वडील माझे गुरू...

राजेश मोरे
शुक्रवार, 27 जुलै 2018

कोल्हापूर - माझ्या मनात नव्हतं, केवळ वडिलांच्या इच्छेमुळे एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून वकील झाले. काळा कोट घालण्याची इच्छाही कधी झाली नाही. माझी ही नकारात्मक भावना वडिलांनी जाणली. त्यांनी प्रोत्साहन दिले. राज्य सेवा आयोगाची परीक्षा देऊन मी पी.एस.आय. झाले. पण रुजू होण्यासाठी माझा पुन्हा निरुत्साह होता.

कोल्हापूर - माझ्या मनात नव्हतं, केवळ वडिलांच्या इच्छेमुळे एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून वकील झाले. काळा कोट घालण्याची इच्छाही कधी झाली नाही. माझी ही नकारात्मक भावना वडिलांनी जाणली. त्यांनी प्रोत्साहन दिले. राज्य सेवा आयोगाची परीक्षा देऊन मी पी.एस.आय. झाले. पण रुजू होण्यासाठी माझा पुन्हा निरुत्साह होता.

तेथेही वडिलांनीच मला समजून घेतले. धीर देऊन रुजूही केले. आता पदोपदी कायदेशीर सल्ला, तपास कामाबाबत मार्गदर्शन आणि कठीण प्रसंगात कौशल्याने सामोरे जाण्याचा आत्मविश्‍वास वडीलच देतात. म्हणून माझ्या करिअरमधील वडील हेच माझे गुरू आहेत. त्यांनी दिलेला आत्मविश्‍वासच माझं जगणं समृद्ध करण्यास बहुमोल ठरतो आहे. 

गुरुपौर्णिमेनिमित्त पोलिस उपनिरीक्षक राणी गणपती पाटील यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यांनी वडील गणपती लखू पाटील तथा आबा यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. रिळे (ता. शिराळा, सांगली) येथील सर्वसामान्य कुटुंबातील गणपती पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत ‘एलएलबी’चे शिक्षण पूर्ण केले. राणी यांनी न्यायाधीश व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. राणी यांनी प्राथमिक, महाविद्यालयीन शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्या वकील झाल्या. 

घरात वकिलीचे वातावरण असतानाही राणी यांना कधी कोर्टाची पायरी चढण्याची अगर न्यायाधीश बनण्याचा गंध नव्हता. त्यांचीही चलबिचल वडिलांनी जाणली. ‘यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. ‘मुली तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर‘ असा त्यांनी सल्ला दिला. राणी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्या २०१२ ला ‘पीएसआय’ही झाल्या. मात्र, पोलिस खात्यातही काम करण्याची त्यांची तयारी नव्हती. वडिलांनी त्यांना पुन्हा प्रोत्साहन दिले. मिळालेले यश वाया घालवायचे नाही. नोकरी करीत पुढील शिक्षण घ्यायचे, असा आत्मविश्‍वास निर्माण केला. कर्तव्य बजावताना स्पष्टवक्तेपणा ठेवायचा, कर्तव्याशी प्रामाणिक राहायचे, त्याचबरोबर आरोग्यासाठी व्यायामाची जोड द्यायची असा कानमंत्रही त्यांनी दिला. 

ताणतणावात मोलाचा आधार
कर्तव्य बजाबवताना राणी पाटील यांना अनेक अडचणी येतात, गुन्ह्यात कोणते कलम लावायचे, तपासात त्रुटी राहू नयेत यासाठी काय काळजी घ्यायची आदींसह अनेक ठिकाणी त्यांचे वडील त्यांना मार्गदर्शन करतात. कर्तव्यात येणाऱ्या ताणतणावाच्या काळात आधार देतात. त्यांना त्यांची आई व पती विक्रीकर निरीक्षक सचिन पाटील यांचीही मोलाची साथ मिळत आहे.

Web Title: Kolhapur News Guru Pournima Special