फेसबुक, व्हॉटस्‌ ॲपनंतर ब्लॉगही रुजतोय ज्ञानदानाचा ट्रेंड

संभाजी गंडमाळे
शुक्रवार, 27 जुलै 2018

कोल्हापूर - प्रभावी अध्यापनासाठी शाळाशाळांतील शिक्षकांची आता सकस स्पर्धा सुरू झाली आहे. फेसबुक, व्हॉटस्‌ ॲपनंतर आता ब्लॉगचाही ट्रेंड आला आहे. उषाराजे हायस्कूलचे शिक्षक विनायक पाटील यांच्या ब्लॉगला चार महिन्यांत जगभरातील सुमारे ७२ हजार लोकांनी व्हिजिट दिली आहे.

कोल्हापूर - प्रभावी अध्यापनासाठी शाळाशाळांतील शिक्षकांची आता सकस स्पर्धा सुरू झाली आहे. फेसबुक, व्हॉटस्‌ ॲपनंतर आता ब्लॉगचाही ट्रेंड आला आहे. उषाराजे हायस्कूलचे शिक्षक विनायक पाटील यांच्या ब्लॉगला चार महिन्यांत जगभरातील सुमारे ७२ हजार लोकांनी व्हिजिट दिली आहे.

श्री. पाटील यांनी दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील इंग्रजी या विषयासाठीच खास हा ब्लॉग तयार केला आहे. रोज किमान तीस विद्यार्थी त्यांना फोन करून विविध शंकांचे समाधान करून घेतात. दरम्यान, ब्लॉगचा ट्रेंड हा तसा नवीन नसला तरी विशिष्ट एका विषयाला वाहिलेला हा ब्लॉग असून विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग हे या ब्लॉगचे वैशिष्ट्य आहे. 

दहावी इंग्रजीच्या पुस्तकातील शेवटचे प्रकरणच ब्लॉगवर आहे. त्यामुळे या प्रकरणापासून सुरुवात केली आणि नंतर सर्व प्रकरणे ब्लॉगवर आणली. त्याच्याही पुढे जाऊन सर्व प्रकरणे आणि कवितांचे विस्तृत विश्‍लेषण केले आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी उपलब्ध केले आहेत. मात्र, त्याची उत्तरे दिलेली नाहीत. उत्तरे कशी द्यायची, याबाबतचे मार्गदर्शन जरूर केले आहे. रोज किमान एक-दोन तास तरी या कामासाठी द्यावे लागतात. ब्लॉगवरील सर्व ग्राफिक्‍स व डिझाईन स्वतः केली असून येत्या काळात आता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठीही ब्लॉगवरून नव्या संकल्पना आणणार असल्याचे श्री. पाटील सांगतात. 

दहा देशांतील व्हिजीटर्स
श्री. पाटील यांच्या ब्लॉगला आजवर दहा देशांतील व्हिजीटर्सनी भेट दिली आहे. त्यात भारतातील ६६ हजार ८४७, त्या खालोखाल ‘यूएस’ मधील सहा हजार २६६ तर त्या खालोखाल जर्मनी १६४ आणि सिंगापूरमधील ९९ लोकांचा समावेश आहे. 

शिक्षकांतील ही सकस स्पर्धा खूप चांगली आहे. त्यातल्या त्यात ब्लॉगवरून ज्ञानदानाची संकल्पना आणि त्यातही विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक महत्त्वाचा वाटतो. काही शिक्षकांनी ॲनिमेशनपटही तयार केले आहेत. डिजिटल साक्षरतेमुळे या गोष्टी शक्‍य होत आहेत.
-विनायक पाचलग,
सोशल मीडिया तज्ज्ञ

Web Title: Kolhapur News Guru Pournima Special