सकाळी शुकशुकाट, सायंकाळी जोर

सकाळी शुकशुकाट, सायंकाळी जोर

कोल्हापूर - सुगीचे दिवस असल्याने शेतात कामाची लगीनघाई, भात काढणी, कापणीबरोबरच भुईमुग काढण्याच्या कामात केवळ गावगडी नव्हेच तर उमेदवारही कुटुंबासह व्यस्त, गावांत निवडणूक पण त्यापेक्षा ही कामे महत्त्वाची, त्यात जनावरांना चारा हवा त्यासाठीची लगबग, मग दुपारी विश्रांती आणि संध्याकाळनंतर प्रचारात सहभाग. पन्हाळा, शाहुवाडी तालुक्‍यातील निवडणूक असलेल्या बहुंताशी गावांत हेच चित्र.

त्यामुळे सकाळी गावांत शुकशुकाट आणि संध्याकाळनंतर प्रचाराचा किलबिलाट पाहायला मिळाला. शाहुवाडी तालुक्‍यातील काही गावांत तर सायंकाळनंतर ढगफुटीसदृश्‍य पावसाने हजेरी लावून प्रचाराची दाणादाण उडवून दिली. 

भेडसगाव, सरूड, कापशी या गावांत आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांच्या सभा होत्या, पण या सभांवर पावसाचे पाणी फिरले. पावसाने मंडप उध्दवस्त झाले,परिणामी सभा तर गुंडाळण्याची वेळ आलीच पण प्रचारातही पावसाचा व्यत्यय आला. 

पन्हाळा तालुक्‍यात ५० तर शाहुवाडी तालुक्‍यातील ४९ गावांत निवडणुका आहेत. हे दोन्ही तालुके तसे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे.पन्हाळा तालुक्‍याचा काही भाग आमदार चंद्रदीप नरके यांच्या विधानसभा मतदारसंघात तर काही भाग आमदार सत्यजित पाटील यांच्या मतदारसंघात आहे. त्यात आसुर्ले, कसबा बोरगांव, सरूड, भेडसगांव, कापशी, चव्हाणवाडी आदी नेत्यांच्या गावांतही निवडणूक सुरू आहे. गावांवर आपलीच सत्ता रहावी यासाठी या नेत्यांनीही गावांतच तळ ठोकला आहे.

श्री. नरके यांचे बोरगांवच्या काही जागा बिनविरोध झाल्या, पण सरपंच पदासाठी त्यांच्याच दोन गटात लढत आहे. आसुर्लेत जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर विरूध्द सरनोबत सरकार असा सामना आहे.शाहुवाडी तालुक्‍यात मात्र काही गावांत कोरे विरूध्द कोरे तर बहुंताशी ठिकाणी कोरे विरूध्द सरूडकर गट अशीच लढत आहे. कोरे यांच्या साथीला काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड तर सरूडकरांच्या जोडीला राष्ट्रवादीचा गायकवाड गट असे चित्र पाहायला मिळाले. कडवे, शाहुवाडीसारख्या गावांत कोरे विरूध्द कोरे लढतीत भाजपा नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही छबी डिजीटल फलकावर पाहायला मिळाली. 

गावांत निवडणूक असली तरी सकाळपासून गावगडीच काय उमेदवार व त्यांचे कुटुंबियही शेतीच्या कामात व्यस्त दिसले. सद्या सुगीचे दिवस सुरू आहेत, त्यात घरी चार-पाच जनवारे.सुगीचे काम करता करता जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी उमेदवार व कुटुंबियही रानात राबताना दिसले. दुपारपर्यंत रानातील कामे, त्यानंतर न्याहारी, एक तासभर विश्रांती आणि सायंकाळी दुभत्या जनावरांच्या धारा काढल्या गडी प्रचाराच्या कामाला लागला असेच चित्र बहुंताशी गावांत पाहायला मिळाले. त्यात आज शाळा असल्याने प्रचारात किलबिलाट असणारी बच्चे कंपनीही शाळेत अडकून पडली. 

