शब्द विकासाचा,‘लक्ष्मी’दर्शनाचाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - दिवसा प्रचार आणि रात्री जोडण्या असे चित्र गावोगावी नजरेस पडत आहे. प्रत्येक पॅनेलच्या नावात ‘ग्रामविकास’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख. निवडणूक लागली की विकास आठवतो. इतके दिवस कुठे होता? असाच सवाल मतदार करू लागले आहेत.

कोल्हापूर - दिवसा प्रचार आणि रात्री जोडण्या असे चित्र गावोगावी नजरेस पडत आहे. प्रत्येक पॅनेलच्या नावात ‘ग्रामविकास’ या शब्दाचा आवर्जून उल्लेख. निवडणूक लागली की विकास आठवतो. इतके दिवस कुठे होता? असाच सवाल मतदार करू लागले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीचा दिवस जवळ येत आहे, तशी प्रचार यंत्रणा गतिमान होत आहे. पुलाची शिरोली, उचगाव, सरनोबतवाडी या गावांचा विस्तार पाहता येथे ग्रामपंचायत आहे, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. मूळ गावठाण जेवढे आहे, त्याच्या दुप्पट लगतची वस्ती वाढली. उपनगर विकास आघाडी स्थापन झाली. पूर्वी ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की, राजकीय ईर्षा ही गावाच्या फाट्यापर्यंत मर्यादित असायची. शहरालगतच्या गावांचा इतका विस्तार झाला, की मूळ गावठाण कुठले आणि नव्याने विस्तारित झालेला भाग कोणता, हे समजत नाही. 

शिरोलीत पोस्टर वॉर
पुलाची शिरोली येथे सरपंचपदासाठी तीन उमेदवार प्रभागांतील सतरा जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. महाडिक विरूद्ध खवरे अशी पारंपरिक लढत आहे. शिरोली फाट्याजवळच पोस्टर वॉर रंगले आहे. गावात लोक जाहीरपणे काही बोलत नाहीत, पण मार्मिक भाष्य करायलाही मागेपुढे पाहत नाही. गाव तसे मोठे. दिवाळी तोंडावर आहे, ग्रामस्थ सणाच्या गडबडीत आहेत. प्रचाराला कुणी आले तर निवेदन स्वीकारून ‘काही काळजी नको, चिन्ह लक्षात आहे’ असे सांगून वेळ मारून नेली जाते. मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसे शिरोलीचे वातावरण तापू लागले आहे. निकालादिवशीच या जोर-बैठकांचा किती उपयोग झाला हे स्पष्ट होईल. 

उचगावात विधानसभेची रंगीत तालीम
उचगाव राजकीयदृष्ट्या ईर्षेचे गाव. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात निर्णायक ठरते तेच उचगावच. निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी महाडिक गट विरूद्ध आमदार सतेज पाटील गट यांच्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही रंगीत तालीम आहे. पाटील गटाने शिवसेनेशी युती केली आहे. दोन्ही गटांनी जुन्या चेहऱ्याऐवजी नव्यांनाच संधी दिली. पॅनेल टू पॅनेल मतदान व्हावे, यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. 

सरनोबतवाडीत बहुरंगी लढती
सरनोबतवाडीत वेगवेगळ्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. सरनोबतवाडी विकास आघाडी, ग्रामविकास, परिवर्तन आणि संघर्ष अशी बहुरंगी लढत आहे. सायंकाळी सहानंतर प्रचाराला येथे खऱ्या अर्थाने गती येते. ‘भावा, भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहे’, असा उल्लेख एका उमेदवाराच्या प्रचार फलकावर आहे.

उजळाईवाडीत महाडिक-सतेज गटात लढत
उजळाईवाडी येथे आमदार सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटात लढत आहे. कोपऱ्याकोपऱ्यावर पोस्टर वॉर रंगले आहे. उपनगर विकास आघाडी रिंगणात आहे. सगळेच जण गावाच्या विकासाचा शब्द देत आहेत. सायंकाळी प्रचार थांबतो न थांबतो तोपर्यंत रात्रीच्या जोडण्यांना सुरवात होते. गावातील प्रमुख चौक हे चर्चेचे मुख्य ठिकाण बनले आहे. 

शिट्टी चिन्ह गमतीचाच विषय
अलीकडे शिट्टी हे चिन्ह गमतीचाच विषय ठरले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांचे शिट्टी हे चिन्ह होते. पोरं शिटी वाजवतच गावभर फिरायची. या निवडणुकीत असेच चित्र दिसते. पोरं शिटी का वाजवतात हेच ध्यानात येत नाही.

Web Title: Kolhapur News Grampanchayat election