जीएसटीची वर्दी : खरेदीसाठी गर्दी 

जीएसटीची वर्दी : खरेदीसाठी गर्दी 

कोल्हापूर - एक जुलैच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभर लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे महागाई कमी होईल की वाढेल, अशी संभ्रमावस्था स्थानिक बाजारपेठेत जाणवत असतानाच गेल्या चार ते पाच दिवसांत शहर परिसरातील लहान-मोठ्या सराफ दुकानांत ग्राहकांनी सोन्या-चांदीचे दागिने खरेदीची पर्वणी साधण्यासाठी गर्दी केली आहे. यामध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे, हे विशेष. एरव्ही गुरुपुष्यामृत, अक्षय्यतृतीया, दिवाळी पाडवा, गुढी पाडव्याला गुजरीत, शहरातील अन्य सराफ दुकानांत आवर्जून जाणाऱ्या ग्राहकांनी वाढीव जीएसटीच्या धास्तीने सोन्या-चांदीची खरेदी करून ठेवली. 

सोने-चांदी, वाहने, ब्रॅंडिंग कपडे, मोबाईल, साखर, चहा, अन्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स गॅजेटस्‌ खरेदी करण्यासाठी गेल्या आठ-दहा दिवसांत संबंधित शॉप्समध्ये गर्दी वाढली आहे. याबाबत पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापक अभिजित माने म्हणाले, ""सध्या सोन्याचा दर हा 29,150, तर चांदीचा प्रतिकिलो दर हा 39,800 रुपये आहे. एक जुलैच्या आधी एक लाखाच्या सोने खरेदीवर साधारण 1200 रुपये व्हॅट बसतो. जीएसटी लागू झाल्यानंतर एक लाखाच्या खरेदीसाठी तीन हजार रुपये जीएसटी द्यावा लागेल. एक किलो चांदीसाठी 39,800 रुपये दराला एक जुलैच्या आधी 478 रुपये व्हॅट द्यावा लागतो. एक जुलैनंतर 1194 रुपये जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे जीएसटी लागू होण्यापूर्वी ग्राहकांनी ज्वेलर्समध्ये गर्दी केली आहे. गेल्या काही दिवसांत कोल्हापूर परिसरात 40 टक्के खरेदीत वाढ झाली आहे.'' 

जीएसटी लागू होणार असल्यामुळे अनेक सराफ दुकानांत विविध भिशी, अभय सुवर्ण योजना, सुवर्ण संचय योजना बंद आहेत. सध्या शहरी, ग्रामीण भागातील ग्राहकांचा सोन्यामध्ये दागिने, मंगळसूत्र, चेन, अंगठी, प्युअर गोल्ड, टॉप्स, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, तर चांदीमध्ये समई, निरांजने, पैंजण, जोडवी, अन्य शोभीवंत वस्तू घेण्याकडे कल वाढला आहे. साधारणपणे सोन्याची एक तोळ्यापर्यंत खरेदी केली जात आहे. ग्राहक धनाजी पाटील (चावरे) म्हणाले, ""जीएसटी लागू होण्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात फरक पडणार आहे. तत्पूर्वी आम्ही मुलीच्या लग्नाकरिता आताच सोनं खरेदीसाठी सहकुटुंब कोल्हापुरात आलो आहोत.'' 

लोणी, तूप, बदाम, फ्रूट ज्यूस, शेंगदाणा, लोणचे, मुरांबा, चटणी, जाम, जेली, छत्री, मोबाईल्स, हेअर ऑईल, साबण, कॉम्प्युटर्स, प्रिंटर्स, साखर, चहा, कॉफी, खाद्यतेल, अगरबत्ती, कॉयर मॅटस्‌, काजू, मनुका, चप्पल, मॅटिंग, फ्लोअर कव्हरिंग आदींवर जीएसटी लागू होणार असल्यामुळे अनेकांनी या वस्तू गेल्या काही दिवसांत खरेदी करून ठेवल्या आहेत. परिणामी, दुकानदारांना या वस्तूंचा स्टॉक मोठ्या प्रमाणात करून ठेवावा लागला. याबरोबरच जीएसटीसाठी अनेक व्यापाऱ्यांनी प्राथमिक तयारी करून ठेवली आहे. लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, महाराणा प्रताप चौक परिसरांतील मार्केटमध्ये तेजी आहे. 

