लग्नात घुमतंय हलगी-घुमकं...

राजू पाटील
सोमवार, 14 मे 2018

राशिवडे बुद्रुक - सध्याच्या लग्नसराईत हलगी-घुमक्‍याची क्रेझ आहे. पाहुण्यांच्या स्वागताला हलगी-घुमकं रंग भरू लागल्याचं सर्रास चित्र दिसत आहे. खरंतर या वाद्याने गरीब-श्रीमंतीची दरीच मिटवली असेच म्हणावे लागेल.

राशिवडे बुद्रुक - सध्याच्या लग्नसराईत हलगी-घुमक्‍याची क्रेझ आहे. पाहुण्यांच्या स्वागताला हलगी-घुमकं रंग भरू लागल्याचं सर्रास चित्र दिसत आहे. खरंतर या वाद्याने गरीब-श्रीमंतीची दरीच मिटवली असेच म्हणावे लागेल. पूर्वी विवाहात सनईचे सूर पहाटेपासून रंग भरू लागले की दोन्ही घरच्यांची धावपळ सुरू व्हायची.

पहिल्या दिवशी हळदी, दुसऱ्या दिवशी अक्षता आणि तिसऱ्या दिवशी पाठवणी असा ढंग असे. यासाठी दाराच्या उंबऱ्याबाहेरच्या जोत्यावर एका बाजूला सनईवाला सूर धरत असे आणि दुसऱ्या बाजूला चौघड्यांची नौबत झडे. गरिबांना ताशा-ढोल साथ करीत असे. कालांतराने ते सूर लोपले आणि बॅंडची क्रेझ आली. आठ-दहा जणांचा ताफा स्वागताला असे. त्यामध्ये मोठ्या आकाराचा बॅंड असला की लग्न मोठे समजले जायचे. आता नव्या ढंगात विवाहाचे रूप आलेले असले तरी पाहुण्यांच्या स्वागताला मात्र हलगी, घुमकं आणि कैताळाचा आवाज कायम आहे. कमी रवानगीत मिळणारं हे वाद्यपथक सर्वांनाच हवंहवंसं वाटत अाहे. केवळ विवाह नव्हे तर नेत्यांचे कार्यक्रम असो, मर्दानी खेळ असो की कुस्त्यांचे मैदान हलगीचा आवाज घुमतोच.

 

हलगी-घुमक्‍याला चांगले दिवस आले आहेत. चार वर्षांपूर्वी केवळ कुस्तीसाठी बोलावले जायचे. आता लग्नांच्या रवानग्या करून आटोपत नाहीत. किती देतात यापेक्षा आम्हा चारचौघांना काम मिळते हे महत्त्वाचे. 
- महादेव साठे
, हलगीवादक, ठिकपुर्ली.

गावागावांत कलाकार...
हलगी हे मराठमोळं वाद्य, वीररसाचा प्रकार. मात्र अलीकडे या मराठी वाद्याला चांगले दिवस आले आहेत. याचे कलाकारही आता गावागावांत वाढत आहेत, हे संस्कृतीवाढीचं लक्षण आहे. 

Web Title: Kolhapur News Halagi in Marriage function