खोटे इतिवृत्त लिहिणाऱ्यासह सहायक निबंधकावर फौजदारी - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेचे ठराव वाचन अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केल्याचे खोटे प्रोसिंडिंग लिहिणाऱ्यासह सहायक निबंधक (दुग्ध) यांच्यावर फौजदारी करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

कोल्हापूर - ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेचे ठराव वाचन अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केल्याचे खोटे प्रोसिंडिंग लिहिणाऱ्यासह सहायक निबंधक (दुग्ध) यांच्यावर फौजदारी करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ५५ वी वार्षिक सभा १५ सप्टेंबरला झाली होती. ही सभा बेकायदेशीर असून ही सभा पुन्हा घ्यावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली होती. मात्र गोकुळ संचालकांनी सभेचे वाचन गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केल्याचे लेखी उत्तर सहायक निबंधकांना दिले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर श्री. पाटील म्हणाले, ‘‘गोकुळच्या सभेसाठी हजारो सभासद उपस्थित होते. सर्व माध्यमांचे प्रतिनिधीही होते. सभेत विश्‍वास पाटील यांनी नव्हे, तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ठराव वाचन करून मंजूर करून घेतले आहेत. याला हजारो सभासद व माध्यम प्रतिनिधीही साक्षी आहेत. तरीही, सहायक निबंधकांना चुकीची आणि खोटी माहिती देण्याचे काम गोकुळ संचालकांनी केले आहे. याचीही चौकशी करावी, यासाठी दुग्ध विभागातील सहायक निबंधकांना पत्र दिले होते. त्यानुसार त्याची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी दिली होती.

मात्र, सहायक निबंधकांनीही जसा गोकुळने खुलासा दिला आहे, तोच अहवाल विभागीय उपनिबंधकांना देऊन मोठी चूक केली आहे. गोकुळने आपला खुलासा दिला असला तरीही वस्तुस्थिती काय आहे, याचे मत सहायक निबंधकांनी दिले पाहिजे होते. मात्र, सहायक निबंधकांचे कार्यालय हे गोकुळ कार्यालयाशेजारी असल्याने संबंधित अधिकाऱ्यावर गोकुळचा ‘दबाव’ असावा. त्यामुळेच त्यांनी चुकीचा अहवाल विभागीय उपनिबंधकांना दिला आहे.

चुकीचा अहवाल आणि स्वतः त्याची पडताळणी न करता अहवाल सादर करणाऱ्या सहायक निबंधकांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. या वेळी, बाबासाहेब देवकर, मारुती जाधव-गुरुजी, किशोर पाटील, अंजनाताई रेडेकर, सदाशिव चरापले, करणसिंह पाटील, बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब शिंदे, शंकर पाटील, बाबासाहेब बोरगावे उपस्थित होते. 

गोकुळच्या सभेत महाडिक यांनी केलेली कृती कागदावर विश्‍वास पाटील यांच्या नावावर दाखवली आहे. सर्वांना अहवाल मिळाला का? अजेंड्यावर १ ते ११ विषय मंजूर काय? अशी विचारणा महाडिक यांनी नव्हे, तर विश्‍वास पाटील यांनी केल्याचा खुलासा गोकुळने केला आहे. तसेच, सभाध्यक्षांनी सभा संपल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू केले, असा खोटा खुलासा गोकुळने केला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका
संघाच्या सभेसाठी सहकार विभागाचा प्रतिनिधी म्हणून गोकुळने निमंत्रण दिले होते. मात्र, या सभेला अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यामुळे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

सभासदांच्या डोळ्यांत धूळफेक 
गोकुळच्या सभेतील सर्व गैरप्रकार हजारो सभासदांनी डोळ्यांनी पाहिला आहे. तरीही, खोटा खुलासा देण्यासाठी गोकुळ संचालकांना कोणाचे तरी बळ मिळाले आहे. मात्र, कोणाचे तरी ऐकून गोकुळच्या संचालकांनी हजारो सभासदांच्या डोळ्यांत धूळफेक केली असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपचा संचालक म्हणून?
गोकुळ संघात सभेचे ठराव बदलण्याचा प्रकार घडतो, हे दुर्दैवी असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे केवळ गोकुळमध्ये भाजपचा संचालक आहे म्हणून गप्प आहेत का, असा सवालही सतेज पाटील यांनी केला.

Web Title: Kolhapur News Gokul General Body Meeting Dispute