सायंकाळनंतर शाहुवाडी तालुक्‍याला धुवाँधार पावसाने झोडपून काढले. उद्या जाहीर प्रचाराची सांगता असल्याने आज अनेक गावांत प्रचार फेऱ्या, त्यानंतर सभांचे आयोजन करण्यात आले होते. पण पाऊस इतका पडत होता की कार्यकर्तेच काय उमेदवारही बाहेर पडणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली. सरूडमध्ये ग्रामसचिवालयाच्या दारातच आज आमदार सत्यजित पाटील यांची सभा होती, सभेसाठी घातलेला मंडप भिजून चिंब झालेला, सभेसाठी आणलेल्या खुर्च्या एकमेकांवर रचून ठेवलेल्या, पाऊस असल्याने बाहेर चिटपाखरूही नाही, परिणामी सभा, प्रचारफेऱ्या रद्द करण्याशिवाय कार्यकर्त्यांसमोर पर्याय उरला नाही. 

दादा-शेट्टी एकाच फलकावर
सरकारसोबत काडीमोड घेतल्यानंतर स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात रान उठवण्यास सुरूवात केली आहे. पण कडवे (ता. शाहुवाडी) येथे मात्र या दोघांचेही फोटो एकाच पॅनेलच्या डिजीटल फलकावर पाहायला मिळाले. 

यंत्रणाही गतीमान
यावेळी सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे, त्यामुळे मतदान दोन यंत्रावर करावे लागणार आहे. हे मतदान कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे काम निवडणूक यंत्रणेकडून गावोगावी सुरू होते. त्याचबरोबर हे प्रात्यक्षिक दाखवण्याची सोय उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही केली आहे. त्यासाठी आवश्‍यक ते डेमो यंत्र ४५० रूपयाला एक याप्रमाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, या विक्रीलाही मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. 

हॉटेल, धाबे हाऊसफुल्ल
निवडणूक म्हटली की प्रचाराबरोबरच जेवणावळी आलीच. या जेवणावळीसाठी शाहुवाडी, पन्हाळा तालुक्‍यातील मुख्य मार्गावरील हॉटेल सज्ज झाली आहेत. उमेदवारांनी कार्यकर्त्यांना हॉटेलचे पासच दिले आहेत. दररोज एका हॉटेलमध्ये सरासरी २०० लोकांचे पास दिले जातात. त्यामुळे रात्री प्रचार संपला की त्यांना या परिसरातील हॉटेल व धाबे हाऊसफुल्ल पहायला मिळाले. 

विचित्र लढतीचे चित्र
करवीरमध्ये शिवसेना विरूध्द काँग्रेस असे चित्र पहायला मिळाले. पण शाहुवाडीत कोण कोणासोबत हे पॅनेलवरील फोटो बघितल्यानंतर आश्‍चर्य वाटण्यासारखी परिस्थिती होती. शाहुवाडीत खरी लढत माजी मंत्री विनय कोरे विरूध्द आमदार सत्यजित पाटील यांच्यात असली तरी अनेक गावांत कोरे विरूध्द कोरे, सरूडकर विरूध्द त्यांना मानणारा दुसरा गट असेच चित्र पाहायला मिळाले. 

फलकांनी परिसर व्यापलेला
या भागात लक्ष वेधून घेतले ते ठिकठिकाणी लावलेल्या डिजीटल फलकांनी. गावांत मतदान हजार-बाराशे असले तरी चौक नि चौक या डिजीटल फलकांनी व्यापला होता. विधानसभेची निवडणूक वाटावी असे चित्र या फलकामुळे निर्माण झाले होते. सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी तर हे फलकयुध्द जोरात होते. सरूडमध्ये तर गल्ली किंवा चौक असा नाही त्याठिकाणी फलक लावलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com