चंदगड तालुक्यात सरपंचपदावर लक्ष ठेवून ठरणार गणिते

सुनील कोंडुसकर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

चंदगड - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चंदगड तालुक्‍यातील ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या या सत्ताकेंद्रावर वर्चस्व मिळविण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. थेट सरपंचपदाची ही पहिलीच निवडणूक असल्याने केवळ या पदावर लक्ष ठेवून अनेकांनी मतांची गणिते मांडली आहेत.

चंदगड - राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चंदगड तालुक्‍यातील ३८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या या सत्ताकेंद्रावर वर्चस्व मिळविण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. थेट सरपंचपदाची ही पहिलीच निवडणूक असल्याने केवळ या पदावर लक्ष ठेवून अनेकांनी मतांची गणिते मांडली आहेत.

इथली सत्ता ही पुढच्या विविध निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने ‘आमदार’कीचे स्वप्न बाळगून असलेल्या नेत्यांसाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. अडकूर, सातवणे, डुक्करवाडी, हेरे, कुदनूर, राजगोळी खुर्द, नागरदळे, कडलगे खुर्द, निट्टूर, शिनोळी खुर्द, तुर्केवाडी आदी गावांतील वातावरण आता ज्वलंत बनले आहे.  

कुदनूर येथे भरमूअण्णा पाटील व बी. पी. कोकीतकर गट एकत्र आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी, गोपाळराव पाटील, सुरेशराव चव्हाण पाटील, शिवसेना व अप्पी पाटील गटांनी मोट बांधली आहे. अनुसूचित जाती महिला पदासाठी सरपंचपद आरक्षित असून, सत्तेसाठी मोठी चुरस आहे. राजगोळी खुर्द येथे गोपाळराव पाटील गटाला अन्य सर्व गटांनी लक्ष्य केले आहे. येथे राष्ट्रवादी, नरसिंगराव पाटील, भरमूअण्णा पाटील गट, लाल बावटा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी आहे. नामदेव सुतार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. मल्लिकार्जुन मुगेरी यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. निट्टूर येथे सुरेशराव चव्हाण पाटील गटाच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, भरमूअण्णा आदी गट एकत्र आहेत. अडकूर येथे नरसिंगराव पाटील, भरमूअण्णा पाटील व गोपाळराव पाटील गट एकत्र आले आहेत.

त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, अप्पी पाटील गट व ओमसाई विकास आघाडी एकवटली आहे. पंचायत समितीचे सदस्य बबन देसाई, तालुका संघाचे संचालक अभय देसाई, ‘दौलत’चे अध्यक्ष अशोक जाधव, शिवसेनेचे संग्रामसिंह अडकूरकर, जयंत देसाई आदींसाठी येथील सत्ता प्रतिष्ठेची आहे. महत्त्वाच्या बाजारपेठेच्या या गावावर कोणाचे वर्चस्व राहणार, याची उत्सुकता आहे. 

डुक्करवाडी येथे सरपंचपद खुले असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी आहे. या पदासाठी येथे पंचरंगी लढत होत आहे. भरमूअण्णा व संग्रामसिंह कुपेकर गट एकत्र आले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील गट एकत्र आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष जानबा कांबळे, उद्योजक रमेश रेडेकर यांच्यातर्फे शिवाजी यादव, तर तुकाराम यरोळकर हे अपक्ष म्हणून सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. हेरे येथे शिवसेना व महादेव प्रसादे यांचा गट एकत्र आला आहे. त्यांच्याविरोधात देव रवळनाथ विकास आघाडीतून इतर सर्व गटांचे कार्यकर्ते लढत देत आहेत. सातवणे येथे भरमूअण्णा गटाच्या विरोधात नरसिंगराव पाटील, गोपाळराव पाटील व ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. 

खालसा गुडवळेत लक्षवेधी
खालसा गुडवळे व खामदळे या दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथे सरपंचपदासह चार सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित तीनपैकी ओबीसी महिलापद रिक्त राहिल्याने दोन जागांसाठी लढत होत आहे. या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. विनोद पाटील खुल्या आणि ओबीसी या दोन्ही जागांसाठी उमेदवार आहेत. लढत सदस्यपदाची असली, तरी चुरस मात्र नजरेत भरणारी आहे.

Web Title: Kolhapur news Grampanchayat Eletion