गुटखाबंदीला वर्षासाठी मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

कोल्हापूर - राज्य शासनाने गुटखा, सुगंधी पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थावरील बंदी कायम ठेवली आहे. गुरुवारपासून (ता. २०) वर्षभरासाठी पुन्हा बंदी लागू होत आहे.

कोल्हापूर - राज्य शासनाने गुटखा, सुगंधी पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थावरील बंदी कायम ठेवली आहे. गुरुवारपासून (ता. २०) वर्षभरासाठी पुन्हा बंदी लागू होत आहे.

तरुण पिढी गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाकडे वळू नये, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने पाच वर्षापूर्वी बंदी लागू केली. गुटखा, सुगंधी पानमसाला, मावा यांची विक्री व उत्पादनावर बंदी घातली गेली. नागपूरचे शासकीय दंत महाविद्यालय, सलाम बॉम्बे फौंडेशन, टाटा मेमोरियल ट्रस्टसह अन्य स्वयंसेवी संस्थांच्या पाहणीत तोंडाच्या कर्करोगाचे गंभीर परिणाम समोर आले. २०१५-१६ मध्ये १५१ तर २०१६-१७ मध्ये ८५९ जणांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. २०१३ मध्ये २० कोटी ७४ लाख, २०१४-१५ मध्ये सतरा कोटी ५३ लाख, २०१५-१६ मध्ये २१ कोटी ८१ लाख, तर २०१६-१७ मध्ये २२ कोटी ९८ लाखांचा गुटखा जप्त झाला.  देशात २६ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशात गुटखाबंदी लागू आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारावर शासनावर साठ टक्‍यापर्यंत आर्थिक भार पडतो.

गेल्या चार वर्षात अन्न, औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकून छुप्या मार्गाने येणारा गुटखा जप्त केला. दरवर्षी वर्षभरासाठी बंदीला मुदतवाढ दिली जाते. २०१७-१८ साठी पुुन्हा बंदी आदेश लागू झाला आहे. 

अन्न,औषध प्रशासन गुटखाबंदीसाठी प्रयत्नशील असले तरी चोरट्या मार्गाने येणारी वाहतूक काही कमी झालेली नाही. लगतच्या राज्यात गुटखाबंदी लागू नसल्याने तेथून गुटख्याची वाहतूक सुरूच आहे. गुटखाबरोबर तरूण पिढी अधिक आकर्षिली जाते ती माव्याकडे, प्रामूख्याने शहरात माव्याची ‘क्रेझ’ अधिक असून काही पानपट्टींमध्ये खुलेआम माव्याची विक्री सुरू आहे. तरूण पिढी विविध प्रकारच्या कर्करोगापासून दूर राहावी या हेतूने तत्कालीन काँग्रेस सरकारने बंदी लागू केली. भाजप सरकारनेही गेल्या तीन वर्षापासून बंदी कायम ठेवली आहे.

Web Title: kolhapur news gutkha