‘गोकुळ’च्या गौरवशाली परंपरेला गालबोट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवालातील विषयपत्रिकेवरील एकही विषय न वाचता मंजूर मंजूर म्हणत सभा गुंडाळून संघाच्या ५५ वर्षांच्या वैभवशाली परंपरेलाच गालबोट लावले. श्री. महाडिक यांच्या या वर्तणुकीने संघाच्या ज्येष्ठ संचालकांसह अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सभासदांनाही धक्का बसला. 

कोल्हापूर - अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवालातील विषयपत्रिकेवरील एकही विषय न वाचता मंजूर मंजूर म्हणत सभा गुंडाळून संघाच्या ५५ वर्षांच्या वैभवशाली परंपरेलाच गालबोट लावले. श्री. महाडिक यांच्या या वर्तणुकीने संघाच्या ज्येष्ठ संचालकांसह अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सभासदांनाही धक्का बसला. 

संघाच्या संचालकांचे नेतृत्त्व श्री. महाडिक यांच्यासह पी. एन. पाटील करतात. पूर्वी यात आमदार सतेज पाटील यांचाही समावेश होता. पण श्री. महाडिक यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याने ते बाहेर पडले. तेव्हापासून ते संघाच्या कारभारावर टीका करत आहेत. गेल्या वर्षीच्या सभेला उपस्थित राहून श्री. पाटील यांनी संचालकांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी ३४ प्रश्‍न संघाच्या अार्थिक गैरव्यवस्थापनावर विचारले होते, पण ते आले नाहीत. गेल्यावेळी सभेला हजर राहून जे त्यांनी मिळवले नाही, ते यावेळी न येता महाडिक यांच्या कृतीने त्यांनीच बाजी मारली. 

महाडिक-पी.एन. हे संघाचे गेल्या २०-२२ वर्षांपासून नेतृत्व करतात. पण संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यासपाठीवर हे दोघेही कधी बसत नव्हते. सभेदिवशी संघातर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्‌घाटन करून ते बाहेर पडत होते. पण आजची सभा त्याला अपवाद ठरली. सभा सुरू झाल्यानंतर या दोघांना व्यासपीठावर बघूनच सभासद, कर्मचारी अधिकारी अवाक्‌ झाले. या सभेत ते बोलणार नाहीत असे वाटत असतानाच इतर सर्वांची भाषणे व आभार प्रदर्शन रद्द करून या दोघांना बोलण्याची संधी दिली. महाडिक यांनी भाषण संपत असतानाच अहवालाचे विषयपत्रिकेचे पान उघडून सर्व विषय मंजूर का? अशी विचारणा केली आणि सभा गुंडाळण्यात आली. 

सहकारी संस्था, मग ती कोणतीही असो, त्यांच्या वार्षिक सभा म्हणजे सभासदांसाठी हक्काचे व्यासपीठ. त्यात ‘गोकुळ’ची सभा म्हणजे संस्था प्रतिनिधींच्या अडचणी संचालकांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम. यापूर्वी कै. आनंदराव पाटील-चुयेकर असो किंवा अरुण नरके अध्यक्ष असताना सभेला उपस्थित प्रत्येकाच्या भावना ऐकून घेतल्या जात होत्या. चुकले असले तर त्यात दुरूस्तीचे आश्‍वासन यापुर्वी दिले जायचे. गेल्यावर्षीही सभेला आमदार सतेज पाटील उपस्थित होते, त्यांनी प्रश्‍नांचा भडीमार केला, त्याला प्रत्युत्तर देताना अध्यक्ष विश्‍वास पाटील यांची दमछाक झाली. पण श्री. नरके यांनी उठून माईकचा ताबा घेतला आणि किल्ला लढवला. पण यावेळी तसे काही घडलेच नाही. आपल्या भाषणात ‘गोकुळ’ च्या वैभवशाली कामगिरीचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या श्री. श्री. महाडीक यांनीच अनपेक्षितपणे अहवाल वाचन करून विषय मंजुरीचा नारा देऊन सर्वांना धक्काच दिला. 

वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करण्याचा अधिकार सहकार कायद्यानुसार सचिव यांना आहे. अहवाल वाचनाबरोबरच इतिवृत्त लिहण्याचे कामही तेच करतात. श्री. महाडीक हे संघाचे संचालकही नाहीत, ते कर्मचारी असण्याचाही संबंध नाही. पण बहुमताच्या जोरावर त्यांनी स्वतःच या सर्व भुमिका वठवून संघाच्या परंपरेला गालबोट लावले. राजाराम साखर कारखान्यात गेल्यावर्षी जे घडले तोच इतिहास ‘गोकुळ’ मध्ये यावर्षी पहायला मिळाला. 

जशास तसे उत्तर-विश्‍वास पाटील
झालेल्या प्रकाराबाबत संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले,‘घडलेला प्रकार योग्यच आहे. हे जशास तसे त्यांना (सतेज पाटील) उत्तर आहे. सभासदांना संघाचा कारभार यापुर्वीच माहीत आहे.’ मग ही सभा घेण्यामागचे कारण काय ? या प्रश्‍नावर मात्र ते निरूत्तर झाले. 

सभा बेकायदेशीर ठरणार ? 
वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन, विषय पत्रिकेवरील विषय वाचन, त्यावरील चर्चा किंवा निर्णय घेण्याचे अधिकार सहकार कायद्यानुसार सचिव, अध्यक्ष किंवा संचालकांना आहेत. पण यापैकी काहीही न झाल्याने ही सभा बेकायदेशीर ठरण्याची शक्‍यता आहे. विरोधकांकडून सभेच्या कामकाजाचे व्हीडीओ शुटींग उपलब्ध करून त्याआधारे न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. 

संचालकांचे तोंडावर बोट
या घडलेल्या प्रकाराबाबत बहुतांशी ज्येष्ठ संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. गेल्या वेळच्या सभेत भावनाविवश होऊन संघ वाचवण्याचे आवाहन करणारे अरुण नरके यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. एका संचालकांनी मात्र हा प्रकार म्हणजे संघाच्या वैभवशाली परंपरेला काळिमा फासणारी घटना असल्याचे सांगितले. एका संचालकांनी तर विरोधक सोडाच, आमची माणसे आम्हाला शिव्या घालून गेली, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

विरोधक न येता जिंकले
गेल्या वर्षी सभेला हजर राहून जे आमदार सतेज पाटील यांचे काम झाले नाही, ते या वेळी गैरहजर राहून झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या वेळी श्री. पाटील सभेला हजर होते, त्यावेळी विश्‍वास पाटील यांनी त्यांना लेखी प्रश्‍न विचारा असे सांगितले. त्यावेळी श्री. नरके यांनी आमदार पाटील यांना शांत केले. या वेळी तर ३४ प्रश्‍न लेखी विचारले होते. सभा ज्या पद्धतीने झाली ते पाहता या प्रश्‍नातील आरोप खरे आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

सभा बेकायदेशीर ठरणार? 
वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन, विषयपत्रिकेवरील विषय वाचन, त्यावरील चर्चा किंवा निर्णय घेण्याचे अधिकार सहकार कायद्यानुसार सचिव, अध्यक्ष किंवा संचालकांना आहेत. पण यापैकी काहीही न झाल्याने ही सभा बेकायदेशीर ठरण्याची शक्‍यता आहे. विरोधकांकडून सभेच्या कामकाजाचे व्हिडिओ शूटिंग उपलब्ध करून त्याआधारे न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. 

 

Web Title: kolhapur news gokul general body meeting