घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचा बंधारा निकामी

संजय पाटील
मंगळवार, 19 जून 2018

घुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची एक बाजू ढासळली आहे. 

घुणकी - वारणा नदीवरील घुणकी - तांदुळवाडी दरम्यानचे काही पिलर तुटल्याने हा बंधारा निकामी झाला आहे तर चावरे-घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्यातील अन्य पिलरची एक बाजू ढासळली आहे. 

वारणा नदीवर चांदोली धरण ते सांगली हद्दीपर्यंत पन्नास वर्षापूर्वीचे कोल्हापूर पध्दतीचे नऊ बंधारे बांधण्यात आले. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी वारणा कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांसाठी मांगले, कोडोली, चावरे, शिगाव येथील बंधारे बांधले आहेत.  

चावरे - घुणकी दरम्यानच्या बंधाऱ्याची ९० मीटर लांबी साडेचार मीटर उंची असून २९ गाळे आहेत.  बंधाऱ्यात ४.७५ दशलक्ष घन मीटर पाणी साठवण क्षमता असून या बंधाऱ्यात १९७४ पासून पाणी साठा केला जात आहे. पिलर कमकुवत झाले असून काही पिलरचे भाग तुटून गेले आहेत. पाण्याच्या दाबामुळे दगडी बांधकामाचे पिलर कमकुवत झाले आहेत. त्यामुळे बरगे बसविताना अडचणीचे झाले आहे. बांधकामावर खड्डे पडले आहेत. स्लॅबचा वेअरींग कोट खराब झाला आहे.

आमदार सुजितकुमार मिणचेकर यांनी यावर विधानसभेत तारांकीत प्रश्न उपस्थित केला. तसेच कोल्हापूर पाटबंधारे कार्यालयाने  विशेष दुरुस्तीचे अंदाजपत्रक मुख्य अभियंता जलसंपदा पुणे यांचेकडे पाठविले आहे.  प्रकल्पीय सिंचन, म्हैशाळ उपसा सिंचन व कर्नाटक राज्यासह लातूरला सोडाव्या लागणाऱ्या पाण्यामुळे या बंधाऱ्यात बहुतांशवेळी पूर्ण क्षमतेने पाणी साठा करावा लागतो.  

घुणकी - तांदुळवाडी बंधाऱ्यातील काही पिलर ढासळले आहेत. हा बंधाराही चावरे - घुणकी प्रमाणे महत्वाचा आहे. पिलर तुटल्याने  बरगे घालता येणार नाहीत.  त्यामुळे या बंधाऱ्यात भविष्यात पाणी अडविता येणार नाही. 

दरम्यान कोल्हापूर पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी  दोन्हीही बंधाऱ्यांची पाहणी केली या संदर्भात त्वरीत अहवाल देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Ghunaki - Tandulwadi bund brokendown