पानसरे हत्या प्रकरणातील कारवाईवरील स्थगिती न्यायालयाकडून कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याच्या कारवाईवरील अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली. अद्याप पोलिस तपास सुरू असल्यामुळे ही स्थगिती दिली आहे. 

मुंबई - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याच्या कारवाईवरील अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली. अद्याप पोलिस तपास सुरू असल्यामुळे ही स्थगिती दिली आहे. 

पानसरे हत्येप्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू आहे; मात्र ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी आरोपींचा संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे खटल्याला काही काळ स्थगिती देण्याची मागणी न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यापुढे सरकारच्या वतीने ॲड. अशोक मुंदरगी यांनी केली होती. 

वर्षभरापासून या खटल्याला स्थगिती दिलेली आहे. या खटल्यामध्ये न्यायवैद्यक अहवाल दाखल झाला आहे; त्यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. त्यावर तपास सुरू असल्याची माहिती मुंदरगी यांनी दिली. आरोपींच्या वतीने ॲड. संजीव पुनाळकर यांनी या मागणीला विरोध केला; मात्र पीडित कुटुंब आणि आरोपी या दोघांच्या अधिकारांमध्ये बाधा येता कामा नये, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.

Web Title: Kolhapur News Govind Pansare Murder case