टोकाची ईर्षा, पायाला भिंगरी...

टोकाची ईर्षा, पायाला भिंगरी...

गडहिंग्लज - राजकीयदृष्ट्या संयमी तालुका म्हणून परिचित असलेल्या गडहिंग्लजमधील ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे राजकीय वातावरण मात्र हळूहळू तापत आहे. सर्व ग्रामपंचायतीतील लढती लक्षवेधी आहेतच; परंतु नेसरी, भडगाव, महागाव, बड्याचीवाडी, कडगाव, बटकणंगले, हरळी खुर्द, कडलगे आदी मोठ्या हाय व्होल्टेज गावांमध्ये टोकाची ईर्षा पाहायला मिळणार आहे. कारण, येथे नेते व गटनेत्यांच्या महत्त्वाकांक्षा गुंतल्या असून त्यासाठी कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून गल्लीबोळ हिंडताना दिसत आहेत.

निवडणूक गावपातळीवरची असली तरी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, जनता दलाचे नेते ॲड. श्रीपतराव शिंदे, भाजपचे प्रकाश चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर, हेमंत कोलेकर, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, ताराराणी आघाडीचे अप्पी पाटील, काँग्रेसचे सदानंद हत्तरकी, किसनराव कुराडे, विद्याधर गुरबे, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या प्रतिष्ठेच्या लढती याच मोठ्या गावांमध्ये रंगणार आहेत. 

सतरा सदस्यीय भडगावात सत्तारूढ राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप, ताराराणी व जनता दल एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीने सोबतीला काँग्रेस व स्वाभिमानीला घेतले आहे. शिवसेना व नाराज गट असे सात उमेदवार एकत्र येत नशीब आजमावत आहेत. यामुळे येथे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सरपंचपद खुला असल्याने त्यासाठी काँटे की टक्कर होणार आहे. महागाव येथे केडीसीसीचे उपाध्यक्ष अप्पी पाटील व गोडसाखर संचालक प्रकाश पताडे गटातच पारंपरिक लढत रंगणार आहे. अनेक वर्षे पाटील गटाकडे असलेली येथील सत्ता गतवेळी पताडे गटाने काढून घेतली. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाटील गट सज्ज झाला आहे. एकेका मताला मोल असलेल्या या गावात खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळेल. या गावात सर्वसाधारण महिलेसाठी सरपंचपद आरक्षित आहे. 

नेसरीत पारंपरिक विरोधक असलेले राष्ट्रवादीचे संध्यादेवी कुपेकर व भाजपचे हेमंत कोलेकर गट एकत्र आले आहेत. येथे राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस आघाडीला शिवसेना व अन्य गट एकत्र येत ग्रामविकास पॅनेलद्वारे आव्हान दिले आहे. येथील लढत कुपेकर, कोलेकरांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाते. येथील सरपंचपद खुला असल्याने आणखी रंगत वाढणार आहे. गडहिंग्लज शहरालगतच्या बड्याचीवाडी गावात लढाईपूर्वीच राष्ट्रवादीला नामुष्की पत्करावी लागली आहे. येथील १७ सदस्यांपैकी भाजप व जनता दलाचे आठ सदस्य बिनविरोध झाल्याने येथे राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी धडपडावे लागणार आहे. येथे सरपंचपद ओबीसी असून त्यासाठी दोन्ही पॅनेलने कंबर कसली आहे.

कडगावात राष्ट्रवादीतच दोन गट पडले आहेत. सदानंद पाटील, बाळासाहेब देसाई गटाने भाजपला सोबत घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्याविरोधात नेताजी पाटील, राजू पाटील गट, जनता दल, काँग्रेस एकत्र आली आहे. कौलगे येथे भाजपचे नेते डॉ. शहापूरकर यांच्या प्रतिष्ठेची लढत लक्षवेधी ठरणार आहे. या गावांसह बटकणंगले, हरळी खुर्द, कडलगे, मुगळी, बेकनाळ, करंबळी, हिटणी येथील चुरशीच्या लढतीकडेही तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. या गावांमधील गावगड्याच्या भूमिकेतील कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून ईर्षेने प्रचारात उतरले आहेत. कोणत्याही स्थितीत आपल्याच पक्षाचा झेंडा लावण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. स्थानिक नातीगोती, भावकीतील ईर्षाही या निमित्ताने पहायला मिळणार आहे.

नेसरी गट लक्षवेधी
नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्या संध्यादेवी कुपेकर व त्यांचे पुतणे शिवसेनेचे नेते संग्राम कुपेकर यांच्या गटातील लढती हाय व्होल्टेजच्या असणार आहेत. या गटात छोटी गावे असली तरी दोन गटांमधील टोकाची ईर्षा पाहता लढती रंगतदार होणार आहेत. दोन्ही कुपेकरांतील वाद तालुक्‍याला सर्वश्रुत असल्याने या गटातील गावांमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com