पावसाने धडकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -​ धडकी भरविणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्री संपूर्ण शहराला झोडपून काढले. ढगफुटीसारखा पडलेल्या या पावसाची अवघ्या दोन तासांत ८० मिलिमीटर अशी नोंद झाली. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसामुळे शहरवासीय भयभीत झाले. या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

कोल्हापूर - धडकी भरविणाऱ्या पावसाने बुधवारी मध्यरात्री संपूर्ण शहराला झोडपून काढले. ढगफुटीसारखा पडलेल्या या पावसाची अवघ्या दोन तासांत ८० मिलिमीटर अशी नोंद झाली. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसामुळे शहरवासीय भयभीत झाले. या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, पाण्यातून वाहने वाहून गेली, संरक्षक भिंती, घरांची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. २४ तासांत जिल्ह्यात ३३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. 

ना परतीचा, ना वळवाचा, मग नेमका कुठला हा पाऊस असा प्रश्‍न अनेकांना पडला. रात्री दहाच्या सुमारास हलक्‍या सरी कोसळत होत्या. त्यानंतर याच सरींनी उग्र रूप धारण केले. जोरदार पावसामुळे २००५ च्या महापुराच्या आठवणी पावसाने ताज्या झाल्या. नाल्यांच्या काठावर असलेल्या घराघरांतून पाणी घुसले. रात्री अकरानंतर पावसाने जोर धरला आणि तो वाढतच गेला. एरव्ही मे महिन्यात विजांचा कडकडाट होतो. काल रात्री विजांचा कडकडाट कोणत्या टोकाचा असतो, याचा अनुभव नागरिकांना आला. आभाळ फाटल्याचा भास शहरवासीयांना झाला. कोल्हापूर जिल्ह्याची पावसाची सरासरी सतराशे मिलिमीटर आहे. बुधवारी रात्री अकरा ते एक या दोन तासांत कसबा बावड्यात ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात हाच आकडा ८० मिलिमीटर इतका होता. वाऱ्याचा वेग प्रति सेकंद ११ ते १३ मीटर इतका होता, असे तज्ज्ञांनी सांगितले.
रात्री एकनंतरही पावसाचा जोर न ओसरल्यामुळे अनेक जण आहे त्या ठिकाणीच अडकून पडले. नाले-ओढे ओसंडून वाहू लागल्यानंतर पाणी थेट घरात घुसण्यास सुरुवात झाली. पाणी घरात घुसल्यामुळे घरातील भांडी, साहित्य सांभाळताना नागरिकांची तारांबळ उडाली. 
शिवाजी विद्यापीठ, मोरेवाडी, ॲस्टर आधार, वाय. पी. पोवारनगर, शास्त्रीनगर, देवकर पाणंद परिसर, राजेपाध्येनगर या परिसरात दाणादाण उडाली. कोसळणारा पाऊस आणि खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे नागरिकांच्या अडचणीत भरच पडली. नाले, गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अग्निशमन दलाला तब्बल ३५ वर्दींचा सामना करावा लागला. रात्रभर फायर स्टेशनचे जवान बचावाचे काम करत होते. शास्त्रीनगर, रेसिडेन्सी कॉलनी परिसरातील घरांमधून पाणी घुसले. लोकांचा जीव वाचविताना अग्निशमनच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. 
राजोपाध्येनगरातील स्थितीही गंभीर होती. नाल्यातील बांधकामांमुळे लोकांच्या घरात थेट पाणी घुसल्याने भिंत फोडून पाण्याला वाट देण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली. ओढ्यातील बांधकामे, नाले आणि चॅनेलवरील अतिक्रमण, पाण्याचे बुजलेले नैसर्गिक स्रोत या पावसाने उघड्यावर आणले. या पावसाच्या तडाख्याने लाखो रुपयांची वित्तहानी झाली.

‘नुकसानग्रस्तांना मदत’
विल्सन पुलाजवळील फलगुलेश्‍वर मंदिराचे पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे नुकसान झाले. या मंदिराला ऐतहासिक पार्श्‍वभूमी आहे. मंदिराच्या डागडुजीसाठी पन्नास हजारांची मदत आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केली. यादवनगर येथे घरांचे नुकसान झाले. तेथे प्रत्येकी दहा हजारांची मदत जाहीर केली. आमदार अमल महाडिक यांनी सम्राटनगर, शास्त्रीनगर, दक्षिण मतदारसंघात पावसामुळे नुकसान झाले. तेथे भेट देऊन नागरिकांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
कळंबा ः कालच्या पावसामुळे पाचगाव-रामानंदनगर रस्त्यावरील नवीनच बांधलेला पूल पावसामुळे खचून धोकादायक बनला आहे. काही नागरिकांच्या मोटारी जोरदार पावसाने व वाऱ्याने वाहून गेल्या तसेच अनेक घरांच्या संरक्षण भिंती या पावसामुळे कोसळल्या. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. आमदार अमल महाडिक आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आमदार अमल महाडिक यांनी कळंबा, पाचगाव, जरगनगर, नाळे कॉलनी परिसरातील नुकसानीची पाहणी केली. या वेळी आमदार महाडिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले.

 

Web Title: Kolhapur news heavy rains