्रॅक्‍टरवर चढवले. तसा दणदणाट सुरू झाला. तशी आतापर्यंत टाळ्या वाजवत निघालेली मिरवणुकीतील तरुणाईने थिरकण्यास सुरवात केली.

थरार मर्दानी खेळाचा...
लेझीमचा फेर आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीत रंगत आणली. खंडोबा तालीम मंडळाच्या मिरवणुकीत सादर झालेल्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. वस्ताद आनंदराव ठोंबरे, (कै.) वस्ताद सुहास ठोंबरे, वस्ताद मनोज बालिंगकर, मिलिंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या मुला-मुलींनी चित्तथरारक लढती केल्या. हातावर व डोक्‍यावर नारळ फोडून गणेशभक्तांची वाहवा मिळवली. वस्ताद पंडितराव पोवार यांच्या नेतृत्त्वाखाली मुला-मुलींनी प्रात्यक्षिके सादर केली. विनोद साळोखे याने डोक्‍याने नारळ फोडण्याचे प्रात्यक्षिक सादर केली. किरण जाधव, कृष्णात ठोंबरे, बाबासाहेब शिकलगार, शिवतेज ठोंबरे, सरला गायकवाड, शिवाजी ठोंबरे, अनिकेत जाधव, संदीप पपाटील, शैलेश जाधव, शिवबा सावंत, शाहूराजा सावंत, बबलू जाधव, अथर्व जाधव, सौरभ घोसरवाडे, स्वरूप पाटील, सक्षम व शर्वरी सावंत, महेश सावंत, केदार ठोंबरे, कलश कडपे, सुजाता जाधव, मोहन जाधव, निखिल जाधव यांनी प्रात्यक्षिके सादर केली. सणगर-बोडके तालीम मंडळाच्या मिरवणुकीत वस्ताद बाबासाहेब लबेकरी, अच्युत साळोखे यांनी लाठी, फरी गदकाचे प्रात्यक्षिक सादर केले. 

‘छत्रपती’ घराण्याची लक्षवेधी उपस्थिती...
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती गंगावेस चौकात उभारलेल्या बूथमध्ये मंडळांचे स्वागत करत होत्या. संयोगिताराजे दिवसभर येणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या. त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तसेच या मार्गावरून पुढे सरकणाऱ्या मंडळांच्या मिरवणुकीत मधुरिमाराजेंनी लेझीमचा फेर धरला होता. मोबाईलवर त्याची छायाचित्रे व व्हिडीओ करण्यास कार्यकर्त्यांची गर्दी होती. रात्री खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मिरवणुकीत सहभागी झाले. बालगोपाल तालीम मंडळाच्या मिरवणुकीत ते लेझीम खेळले. मालोजीराजे यांनी एका मंडळाच्या ट्रॅक्‍टरचे सारथ्य केले. 

सॅक्‍सोफोनची कमाल
दिलबहार मंडळाने स्थानीक कलावंताच्या वाद्यवृंद ट्रालीवरील व्यासपिठावर मांडला यात ज्येष्ठ सॅक्‍सोफोन वादक प्रकाश साळोखे यांच्या सुरेल तितक्‍याच कर्णमधूर सूरावटी सुरू झाल्या तशी एकेका सदाबहार गीतांच्या धून त्यांनी वाजविल्या दिले खे झरोको में...आ जा सनम...  आयम डीस्को डान्सर पासून ते लैला मै लैला पर्यंतच्या अनेक कर्णमधूर हिंदी गीतांच्या धून अशा वाजवत मिरवणूक पुढे निघाली, तशी मिरजकर तिकटीवर गर्दीही अलगत या सूर तालाच्या ओढीने पुढे निघाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news ganpati visarjan miravnuk 23 hrs