ग्रामपंचायतींमधील घोडेबाजाराला आळा

सुनील पाटील
बुधवार, 5 जुलै 2017

जनतेतून सरपंच निवडीचे स्वागत - विकासाला गती मिळण्याची अपेक्षा  
कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच हा थेट जनतेतूनच निवडला जाणार असल्याने चांगला, पात्र आणि गावचे हित जोपासणाऱ्या व्यक्तीची निवड करण्यासाठी संधी गावाला मिळणार आहे. 

गट-तटाचे राजकारण करण्यासाठी ‘सरपंच’पदाचे तुकडे पाडले जात होते. या प्रकारावर आता आळा बसणार असल्याचे मत अनेकांनी मांडले. तर सरपंच एकाचा आणि बहुमत एकाचे असेल तर ग्रामपंचायतीचा विकास साधणार कसा, असाही सवाल काही सरपंचांनी उपस्थित केला. 

नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेतून निवडला जाणार आहे. शासनाने काल याबाबतचा निर्णय घेतला आहे. याचे अनेकांनी स्वागत केले, तर काहींनी या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. गावातील राजकारण वेगळे असते. गावात स्थानिक पातळीवर आघाडी करूनच निवडणूक लढविल्या जातात. केवळ पार्टीची सत्ता आली म्हणून कोणालाही सरपंच करा किंवा बऱ्याच वेळेला गावाला मान्य नसलेला व्यक्तीही सरपंच होत असतो. याला आता आळा बसणार आहे.  सरपंचपद मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी घोडबाजार केला जातो. अनेक ठिकाणी पैशाशिवाय पान हलत नाही, अशी स्थिती आहे. मात्र या अलिखित नियमाला आळा बसणार आहे.

४९० पंचायतींची निवडणूक 
जिल्ह्यातील ४९० ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०१७ मध्ये संपणार आहे. यामध्ये करवीर तालुक्‍यातील ५९, भुदरगड ४४, आजरा ३७, राधानगरी ६७, कागल २६, शिरोळ १७, हातकणंगले ४०, गगनबावडा २१, पन्हाळा ५३, शाहूवाडी ४९, चंदगड ४२, गडहिंग्लजमधील ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. गटा-तटाच्या राजकारणामुळे सरपंच होण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. या निर्णयामुळे चांगला माणूस सरपंच होऊ शकतो.
- कमल सरनाईक, सरपंच, प्रयाग चिखली

योग्य आणि कार्यक्षम व्यक्ती सरपंच म्हणून निवडून येऊ शकते. या निर्णयामुळे कोणाला पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे चांगल्या व्यक्तीला सरपंच होण्याची संधी या निर्णयाने मिळणार आहे. 
- माधुरी पाटील, सरपंच, पाडळी खुर्द

शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे चांगल्या व्यक्तीला निर्धोकपणे काम करता येणार आहे. अनेकदा केवळ राजकारणामुळे विकास खुंटतो. थेट सरपंच निवड होणार असल्यामुळे काम करण्यास संधी प्राप्त होईल. 
- राजवर्धन मोहिते, सरपंच, घुणकी

Web Title: kolhapur news grampanchyat scam control