जेमतेम नेत्रपेढ्या, जेमतेमच नेत्रदान!

जेमतेम नेत्रपेढ्या, जेमतेमच नेत्रदान!

एक शासकीय, तीन खासगी नेत्रपेढ्या - स्वयंसेवी संस्थांचा सहभाग शून्यच

कोल्हापूर - ‘अवयवदान करा नेत्रदान करा...’ असा जागर देशभर सुरू आहे. अनेकांनी नेत्रदानाचे अर्ज भरले प्रमाणपत्र घेतले, दृष्टिदान करण्याचा निश्‍चय केला. त्यांच्यासाठी सीपीआर जिल्हा शासकीय नेत्रपेढी व खासगी तीन नेत्रपेढ्या उपलब्ध आहेत. नियमाच्या मर्यादा व अनुदानाच्या अभावामुळे स्वयंसेवी संस्थांचा नेत्रपेढी सुरू करण्याचा मानस कोलमडला आहे. त्यामुळे जेमतेम नेत्रपेढ्यांच्या संख्येत नेत्रदान कार्याला मर्यादा आल्याने नेत्रदान व दृष्टिदान यथातथाच होत असल्याची बाब ठळक होत आहे. 

नेत्रदानाबाबत पाच वर्षांत जवळपास २५ हजारांहून अधिक अर्ज आले. नेत्रदानाचा अर्ज भरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एक-दोन तासांत मृत व्यक्तीचे डोळे काढून घेऊन २४ तासांच्या आत अंध व्यक्तीला बसविले जातात. त्यासाठी अंध व्यक्तीची प्रतीक्षा यादी जिल्हा नेत्रपेढीकडे तयार असते. त्यातील नंबरनुसार अंध व्यक्तीला नेत्र बसविले जातात. हे काम जिल्हा नेत्रपेढीच्या साहाय्याने मोफत होते. तसेच खासगी निष्णात नेत्रतज्ज्ञांकडून तीन ठिकाणी खासगी नेत्रपेढ्यांकडूनही हे काम केले जाते.

शहरातील खासगी नेत्रपेढीच्या साहाय्याने नेत्रदान व दृष्टिदानचे काम होते. दोन्ही कामे मोफत असली तरी भूल देण्यापासून काही चाचण्या करण्यापर्यंतच्या कामासाठी शुल्क आहे. शासकीय नेत्रपेढीतही दोन्ही कामे मोफत होतात. मात्र इथे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव व मर्यादा असल्यामुळे रात्री-अपरात्री एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याचे डोळे काढून आणण्यापासून ते दृष्टिदान करण्याचे काम करण्यासाठी काही वेळा खासगी नेत्रपेढीचा आधार घ्यावा लागतो. भविष्यात काम आणखी वाढणार असल्याने स्वयंसेवी संस्थांना काही अटींवर नेत्रदान व दृष्टिदान करण्यास मान्यता मिळाल्यास उपक्रमाला बळ मिळेल.

स्वयंसेवा संस्थांची अडचण...
काही जिल्ह्यांत अशा संस्थांकडून नेत्रजोड घेणे तसेच ते अंधांना बसविणे या कार्यात अनियमितता दिसून आली. शासकीय नियमात बदल झाल्यानंतर मात्र स्वयंसेवी संस्थांना असे कार्य चालविणे मुश्‍कील बनले. नव्या नियमानुसार उच्चदर्जाचा मायक्रोस्कोप बसविणे, नेत्रजोड काढण्यासाठी उच्चशिक्षित (एमबीबीएस किंवा एमएस) दर्जाचे डॉक्‍टर नियुक्त असणे, रुग्णवाहिका, प्रशिक्षित परिचारक, तंत्रज्ञ असणे अशा अटी आहेत. मायक्रोस्कोप बसविण्याचा खर्च १५ लाखांपर्यंत आहे. या बाबी स्वयंसेवी संस्था उपलब्ध करू शकतील. मात्र मायक्रोस्कोपसाठी अनुदान आवश्‍यक असल्याने अनेक स्वयंसेवी संस्थांचा नेत्रपेढी सुरू करण्याचा मानस कोलमडला आहे. 

जिल्ह्यात दोन हजार व्यक्तींना गरज
गेल्या वर्षभरात नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेल्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या ५ हजार इतकी आहे. नेत्रदानाची गरज असलेल्यांची संख्या जिल्हाभरात दोन हजारांहून अधिक आहे. जिल्हाभरात स्वयंसेवी संस्थेची नेत्रपेढीची संख्या तीनपेक्षा अधिक नाही. त्यापैकी एका संस्थेची मान्यता काढून घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com