हातकणंगलेत १७ ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

हातकणंगले - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले तालुक्‍यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुक मतमोजणीत १६ ठिकाणी सत्ता कायम राहिली तर १७ ठिकाणी सत्तांतर झाले असून सात ठिकाणी संमिश्र सत्ता आल्याचे स्पष्ट झाले.

हातकणंगले - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले तालुक्‍यातील ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुक मतमोजणीत १६ ठिकाणी सत्ता कायम राहिली तर १७ ठिकाणी सत्तांतर झाले असून सात ठिकाणी संमिश्र सत्ता आल्याचे स्पष्ट झाले.

तालुक्‍यामध्ये स्थानिक आघाड्यांबरोबरच जनसुराज्य व आवाडे गटाने आपले अस्तित्व जपल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ग्रामीण भागातून भाजपाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजय साजरा केला.

हातकणंगले तालुक्‍यातील ४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १४३ उमेदवार तर सदस्यपदासाठी १३१८ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार तथा प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, नायब तहसीलदार अर्चना पाटील, निवडणूक नायब तहसीलदार एस. एम. जोशी आदींच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरू झाली. सर्वात पहिला निकाल अंबपवाडी ग्रामपंचायतीचा जाहीर झाला.

४० ग्रामपंचायतींपैकी स्थानिक आघाड्यांना सर्वाधिक १०, पाठोपाठ जनसुराज्यला ९ तर आवाडे पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीला ७ जागांवर विजय मिळविता आला. शेतकरी संघटना व काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळविता आला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या भाजपला ४० पैकी केवळ ४ जागांवर विजय मिळाल्याने ग्रामीण भागात भाजपला पाठबळ नसल्याचे स्पष्ट झाले. दोन ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले. ४० ग्रामपंचायतींपैकी १७ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. तर १६ ठिकाणी सत्ता कायम असून ७ ठिकाणी संमिश्र सत्ता स्थापन झाली आहे.

अंबपवाडीच्या सरपंचपदी स्थानिक भैरवनाथ पॅनेलच्या पार्वती नाईक यांची निवड झाली. हेर्ले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश मिळाले. अश्‍विनी संदीप चौगुले यांची सरपंचपदी निवड झाली. येथे सत्ता कायम राखण्यात संघटनेला यश मिळाले. आळतेमध्ये भाजपप्रणित इंगवले गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत १७ पैकी १५ जागांवर विजय मिळविला. सविता संजय कांबळे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. कासारवाडीमध्ये संमिश्र सत्ता आली असून याठिकाणी जनसुराज्यच्या शोभा मारुती खोत यांची सरपंचपदी निवड झाली आहे. संभापूरमध्येही जनसुराज्यने सत्ता राखत प्रकाश विष्णू झिरंगे यांची सरपंचपदी निवड झाली. एकमेव भादोलेमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. याठिकाणी आनंदा शामराव कोळी यांची सरपंचपदी निवड झाली.

भाजपच्या विजयाची सुरवात खोतवाडीतून झाली. येथे सत्तांतर होऊन भाजपच्या संजय चोपडे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. कापूरवाडीमधील सर्वच्या सर्व ७ सदस्य बिनविरोध निवडून आले. अरविंद बाजीराव पाटील सरपंचपदी विराजमान झाले आहेत. महाडिकप्रणित ताराराणी आघाडीने सावर्डेत सत्ता मिळवली. सुरेखा नितीन चव्हाण यांची सरपंचपदी निवड झाली आहे. साजणीमध्ये सत्तांतर झाले असून आवाडेप्रणित ताराराणी आघाडीने सत्ता मिळवतानाच शारदा कांबळे यांची सरपंचपदी निवड झाली. जुने पारगावमध्ये जनसुराज्यने सत्ता कायम ठेवत अरविंद आनंदा पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. टोपमधून शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि येथून रूपाली रघुनाथ तावडे यांची सरपंचपदी निवड झाली.

घुणकीमध्ये परत जनसुराज्यची सत्ता कायम राहिली असून राजाक्का बाळासोा रासकर यांची सरपंचपदी निवड झाली. नागावमध्ये महाडिकप्रणित ताराराणी आघाडीच्या अरुण मारुती माळी यांची सरपंचपदी निवड झाली. भेंडवडेमध्ये जनसुराज्यने सत्ता कायम राखत काकासो महादेव चव्हाण यांना सरपंचपदाचा बहुमान मिळाला. यळगूडमध्ये आवाडे व मोहिते यांच्या संयुक्त आघाडीने यश मिळवत सुनीता तात्यासो हजारे यांची सरपंचपदी निवड झाली.

नरंदे, मौजे वडगाव, चोकाक व निलेवाडी याठिकाणी सत्तांतर होऊन मौजे वडगावच्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या काशिनाथ सुबराव कांबळे यांची नरंदे येथे रवींद्र रंगराव अनुसे यांची तर निलेवाडीमध्ये जनसुराज्यच्या वर्षा सुभाष माने यांची सरपंचपदी निवड झाली.

मालेमध्ये सत्तांतर होऊन ग्रामविकास आघाडीच्या उमेश पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. रांगोळी, अतिग्रे व अंबपमध्ये सत्ता कायम राहिली असून रांगोळीत आवाडेप्रणित ताराराणी आघाडीच्या नारायण भोसले, अतिग्रेत शाहू आघाडीच्या सागर सर्जेराव पाटील तर अंबपमध्ये जनसुराज्यच्या बाळासो अंबपकर यांची सरपंचपदी निवड झाली.

