राधानगरीत निवडणुकीपूर्वीच विजयाचा लावला फलक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

राधानगरी - आचारसंहितेचा भंग करून सरपंच व सदस्यपदाच्या निवडणूक प्रक्रियेपूर्वीच प्रतिस्पर्धी सरपंचपदाच्या उमेदवार व त्यांच्या आघाडीतील उमेदवारांनी स्वतःच विजयी झाल्याचे घोषित करत अभिनंदनाचा फलक लावल्याने संबंधितांची उमेदवारीच रद्द करण्याची मागणी लोकसेवा आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार सावित्री गुरव यांनी तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्याकडे केली.

यासंदर्भातील निवेदन मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविले. राधानगरी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मतदान व मतमोजणी होण्यापूर्वीच तीन दिवस आधी राजर्षी शाहू शहर विकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार कविता शेट्टी व त्यांच्या समर्थकांकडून दुपारी बाजारपेठेत लावलेला हा फलक चर्चेचा विषय ठरला. निवडणुकीपूर्वीच सरपंच व सदस्य विजयी झाल्याचे घोषित करून मतदारांत संभ्रम निर्माण केला. निवडणूक प्रक्रिया व यंत्रणाही अशा फलकामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदारांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक शिरगावकर, लोकसेवा आघाडीप्रमुख राजेंद्र भाटळे, जगदीश लिंग्रस, तानाजी चौगले, राजेंद्र चव्हाण व आघाडीच्या उमेदवारांचा समावेश होता.

तो अनधिकृत फलक काढला असून, संबंधितांकडे नोटिसीद्वारे खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
- शिल्पा ओसवाल, तहसीलदार

Web Title: Kolhapur News Grampanchayat election