पाऊस पैशाचा अन्‌ ‘गेमां’चाही...!

संभाजी गंडमाळे 
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

शहरातील लोकं म्हणतात, ‘‘गावाकडची लोकं लय प्रेमळ आणि स्वच्छ मनाची.’’ तशी ती आहेतच. पण आता ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात. आता या अन्‌ बघा त्यांच्या गेमा....निवडणूक जाहीर झाली आणि हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला असून प्रत्यक्षात अशा ‘गेमा’ आणि पैशाचा पाऊसच पडणार आहे. 

शहरातील लोकं म्हणतात, ‘‘गावाकडची लोकं लय प्रेमळ आणि स्वच्छ मनाची.’’ तशी ती आहेतच. पण आता ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात. आता या अन्‌ बघा त्यांच्या गेमा....निवडणूक जाहीर झाली आणि हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला असून प्रत्यक्षात अशा ‘गेमा’ आणि पैशाचा पाऊसच पडणार आहे. 

शहराशेजारची पाचगाव, उचगाव, वडणगे ही गावं म्हणजे कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदार संघातील प्रमुख आणि मोठ्या मतदार संख्येची गावं. साहजिकच या गावांतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि त्यातही सरपंच पदासाठी सुरू झालेली रणधुमाळी आता चांगलीच तापली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय रोज सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात ‘उंबरा टू उंबरा’ प्रचारावर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे आणि शहर व परिसरातील बहुतांश हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यंदाच्या निवडणुकांत पहिल्यांदाच जाहीर सभांचे नियोजनही 
सुरू झाले आहे. 

असे आहे नियोजन
सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी दररोज एक प्रभाग पिंजून काढण्यावर भर दिला आहे. त्यांच्यासोबत त्या त्या प्रभागातील उमेदवारांच्याही प्रचार फेऱ्या सुरू आहेत. त्याशिवाय एकाच वेळी सर्व प्रभागांत प्रचार सुरू राहील, अशी यंत्रणा कार्यकर्त्यांनी राबवली आहे.  

काँग्रेस व सेना-भाजपही
सरपंचपदासाठी पाचगावात भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेत सरळ लढत आहे तर उचगावात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यात स्वतंत्रपणे हे दोन गट रिंगणात उतरले आहेत. वडणगेत तर शिवसेना आणि काँग्रेसप्रणित आघाड्यांत सरळ 
लढत आहे. 

ही लढत आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे. एकूणच या साऱ्या लढती काटाजोड होणार असून बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी सर्वच आघाड्यांनी जोरदार तयारी केली आहे. 

सोशल मीडियावर ट्रेंडींग
यंदाच्या निवडणूकीत सोशल मीडियाचा अधिक वापर झाला असून दररोज प्रचाराचा किमान एक व्हिडिओ आणि लक्षवेधी आवाहन अधिकाधिक व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर शेअर केले जावू लागली आहेत. ‘सैराट’च्या आर्ची आणि परश्‍यासह विविध सेलीब्रिटी या व्हिडिओज्‌मधून मतदारांना आवाहन करू लागले आहेत. प्रत्येक प्रभागाचेही स्वतंत्र व्हॉटस्‌ ॲप ग्रुप तयार झाले आहेत. प्रचारासाठी ‘थीम साँग’ ही संकल्पना यंदा पहिल्यांदाच अनुभवायला मिळते आहे. त्याशिवाय आतापासूनच मतदार याद्यांतील मतदारांची संपूर्ण माहितीही सोशल मीडियावरून दिली जावू लागली आहे. ग्रामपंचायतींच्या नावाने फेसबुक पेजीस सुरू झाली असून त्यावर आपापल्या उमेदवारांच्या ट्रेंडींगवर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे.

Web Title: Kolhapur news Grampanchayat Election