कोल्हापूरात संततधार...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात आज दुपारनंतर संततधार पाऊस झाला. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठून राहिले. या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. पावसामुळे सायंकाळनंतर हवेत गारवा निर्माण झाला.

कोल्हापूर - जिल्ह्यात आज दुपारनंतर संततधार पाऊस झाला. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठून राहिले. या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. पावसामुळे सायंकाळनंतर हवेत गारवा निर्माण झाला.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्वांत मोठे काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला. तर राधानगरी धरणातून ६ नंबरचे गेट रात्री साडेनऊ वाजता तर ३ नंबरचे गेट ९.३५ ला उघडले.

गेल्या आठवडाभरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रोज अर्धा-पाऊण तासांच्या पावसाने शहरात पाणी पाणी होत आहे. कालही (ता. १७) शहरात मुसळधार पाऊस झाला. आज सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झाले आणि पावणेतीननंतर पावसाला प्रारंभ झाला. तासाभरातील पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी तुंबून राहिले. बसंत बहार चित्रमंदिरासमोर महावीर गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, उषा टॉकीज, पार्वती टॉकीजजवळ पाण्याची तळी निर्माण झाली. अनेक ठिकाणी ड्रेनेजचे चेंबर भरून पाणी रस्त्यांवरून वाहत राहिले. पावसामुळे लक्ष्मीपुरीसह सर्व भाजीमंडईत दलदल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. येथे महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

दूधगंगेचे पाणी वाढले
सोळांकूर : दूधगंगा नदीत धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडल्याने नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. आज काळम्मावाडी परिसरात १८ मिलिमीटर पाऊस झाला असून, आजपर्यंत दोन हजार ६९४ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे; तर जलाशयाची पाण्याची पातळी ६४६.१६ मीटर आहे. गेल्या वर्षी या परिसरात दोन हजार ७६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती; तर धरणात ७१९.४९६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.  

वाहतुकीची कोंडी
पाऊस पडून गेल्यानंतर शहरात अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्यात साठलेल्या पाण्यांमधूनच वाट काढत नागरिकांना आपला प्रवास करावा लागला. ठिकठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकही हैराण झाले.

पन्हाळ्याला झोडपले
पन्हाळा ः तालुक्‍यात आज पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले. दुपारपासून जोरदार पावसास सुरवात झाली असून, पन्हाळगड दाट धुक्‍याने लपेटून गेला होता. दरम्यान, आज सकाळी आठपर्यंत पन्हाळ्यात सरासरी १७६० मिलिमीटर, तर तालुक्‍यात सरासरी १०४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस रोप लावणीच्या भातपिकास चांगला असला, तरी काढणीस आलेल्या सोयाबीन, भुईमूग पिकासाठी मात्र नुकसानीचा आहे.

धरणे ओव्हरफ्लो
काळम्मावाडी (ता. राधानगरी) धरण आज पूर्ण क्षमतेने भरले. धरणात २५.६० टीएमसी साठा झाला. धरणातून सांडव्यावरून २३०० क्‍युसेक व वीज निर्मिती केंद्रातून ९०० क्‍युसेकने विसर्ग सुरू झाला. राधानगरीच्या ६ क्रमांकाच्या गेटमधून २२०० क्‍युसेकने तर ३ क्रमांकाच्या गेटमधून २८५६ क्‍युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. राजाराम बंधारा येथे रात्री ९ वाजता पाणी पातळी ९ फूट ९ इंच होती.
 

Web Title: kolhapur news heavy rains in district