गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपची घोडदौड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

गडहिंग्लज - तालुक्‍यातील 34 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपची घोडदौड राहिली आहे. निम्म्याहून अधिक गावांमध्ये या दोन पक्षांचे सरपंच थेट जनतेतून निवडून येत सत्तेत विराजमान झाले आहेत. स्थानिक गटांच्या सहकार्याने भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांना मतदारांनी स्वीकारून गावगाडा हाकण्याची संधी दिली आहे. 

गडहिंग्लज - तालुक्‍यातील 34 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपची घोडदौड राहिली आहे. निम्म्याहून अधिक गावांमध्ये या दोन पक्षांचे सरपंच थेट जनतेतून निवडून येत सत्तेत विराजमान झाले आहेत. स्थानिक गटांच्या सहकार्याने भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांना मतदारांनी स्वीकारून गावगाडा हाकण्याची संधी दिली आहे. 

बहुतांश ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी बरोबरीने तर काही गावांत राष्ट्रवादीविरोधात भाजप असे चित्र होते. मतदारांनी या दोन पक्षांच्याच सर्वाधिक सदस्यांना स्वीकारले आहे. 34 पैकी वीसहून अधिक गावांत राष्ट्रवादी व भाजपच्या सरपंच उमेदवारांनी बाजी मारली. तीन ते चार गावांत शिवसेनेच्या सरपंच उमेदवारांनी ग्रामपंचायतीवर झेंडा लावला. बड्याचीवाडी येथे जनता दलाने गड अबाधित राखला. शिप्पूरसह नेसरी मतदारसंघातील तीन गावांत कॉंग्रेसने बाजी मारली. प्रत्येक पक्षाने आघाड्यांद्वारे निवडणुका लढवल्या असल्या, तरी सरपंचपदाचा उमेदवार आपल्या झेंड्याखाली कसा राहील, याची खबरदारी घेतली होती. यातूनच राष्ट्रवादी व भाजपच्या वाट्याला आलेले सरपंच अधिकाधिक निवडून आले. 

नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेने तर भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजपसह अप्पी पाटील, प्रकाश चव्हाण गटाच्या सरपंच उमेदवारांनी बाजी मारली. कडगाव मतदारसंघात भाजपने चांगले यश मिळविले आहे. 

दरम्यान, आज सकाळी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दहा वाजता गांधीनगरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला. 27 टेबलवर पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच मतमोजणीला गेलेले कार्यकर्ते निकाल घेऊन बाहेर येत होते. त्यामुळे अधिकृत निकालापूर्वीच कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करीत होते. गावपातळीवरील निवडणुका चुरशीच्या झाल्याने निकाल ऐकण्यासाठी तितक्‍याच उत्साहाने व चुरशीने परस्परविरोधी कार्यकर्ते एकत्र आले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस वारंवार गर्दीला पांगवत होते. पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. हसबनीस यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. 

नेत्यांचे दावे-प्रतिदावे 
* राष्ट्रवादी : 12 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच तर 34 ग्रामपंचायतीमध्ये 234 पैकी 112 सदस्य निवडून आल्याचा दावा आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी केला. तसेच सहा ते सात गावांमध्ये स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आल्याचेही त्या म्हणाल्या. 
* भाजप : 34 पैकी 14 ग्रामपंचायतींत भाजपच्या सरपंचपदाचे उमेदवार निवडून आल्याचे तालुकाध्यक्ष ऍड. हेमंत कोलेकर यांनी सांगितले. 
* शिवसेना : पाच गावांत शिवसेनेचे सरपंच निवडून आले असून, पहिल्यादांच शिवसेनेने जोरदार मुसंडी मारल्याचा दावा पक्षाचे संघटक संग्रामसिंह कुपेकर यांनी केला. चार गावांमध्ये शिवसेनेला उपसरपंचपदाच्या आशा निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. 
* जनता दल : बड्याचीवाडी, जखेवाडीच्या सरपंचपदासह तालुक्‍यातील विविध गावांमध्ये 63 सदस्य निवडून आल्याचा दावा तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी केला. 
* कॉंग्रेस : शिप्पूर तर्फ नेसरी येथे सरपंच उमेदवार कॉंग्रेसचा निवडून आला असून स्थानिक आघाड्यांच्या सहकार्याने विविध गावांत सरपंचपद कॉंग्रेसकडे आल्याचे युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर गुरबे यांनी सांगितले. 

* नेसरीच्या निकालावरुन तणाव... 
नेसरी ग्रामपंचायतीच्या निकालावरून प्रचंड तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या आकडेवारीनुसार प्रभाग चारमधील दयानंद गंगलींना अधिक मते मिळाली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनीही त्याला होकार दिल्याचे कार्यकर्त्यानी सांगितले. त्यामुळे श्री. गंगली यांच्या समर्थकांनी विजय साजरा केला. नेसरीतही गुलालाची उधळण केली. दरम्यान, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अमर हिडदुगी यांच्या समर्थकांनी मतांची बेरीज मारली. त्यानुसार ते तीन मतांनी विजयी झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी श्री. हिडदुगी यांना विजयी घोषित केल्यामुळे त्यांनीही नेसरीत जाऊन जल्लोष केला. त्यामुळे श्री. गंगली यांचे समर्थक मतमोजणी केंद्रात आले. त्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. शंभरभर कार्यकर्ते आल्याने एकच गोंधळ उडाला. हातवारे करत मोठमोठ्याने ओरड सुरू झाली. निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरू लागले. श्री. चव्हाण यांनी फेरमतमोजणीसाठी गंगली समर्थकांना अर्ज देण्यास सांगितले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी लाठीचार्ज करीत समर्थकांना पिटाळून लावले. 
 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result