""ब्रॅंडिंग कपड्यांवर पूर्वी सहा टक्के व्हॅट होता. आता 12 टक्के जीएसटी लागणार आहे. तरीही अनेक कंपन्यांनी ग्राहकांवर किमतींचा बोजा पडू नये म्हणून किमती आहेत तशाच ठेवल्या आहेत. आता एक हजारच्या खरेदीवर पाच टक्के कर आहे. एक हजारच्या पुढील खरेदीवर 12 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. जीएसटीच्या पार्श्‍वभूमीवर कापड कंपन्यांनी एक जूनलाच सेल लावले आहेत. दरवर्षी हे सेल 25 ते 26 जूनला लागत असत. सध्या विविध सेल्समुळे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढली आहे. एक जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांत कापड मार्केटवर नेमका काय परिणाम झाला ते सांगता येईल.'' 
- सतीश माने, संस्थापक व्यंकटेश्‍वरा गारमेंटस्‌. 

""दरवर्षीच्या जूनपेक्षा यावर्षीच्या जूनमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात 30 ते 35 टक्के वाढ झाली. अनेकदा जूनमध्ये शाळा प्रवेश, अन्य कामांमुळे वाहन खरेदी थोडी मंदावते. यावर्षी चित्र मात्र थोडे वेगळे दिसले. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार असल्यामुळे ही खरेदी वाढली. जीएसटीमुळे मोठ्या गाड्यांच्या किमती कमी होतील. त्यामुळे ग्राहकांचा कल मोठ्या गाड्या घेण्याकडे निश्‍चितच वाढेल. काही कंपन्यांनी गाड्यांच्या किमती आताच कमी केल्या आहेत. परिणामी, ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्र "बूम' होईल.'' 
- विशाल वडेर, सरव्यवस्थापक (माई ह्युंडाई). 

""जीएसटी लागू झाल्यानंतर मोबाईल क्षेत्रात भविष्यकाळात उलाढाल वाढेल. नवनवीन कंपन्या मार्केटमध्ये उतरतील. त्यामुळे ब्रॅंडस्‌मध्ये वैविध्यता येईल. याचा फायदा ग्राहकांना होईल. या क्षेत्राला एकप्रकारे स्थिरता प्राप्त होईल. अनेक कंपन्यांच्या ऑफिसेसमध्येही वाढ होईल. मोबाईलमध्ये गुंतवणूक वाढेल. सध्याचा विचार करता मोबाईलचे दर हे दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढतील. जीएसटी लागू होणार असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत गेल्या महिनाभरात 25 ते 30 टक्‍क्‍यांनी सेल वाढला आहे.'' 
- सिद्धार्थ शहा, संस्थापक एस. एस. कम्युनिकेशन. 

""कोल्हापुरात सध्या 20 लाखांच्या आत वन बीएचके, 25 ते 26 लाखांच्या आत टू बीचएके फ्लॅट खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. रेरा कायद्यामुळे या क्षेत्रात पारदर्शकता आली आहे. परिणामी, फ्लॅटची विक्रीही वाढली आहे. जीएसटीमुळे या क्षेत्राला थोडा ब्रेक लागेल; पण काळजी करण्याचे काही कारण नाही. तसा फार मोठा परिणाम रिअल इस्टेट मार्केटवर होणार नाही.'' 
- महेश यादव, अध्यक्ष क्रेडाई. 

""जीएसटी लागू झाल्यानंतर छोटे हॉटेल, रेस्टॉरंटस्‌, कॅंटिन व्यावसायिकांवर परिणाम होणार आहे. पूर्वी पाच टक्के व्हॅट भरावा लागत असे. आता 12 टक्के जीएसटी भरावा लागेल. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल. कारण थाळी, अन्य पदार्थांचे दर वाढणार आहेत. याबरोबरच प्रत्येक गोष्टीची कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. हिशेब अपडेट ठेवावा लागेल. अकौंटंट नेमावा लागेल. यासाठी स्वतंत्र विभागच निर्माण करावा लागेल. बिले जपून ठेवावी लागतील. चार ते पाच महिन्यांनंतर जीएसटीमुळे बाजारपेठेवर नेमका काय परिणाम झाला हे समजून येईल.'' 
- सिद्धार्थ लाटकर, हॉटेल ओपल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com