पानसरे हत्या प्रकरणातील मोटारसायकलचा पत्ता नाहीच

लुमाकांत नलवडे
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - तीन वर्षांनंतरही ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागलेली नाही. उलट संशयावरून अटक केलेल्या दोघांनाही जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर पुन्हा संशयाची सुई येत आहे. ठोस सोडाच; पण मोटारसायकलचाही पत्ता पोलिस यंत्रणेला का लागत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. 

कोल्हापूर - तीन वर्षांनंतरही ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागलेली नाही. उलट संशयावरून अटक केलेल्या दोघांनाही जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर पुन्हा संशयाची सुई येत आहे. ठोस सोडाच; पण मोटारसायकलचाही पत्ता पोलिस यंत्रणेला का लागत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. 

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही काही फरारी आरोपींवर आरोपपत्र दाखल 
करून पोलिस नामानिराळे झाल्याचे दिसून येते. एका व्यक्तीची नव्हे तर विचारांची हत्या म्हणून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येकडे  पाहिले जाते. केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित हा तपास नसून राज्य आणि देशात याचे धागेदोरे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच एसआयटीने थेट गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात छापा टाकून माहिती घेतली. त्यांच्या हाती काय लागले किंवा नाही हा भाग दुय्यम असला तरीही पोलिसांचा तपास केवळ चार्जशीटपर्यंतच थांबल्याचे दिसून येते.

तपासातून न्यायालयात संशयित आरोपींची नावे देण्यात आली. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे दोघांना अटक करण्यात आली. सध्या दोघांचीही जामिनावर मुक्तता झाली आहे. गोवा बॉम्बस्फोटात फरारी असलेल्यांची नावे या खटल्यात संशयित आरोपी म्हणून दाखल झालेली आहेत. इथंपर्यंत तपास यंत्रणा सक्षम राहिली. मात्र मोटारसायकल कोठे आहे, ती कोणाची याबाबत पोलिसांकडे ठोस काहीच नाही. तीन वर्षांनंतरही मोटारसायकल जप्त करणे पोलिसांना शक्‍य झाले नाही.

विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने जतमध्ये गोळीबारासाठी वापरलेली ‘ट्रॅक्‍स’ जीप जप्त करून आणली. पण त्यांना मोटारसायकलचा पत्ता लागला नाही. तीन वर्षांनंतरही मोटारसायकल का मिळत नाही? येथे पोलिसांच्या तपासावर संशयाची सुई फिरते. पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे, कार्यकर्ते दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, यांच्यासह इतरांनी मात्र ‘निर्भय वॉक’द्वारे पानसरे यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली आहे. पानसरे यांच्या मृत्यूच्या दिवसाची आठवण या निमित्ताने होत आहे. तपासावर खुद्द न्यायालय लक्ष ठेवून आहे. त्यामुळे किमान पोलिस यंत्रणेला काही ना काही तरी हालचाली कराव्या लागत आहेत. अन्यथा तपास सुरू आहे, पण पुढे काही मिळत नाही, अशी स्थिती झाली असती. 

ही महाराष्ट्राची शोकांतिका - मेघा पानसरे
विचारवंतांचे खून झाल्यावर तीन-चार वर्षे खुनी सापडत नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे शासनाचे अपयश आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. तेसुद्धा याबाबत काहीच सांगत नाहीत. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला ‘मॉर्निंग वॉक’ काढून सरकारला जाब  विचारतोय. मात्र त्याचा परिणाम सरकारवर होत नाही. पानसरे, दाभोलकर अशा विचारवंतांचे खून होऊन सरकार काहीच ठोस तपास करीत नाही, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे.

Web Title: Kolhapur News Govind Panasare Murder Case