निवडणूक गावची; धुरळा पुणे-मुंबईत!

अजित माद्याळे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

गडहिंग्लज -  तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वातावरण तापत चालले आहे. एकेक मत मिळवण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. तालुक्‍यातील निवडणूक जाहीर झालेल्या बहुतांशी गावातील मतदार रोजगारानिमित्त पुणे-मुंबई स्थित आहेत. ही मते कॅश करण्यासाठी उमेदवार आतापासूनच धडपड करीत असून, मते फिक्‍स करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. यामुळे गावच्या निवडणुकीचा धुरळा पुणे-मुंबईतही उडत आहे.

गडहिंग्लज -  तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वातावरण तापत चालले आहे. एकेक मत मिळवण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. तालुक्‍यातील निवडणूक जाहीर झालेल्या बहुतांशी गावातील मतदार रोजगारानिमित्त पुणे-मुंबई स्थित आहेत. ही मते कॅश करण्यासाठी उमेदवार आतापासूनच धडपड करीत असून, मते फिक्‍स करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. यामुळे गावच्या निवडणुकीचा धुरळा पुणे-मुंबईतही उडत आहे.

सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा गावच्या निवडणुकीत लक्षणीय चुरस असते. नात्यागोत्यातील लढाईही या निमित्ताने रंगतदार ठरते. या निवडणुकीमध्ये एकेका मताला महत्त्व असते. सात सदस्यीय गावात शंभर ते दोनशे मतांचा एक प्रभाग तर मोठ्या गावात दोनशे ते पाचशे मतांचा एक प्रभाग असतो. दोन, तीन किंवा अधिकाधिक चार उमेदवार एकेका वॉर्डात उभे असतात. यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या मतावर विजयाचे गणित अवलंबून असते. म्हणूनच रिंगणातील उमेदवार ही मते फिक्‍स करण्यासाठी विशेष परिश्रम घेत असतात. 

वॉर्डातील कोणता मतदार कुठे आहे, याची माहिती मिळविली जात आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या वातावरणात व्हॉटस्‌ ॲप, फेसबुकद्वारे त्या मतदारांशी संपर्क साधण्याची धडपड तर सुरू आहेच; याशिवाय त्या मतदाराला मतदानासाठी कसे खेचून आणायचे, याची गणितेही आतापासूनच मांडली जात आहेत. तालुक्‍यातील निवडणूक जाहीर झालेल्या महागाव, तावरेवाडी, हरळी खुर्द, येणेचवंडी, सरोळी, काळामवाडी, डोणेवाडी, हिडदुग्गी, हडलगे, जखेवाडी, बटकणंगले, कौलगे, कुमरी, बेकनाळ, करंबळी, खमलेहट्टी, नेसरी, सांबरे, हसूरवाडी, तारेवाडी, बिद्रेवाडी, वैरागवाडी, कुंबळहाळ, शिप्पूर तर्फ नेसरी, बड्याचीवाडी, कडगाव, भडगाव आदी गावांतील बहुसंख्य तरुण व प्रौढ मतदार रोजगारानिमित्त पुणे, मुंबई, कोल्हापूर, बेळगाव, गोवा आदी भागात आहेत. विशेष करून पुणे व मुंबईतच अधिक मतदारांचा भरणा आहे. 

संबंधित गावांतील बाहेर असलेल्या तरुण मतदारांचा व्हॉटस ॲपवर स्वतंत्र असा ग्रुप कार्यरत आहे. त्या माध्यमातूनही रिंगणातील पॅनेल, उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. या निमित्ताने मुंबई, पुणे येथील मतदारांच्या ग्रुपमध्ये गावच्या निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे. विजयापर्यंत पोचण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने त्यासाठी उमेदवार बाहेरच्या मतांवर डोळा ठेवून त्यादृष्टीने नियोजन करीत आहे. यासाठी नातेगोते, मित्रमंडळींचा या मतांसाठी वापर केला जात आहे. 

आपला माणूस
मुंबई, पुण्यातील लोकांना विविध कामांसाठी गावात आपल्या हक्काचा माणूस लागतो. त्यासाठी ‘आपला माणूस’ म्हणून कोणाला ग्रामपंचायतीत पाठवायचे, याची ताकद या मतदारांत आहे. छोट्या गावातील सरपंचपदाचा निकालही बाहेरच्या मतांवर अवलंबून आहे म्हटल्यासही वावगे ठरणार नाही. म्हणूनच या मतांचे मोल जाणून पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी रिंगणातील उमेदवार या मतदारांचा पाठलाग करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  

सर्व नीतींचा अवलंब...
निवडणूक जाहीर झालेल्या गावांमध्ये सर्रास पाच ते पंचवीस टक्‍क्‍यांपर्यंतचे मतदार बाहेरगावी आहेत. यामुळे ही मते आपल्या पदरात पाडून घेण्याची व्यूहरचना आखली जात आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला जात आहे. काही गावांतील पॅनेलप्रमुख, उमेदवारांनी संबंधित मतदारांशी संपर्क साधून येण्याजाण्याच्या प्रवास खर्चाची रक्कमही त्यांच्या बॅंक खात्यावर आरटीजीएस पद्धतीने जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा आहे. याशिवाय या मतदारांना खूश करण्यासाठी विविध सवलतीही दिल्या जात असल्याचे समजते.

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election