ऑनलाईनचा गोंधळ अन् बिनविरोध सरपंच, सदस्यांनाही मतदान 

निवास चौगले
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सरंपच व सदस्यांनाही मते देण्याची वेळ आली. ऑनलाईन निकाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करताना बिनविरोध सदस्यांची मते नोंदवल्याशिवाय संकेतस्थळ ही माहितीच घेत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. ऑनलाईन प्रक्रियेचा आणखी एक गोंधळ यानिमित्ताने पुढे आला. 

कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या सरंपच व सदस्यांनाही मते देण्याची वेळ आली. ऑनलाईन निकाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करताना बिनविरोध सदस्यांची मते नोंदवल्याशिवाय संकेतस्थळ ही माहितीच घेत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. ऑनलाईन प्रक्रियेचा आणखी एक गोंधळ यानिमित्ताने पुढे आला. 

राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अध्यादेश निघाला; पण त्यासाठी आवश्‍यक ते बदल राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर केले नाहीत. त्याचा मोठा त्रास निवडणूक निकाला दिवशी झाला. बिनविरोध निवडून आलेले सरपंच व सदस्य हे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच निश्‍चित झाले; पण त्याची अधिकृत घोषणा निकाला दिवशीच म्हणजे 17 ऑक्‍टोबरला करावी लागली. ही घोषणा करताना अशा सरपंच व सदस्यांना मते किती पडली, याची नोंद करावी लागली. 

या निवडणुकीसाठी सदस्यसंख्येनुसार गावांत प्रभागरचना केली. काही गावांत तीन तर मोठ्या गावांत सहा प्रभाग झाले. एका प्रभागात किमान तीन, तर जास्तीत जास्त चार सदस्य निवडून द्यायचे होते. सरपंचपदासाठी सर्वच प्रभागांतील मतदारांनी मतदान करायचे होते. त्यासाठी प्रत्येक प्रभागात सदस्यांसाठी एक व सरपंचपदासाठी एक अशी दोन इलेक्‍ट्रॉनिक यंत्रांची सोय होती. ज्या गावांत सरपंच बिनविरोध झाले, त्या ठिकाणी एकच यंत्र होते. ज्या प्रभागात एक सदस्य बिनविरोध झाला, ती जागा यंत्रावर रिकामी सोडली. 

निकाल जाहीर करताना मात्र सरपंचांना मते किती पडली याची नोंद केल्याशिवाय हा निकालच अपलोड होत नव्हता; मग सरपंचपदी बिनविरोध विजयी झालेल्या व्यक्तीला त्या गावांतील प्रत्येक प्रभागात किती मतदान झाले. त्याची बेरीज करून हे मतदान सरपंचालाही झाल्याचे समजून तेवढी मते त्यांच्या नावासमोर नोंदवल्यानंतरच संकेतस्थळ ही माहिती स्वीकारत होते. अशीच स्थिती बिनविरोध सदस्यांच्या बाबतीत झाली. एखाद्या प्रभागात एक जागा बिनविरोध झाली असेल, तर त्याच प्रभागातील उर्वरित विजयी उमेदवारांना पडलेली मते बिनविरोध सदस्यांसमोर लिहिण्याची वेळ आली. ऑनलाईनमधील या गोंधळाचा चांगलाच मनस्ताप यंत्रणेला झाला. त्यामुळे अशा ठिकाणचे निकालही उशिरा लागले. 

प्रमाणपत्रातही खाडाखोड 
सरपंचपद थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय झाला; पण आयोगाच्या संकेतस्थळावर विजयी सरपंचांना द्यावे लागणारे प्रमाणपत्रच उपलब्ध नव्हते. बहुंताशी गावांत हा प्रश्‍न उपस्थित झाला. त्यामुळे अशा ठिकाणी सदस्यांच्या प्रमाणपत्राच्या पत्रावर खाडाखोड करून "सदस्य' लिहिलेला शब्द खोडून, त्या ठिकाणी "सरंपच' शब्द लिहून ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 

दृष्टिक्षेपात ग्रा. पं. निवडणूक 
एकूण ग्रामपंचायती - 1026 
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती - 472 
मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 435 
बिनविरोध सरपंच - 33 
बिनविरोध सदस्य- 334 
 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result