कोल्हापूरात ९८ गावांत पाटील सरपंचांची निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४३५ गावांपैकी ९८ गावांत सरपंचपदी पाटील आडनाव असलेल्या व्यक्तींची निवड झाली. यात महिला पाटील सरपंचही आहेत. १७८ गावांत सरपंचपदी महिला विजयी झाल्याने या गावांचा कारभार महिलांच्या हाती राहणार आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४३५ गावांपैकी ९८ गावांत सरपंचपदी पाटील आडनाव असलेल्या व्यक्तींची निवड झाली. यात महिला पाटील सरपंचही आहेत. १७८ गावांत सरपंचपदी महिला विजयी झाल्याने या गावांचा कारभार महिलांच्या हाती राहणार आहे. 

सरपंच म्हणून विजयी झालेल्या अनेक महिला पदवीधर, पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी शिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्याही आहेत. मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) च्या सरपंचपदी विराजमान झालेल्या गौरी खापरे संगणक अभियंता आहेत, दोन वर्षांपासून त्या दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांनी गावच्या सरपंचपदाची निवडणूक लढवून मोठ्या मतांनी विजय मिळवला. 

सर्वाधिक १७ पाटील सरपंच राधानगरी व पन्हाळा तालुक्‍यात आहेत. त्या खालोखाल १५ पाटील शाहूवाडीत सरपंच झाले, करवीरमध्ये १२ पाटलांकडे सरपंचपदाची धुरा लोकांनी सोपवली. गावपातळीवर पोलिस पाटील या पदाला मोठे महत्त्व आहे. बहुंताशी गावांत पाटलांकडेच हे पद आहे. दसऱ्यात आपट्याच्या पानांची पूजा करण्याचा मान या पोलिस पाटलांना आहे. 

अलीकडे सरपंचपदालाही प्रतिष्ठा मिळाली आहे. नव्या कायद्याने सरपंचाच्या अधिकारात मोठी वाढ केली. गावांत विकासाचे कोणतेही काम असो, त्याला सरपंचाची मंजुरी लागते. या वेळी राज्य शासनाने सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. आरक्षणात ज्या मोठ्या गावांतील सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहिले, त्या बहुंताशी गावांत पाटील यांनीच निवडणूक लढवली. 

कसबा बीडचे सरपंच व ‘गोकुळ’चे संचालक सत्यजित पाटील, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, वडणगेचे सरपंच सचिन चौगले असे काही उच्च शिक्षित तरुण सरपंच गावांना मिळाले.

तालुकानिहाय पाटील सरपंच (कंसात त्या तालुक्‍यातील महिला सरपंच)
करवीर-१२ (२७), राधानगरी - १७ (२०), पन्हाळा - १७ (१९), आजरा-१६ (१७), गगनबावडा - ४ (८ एक रिक्त), गडहिंग्लज - ५ (१३), शाहूवाडी - १५ (१५), हातकणंगले - ९ (१९), भुदरगड - ३ (२०), चंदगड - ७ (१५ दोन रिक्त), शिरोळ - ३ (५).

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result