हेल्मेट सक्ती खपवून घेतली जाणार नाही...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

कोल्हापूर - शहरात हेल्मेट सक्ती खपवून घेणार नाही. सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे आज शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासमोर मांडली. माजी महापौर आर. के. पोवार यांनी समितीचे नेतृत्व केले.

कोल्हापूर - शहरात हेल्मेट सक्ती खपवून घेणार नाही. सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे आज शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासमोर मांडली. माजी महापौर आर. के. पोवार यांनी समितीचे नेतृत्व केले.

महामार्गावर गेल्या महिन्यापासून हेल्मेटची सक्ती करण्यात आली. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा धडाका पोलिसांकडून सुरू झाला आहे. त्यातच शहरात १५ जुलैपासून हेल्मेट सक्ती केल्याचे पोलिस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. वाहन कंपनींच्या डिलरना वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन हेल्मेट देण्याचीही सक्ती करण्यात आली. त्याला शहरातील विविध संघटना, संस्थांसह पक्षांनी विरोध दर्शविला. आधी शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारा आणि मगच हेल्मेटची सक्ती करा, असा सूर सध्या शहरातून उमटू लागला आहे. याच पार्श्‍वभूमीवर शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी सर्वपक्षीय नागरी कृती समितीला चर्चेसाठी कार्यालयात बोलवले होते. 

बैठकीतील चर्चेदरम्यान शहरातील हेल्मेट सक्तीला समितीच्या सदस्यांनी जोरदार विरोध दर्शविला. सक्ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. प्रबोधनाला आमची हरकत नाही, अशी भूमिका मांडली.

याप्रसंगी आर. के. पोवार म्हणाले, ‘‘हेल्मेट सक्ती करण्याआधी शहराची भौगोलिक परिस्थिती विचारात घ्या. अवघ्या पाच-सहा किलोमीटरवर शहराची हद्द संपते. येथील रहदारी व रस्त्याच्या स्थितीमुळे वाहनांचा वेगही मर्यादित असतो. थेट हेल्मेटची सक्ती करू नका. शहरातील एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या सूचना मांडणारच.’’ या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, ‘‘कोणताही निर्णय थेट लादू नका. प्रथम सर्वांची मते विचारात घ्या. त्यातील त्रुटी आणि कारणांचा विचार करा.’’

जयकुमार शिंदे म्हणाले, ‘‘हेल्मेट घालणाऱ्यांचेही शहरात अपघात होऊ लागले आहेत. हेल्मेटचा वापर गुन्हेगारांकडून होऊ लागला आहे. याचाही विचार पोलिस प्रशासनाकडून केला गेला पाहिजे.’’ किशोर घाटगे म्हणाले, ‘‘शहरात हेल्मेट हाताळणे वाहनचालकांना अवघड आहे. महिलांना तर हे हाताळणे अधिकच अवघड जाणार आहे. मॉल अगर शासकीय कार्यालयात हेल्मेट कोठे ठेवायचे हा प्रश्‍न आहे. याचा विचार पोलिस प्रशासनाने करावा.’’ बाबा पार्टे म्हणाले, ‘‘हेल्मेट विक्रीच्या नावाखाली अनेक विक्रेत्यांकडून सध्या लूट सुरू आहे. कारवाईस घाबरून वाहनचालक रस्त्यावरील विक्रेत्यांकडून दर्जाहीन हेल्मेट खरेदी करत आहेत. याबाबतची चौकशी पोलिस प्रशासनाकडून झालेली नाही.’’ 

समितीच्या भूमिका समजून घेतल्यानंतर डॉ. अमृतकर यांनी शहरात हेल्मेट सक्ती १५ जुलैपासून केली जाणार नाही. याबाबतची तारीख पोलिस प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पहिल्यांदा प्रबोधनाची मोहीम प्रशासनाकडून राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीस समितीचे सुनील सावंत, नागेश फराडे, मुकुंद कदम, तानाजी पाटील आणि शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आदी उपस्थित होते. 

प्रबोधनाच्या फलकाबाबत मंडळांना सक्ती करा...
गणेशोत्सवाच्या मंडपाला परवानगी देताना पोलिस प्रशासनाने हेल्मेट बाबतचा एक प्रबोधनात्मक फलक लावण्याची सक्ती करा, त्यास आमची हरकत असणार नाही. प्रत्येक मंडळाच्या दारात उभा करणाऱ्या या फलकामुळे हेल्मेटबाबतचा पोलिस प्रशासनाना प्रबोधनाचा हेतू साध्य होईल असे समितीचे आर. के. पोवार यांनी बैठकीत सुचवले. या चांगल्या सूचनेचे डॉ. अमृतकर यांनी स्वागत केले.

Web Title: kolhapur news helmet compulsory will not be compelled