संयुक्त जुना बुधवारकडूनही हेल्मेट सक्तीला विरोधच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

कोल्हापूर - शहरात दुचाकीवरील प्रवाशांना हेल्मेट सक्तीला सर्वसामान्यांचा विरोध वाढत आहे. यामध्ये आता तालीम संघटनांसह निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांची मोट बांधली जात आहे. सक्तीच कराल तर तीव्र आंदोलन करू, असाही इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर - शहरात दुचाकीवरील प्रवाशांना हेल्मेट सक्तीला सर्वसामान्यांचा विरोध वाढत आहे. यामध्ये आता तालीम संघटनांसह निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांची मोट बांधली जात आहे. सक्तीच कराल तर तीव्र आंदोलन करू, असाही इशारा देण्यात आला आहे.

हेल्मेट सक्ती का नको, याची कारणेही सर्वसामान्यांकडून दिली जात आहेत. पोलिसांकडून एकतर्फी शहरात हेल्मेट सक्ती केली जात असल्याचाही आरोप त्यांच्याकडून होत आहे. शहरातील वाहतूक समस्याच अपघाताचे मूळ कारण आहे. त्यामुळे अपघात टाळायचे असल्यास हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा वाहतुकीला शिस्त लावा, पार्किंगची व्यवस्था करा, असाही सल्ला आता सर्वसामान्यांकडून पोलिसांना दिला जात आहे. शहरातील हेल्मेट सक्तीला विरोध करण्याची प्रसिद्धी पत्रकेही दिली जात आहेत. संयुक्त जुना बुधवार पेठ सेवा भावी संस्थेच्या वतीने हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे. 

यापूर्वीही शहरातील हेल्मेट सक्ती शहरातील नागरिकांनी हाणून पाडला होती, याचीही जाणीव पत्रकाद्वारे पोलिस अधिकाऱ्यांना करून दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी कोल्हापुरातील जनतेची वाहतूक नियम व पार्किंग याबाबत जनजागृती करावी,  असेही सुचविले आहे.

रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची वाहतूक कोंडी कमी करा,पार्किंग स्थळे निश्‍चित करून तेथे चार चाकींचे पार्किेंग करा, यामुळे वाहतुक सुरूळीत होईल. खासगी मालकांची जनावरे शहरात मुक्त संचार करतात त्यांचा बंदोबस्त करा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खासगी बस चालकांमुळे होणारी कोंडी कमी करा, सिग्नलवर शिस्त लावा, रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवा, आवश्‍यक तेथे स्पीड ब्रेकर बसवा असेही सुचविले आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर दिगंबर फराकटे, सचिव सुशील भांदिगरे यांच्यासह इतरांनी हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे.

म्हणून शहरात हेल्मेट सक्ती नको - आनंदराव सुर्यवंशी (निवृत्त उपजिल्हाधिकारी)
शहरात हेल्मेट सक्ती करण्यामागे अपघात हे कारण दिले जात आहे. मात्र महामार्गावर हे कारण योग्य आहे तेथे मोठी-अवजड वाहने मोठ्या प्रमाणात असतात. मृतांची जी आकडेवारी पुढे आली आहे त्यामध्येही सुद्धा मोठ्या वाहनांच्या धडकेतच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. या उलट शहरातील स्थिती असते. हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा पोलिसांनी वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. चेन स्नॅचर पकडून दाखवावेत, मटका, गुंडगिरीला रोखावे. यासाठी पोलिसांनी जास्तीत जास्त वेळ देवून स्वतःचे कतृत्व  दाखवावे. हेल्मेट सक्ती करताना दुचाकीवाहनधारक ते घेवून शहरात फिरू शकत नाहीत ही वस्तूस्थिती पहावी.

शहरात हेल्मेट सक्ती का नको ?
रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वेग मर्यादित असतो
सिग्नलची संख्या अधिक असल्‍याने ठिकठिकाणी थांबावे लागते
पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते.
महामार्गापेक्षा शहरात कमी अपघात होतात.
वाहतूक कोंडीमुळे दुचाकीचा वेग कमीच असतो.

Web Title: kolhapur news Helmets forced to protest against the joint Wednesday