लक्ष्मीवाडीत शिवसेनेने सत्ता कायम ठेवत रामदास हांडे यांची सरपंचपदी निवड झाली. इंगळीमध्ये आवाडेप्रणित ताराराणी आघाडीने सत्ता कायम ठेवत शालन रावसो पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. चावरेमध्ये सत्तांतर होऊन जनसुराज्यच्या शारदा गुरव या सरपंचपदी विराजमान झाल्या. तळसंदेमध्ये अपक्ष सरपंचाची निवड होऊन अमरसिंह रंगराव पाटील यांची सरपंचपदी निवड झाली.

रेंदाळमध्ये आवाडे गटाला धक्का बसला असून याठिकाणी सेना-भाजपच्या विजय बाबूराव माळी यांची सरपंचपदी निवड झाली. हिंगणगावमध्ये सत्तांतर होऊन राष्ट्रवादीच्या शीला अनिल पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. मजले गावात संमिश्र अवस्था निर्माण झाली असून सिकंदर कोठावळे यांची सरपंचपदी निवड झाली.

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या प्रसाद खोबरे यांच्या तारदाळमध्ये सत्तांतर होऊन महालक्ष्मी परिवर्तन आघाडीच्या यशवंत वाणी यांची सरपंचपदी निवड झाली तर कोरोचीमध्ये आवाडे गटाने सत्ता कायम राखत रेखा अभिनंदन पाटील यांची सरपंचपदी निवड झाली. तळंदगेमध्ये आवाडे गटाच्या जयश्री भोजकर यांची सरपंचपदी निवड झाली.

नवे पारगावमध्ये जनसुराज्यने सत्ता कायम राखत प्रकाश देशमुख यांची सरपंचपदी निवड झाली. पट्टणकोडोलीमध्ये आवाडे गटाने सत्ता राखत शोभा शिंदे यांची सरपंचपदी निवड झाली. नगरपंचायत स्थापनेसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकूनही अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेस सामोरे गेलेल्या हातकणंगलेमध्ये अपक्ष उमेदवार रोहिणी गुरुदास खोत यांची सरपंचपदी निवड झाली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरोलीमध्ये महाडिक गटाचे पानिपत झाले असून याठिकाणी विरोधी शाहू स्वाभिमानी आघाडीने १७ पैकी ९ जागा जिंकल्या असून सरपंचपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील गटाचे कट्टर समर्थक शशिकांत खवरे यांची निवड झाली आहे.

दोघांना समसमान मते
इंगळीमध्ये प्रदीप भातमारे व आनंदा भातमारे या दोन उमेदवारांना प्रत्येकी ३८२ इतकी समान मते पडल्याने याठिकाणी चिठ्ठीवर निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रदीप भातमारे विजयी झाले. तर नवे पारगावमध्येही कल्पना लोखंडे व मनीषा लोखंडे यांनाही समसमान मते पडल्याने चिठ्ठीवर निर्णय घेण्यात आला.

रुकडीत रफीक कलावंत सरपंच

खासदार (कै.) बाळासाहेब माने ग्रामविकास आघाडीचे रफीक बापूलाल कलावंत हे तीन हजार ४४६ इतक्‍या उच्चांकी मताधिक्‍याने निवडून आले. या आघाडीस १७ पैकी १३ जागांवर बहुमत मिळाले. विरोधी शेतकरी संघटना, शिवसेना व आवाडे गटाचे उमेदवार किरण भोसले हे पराभूत झाले, त्यांच्या आघाडीस तीन जागांवर यश मिळाले. एका जागेवर अपक्ष उमेदवार 
निवडून आले. 
सत्ताधारी आघाडीचे विजयी उमेदवार : राजाराम कोळी, बानूबी नदाफ, नंदकुमार शिंगे, मनीषा कांबळे, रणजित कदम, मीनाक्षी अपराध, सुहेल मकानदार, शमुवेल लोखंडे, प्रीती घाटगे, अंजली जाधव, शीतल खोत, सरिता कांबळे, नर्गिस पेंढारी. विरोधी आघाडीचे विजय पाटील, मालती इंगळे, धनश्री कुंभार व अपक्ष संतोष रुकडीकर हे विजयी झाले.

मुडशिंगीच्या सरपंचपदी मीनाक्षी खरशिंगे

मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या मीनाक्षी प्रकाश खरशिंगे या २२ मतांनी विजयी झाल्या. त्यांना एकूण ९०८ मते मिळाली. विरोधी सत्तारूढ हनुमान विकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी झाले. त्यांची नावे अशी : दादासोा इंगवले, उज्ज्वला चौगले, मुमताज शेख, रवी मंडले, स्नेहल गुरव, मनीषा वरिंगे, नामदेव अनुसे, गजानन जाधव, नंदा पाटील.

चोकाकच्या सरपंचपदी मनीषा पाटील

चोकाक (ता. हातकणंगले) येथील जखूबाई ग्रामविकास आघाडीच्या मनीषा सचिन पाटील या ५३० मतांनी विजयी झाल्या. त्यांना एकूण १००८ मते मिळाली. त्यांच्या आघाडीला ११ पैकी ९ जागा मिळाल्या. विजयी उमेदवारांची नावे - सुकुमार पाटील, विजय ननवरे, महावीर पाटील (बिनविरोध), विकास चव्हाण, अर्चना हलसवडे, मनीषा कुंभार, लता पाटील, स्मिता सरदार, सुवर्णा सुतार. विरोधी आघाडीचे योगेश चोकाककर, उज्ज्वला जाधव यांना यश मिळाले.

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Hatkanagale Taluka Result