खोटे सोने देऊन सराफाला गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सांगली - दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे खोटे सोने देऊन त्या बदल्यात दीड तोळ्याचे खऱ्या सोन्याचे दागिने घेऊन एका जोडप्याने शहरातील सराफ अनिल वामन गडकरी यांना ५१ हजारांना फसविल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

सांगली - दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे खोटे सोने देऊन त्या बदल्यात दीड तोळ्याचे खऱ्या सोन्याचे दागिने घेऊन एका जोडप्याने शहरातील सराफ अनिल वामन गडकरी यांना ५१ हजारांना फसविल्याची घटना उघडकीस आली. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

सराफ पेठेत अनिल वामन गडकरी यांचे सराफी दुकान आहे. दुकानात एक जोडपे दोन दिवसांपूर्वी दुपारी दीडच्या सुमारास आले होते. त्या वेळी दुकानात गर्दी होती. जोडप्याने १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गडकरी यांना दिली. त्याची किंमत करून त्या बदल्यात सोन्याचा नेकलेस आणि एक अंगठी घेणार असल्याचे सांगितले. गडकरी यांनी चेनची किंमत करून जोडप्याला ५१ हजार ३१५ रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस आणि अंगठी दिली. जोडप्याने नावे साक्षी शिंदे आणि विजय शिंदे (रा. बुधगाव) असे सांगितले होते. रात्री नऊच्या सुमारास गडकरी दुकानाचा हिशेब करीत असताना त्यांना 
शिंदे जोडप्याने दिलेले सोने बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने दुकानातील सीसीटीव्हीमध्ये या जोडप्याचे छायाचित्र पाहिले. 

गडकरी म्हणाले, ‘‘दुसऱ्या दिवशी बुधगावात जाऊन या जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र त्यांची नावे बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्हीतील छायाचित्र सराफ असोसिएशनच्या व्हॉट्‌सअप ग्रुपवर टाकून त्यांची माहिती टाकली होती. काही वेळाने कऱ्हाडमधून एका सराफ व्यावसायिकाचा फोन आला. त्याने हे जोडपे आपल्या दुकानात अर्ध्या तासापूर्वीच येऊन गेल्याचे सांगितले.

कऱ्हाडमधील आणखी एका दुकानातही हे जोडपे गेले होते.’’
अनिल गडकरी यांनी शहर पोलिसांत या फसवणुकीची फिर्याद देऊन हे जोडपे कऱ्हाडमध्ये येऊन गेल्याची माहिती दिली. मात्र शहर पोलिसांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. उलट दुपारी बाराला फिर्याद देण्यास गेलेल्या गडकरींची फिर्याद सायंकाळी सहाला घेण्यात आली.

जोडप्याकडे बनावट सोन्याच्या चेन
गडकरी यांनी शिंदे जोडप्याने दिलेल्या चेनचे छायाचित्र कऱ्हाडच्या सराफांना पाठविले होते. त्या वेळी अशाच तीन-चार बनावट चेन या जोडप्याकडे असल्याचे त्यांना समजले. गर्दीचा फायदा घेऊन हे जोडपे बनावट चेन देऊन खऱ्या सोन्याचे दागिने घेते, अशी त्यांची फसवणुकीची पद्धत असावी.

Web Title: Kolhapur News gold theft case