‘गोकुळ’ वार्षिक सभेच्या प्रोसिडिंगमध्ये ‘भेसळ’

सुनील पाटील
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  गोकुळच्या वार्षिक सभेतील ठरावाचे वाचन अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केले असल्याचे प्रोसिडिंग दुग्ध आयुक्तांना पाठविले आहे. गोकुळची सभा सुरू झाल्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ठरावाचे वाचन केले. त्यानंतर सभा कशी गुंडाळली, हे जगजाहीर असताना प्रोसिडिंगमध्ये भेसळ करून ते दूध आयुक्तांना पाठविले आहे.  

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सभा १५ सप्टेंबरला झाली. अध्यक्षांचे भाषण झाले. इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ठरावाचे वाचन होईल आणि सभासदांच्या प्रश्‍नाला उत्तरे दिली जातील, अशी अपेक्षा असताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करून अहवालातील १ ते ११ ठराव मंजूर करा? अशी विचारणा केली. पुढे बसलेल्या सभासदांनी मंजूर म्हटल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता किंवा पूर्वसूचना न देताच ध्वनिक्षेपकावर राष्ट्रगीत लावून सभा संपल्याचे जाहीर केले.

वास्तविक अध्यक्ष, कार्यकारी संचालक किंवा सचिवांनी वाचन करावे लागते; मात्र ठरावाचे वाचन श्री. महाडिक यांनी केल्याने ही सभा रद्द करण्याची मागणी होऊ लागली. आता हे प्रकरण अंगाशी येणार म्हटल्यानंतर गोकुळने सभासदांसमोर झालेली सभा आणि कागदावर रंगवलेल्या सभेत तफावत दिसून आली आहे. याचाच आधार घेऊन दुग्ध विभागात ज्यांनी तक्रार केली, त्यांनी या सभेचे पहिल्यापासून शेवटपर्यंत झालेल्या कामकाजाचे व्हिडिओ चित्रण करून सभेचा पुरावा ठेवला आहे. 

याशिवाय ही सभा ऑनलाईनच्या माध्यमातूनही प्रदर्शित केली होती. यामध्ये कुठेही अध्यक्षांनी ठराव वाचन केलेले दिसले नाही. तरीही हे ठराव अध्यक्षांनी वाचल्याचे दाखवून सभासदांची आणि सर्वसामान्य दूध उत्पादकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. गोकुळची ही सभा बेकायदा आहे. त्यामुळे सभा पुन्हा घ्यावी लागेल. प्रसंगी संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते, या भीतीनेच चुकीचे प्रोसिडिंग रंगविले जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: Kolhapur News Gokul General body meeting