रक्तदाबाला दक्षतेने पळवून लावू

सुधाकर काशीद
गुरुवार, 17 मे 2018

कोल्हापुरात रक्‍तदाबाची गंभीरता जाणून न घेता बिनधास्त वावरणारे लोक खूप आहेत. आणि त्यांनी काळजी घेण्याचीच गरज आहे, अशा शब्दात छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळातील हृदयरोग उपचार विभागाचेप्रमुख डॉ. अक्षय बाफना रुग्णांच्या वागण्यावर आज ‘सकाळ’शी बोलत होते. 

कोल्हापूर - ‘मटण खाऊ नका’ असं सांगितलं की या कोल्हापुरात पेशंटच डॉक्‍टरांना मटणाचे महत्त्व सांगायला सुरवात करतात. दुपारी जेवण झाल्यावर झोपू नका असे सांगितलं की, दुपारी दोन-तीन तास झोपल्याशिवाय जमतच नाही हो !, असे सहजपणे डॉक्‍टरांनाचं सांगतात... पालेभाज्या कडधान्याचा जेवणात वापर करा, असे सांगितलं की असलं सपकं-सपकं काय जेवायचं, असा डॉक्‍टरानांच सवाल करतात. त्यामुळे येथे रक्‍तदाब असलेल्या रुग्णांना समजावून सांगणे खूप अवघड आहे. परिणाम असा की, कोल्हापुरात रक्‍तदाबाची गंभीरता जाणून न घेता बिनधास्त वावरणारे लोक खूप आहेत. आणि त्यांनी काळजी घेण्याचीच गरज आहे, अशा शब्दात छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळातील हृदयरोग उपचार विभागाचेप्रमुख डॉ. अक्षय बाफना रुग्णांच्या वागण्यावर आज ‘सकाळ’शी बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘तसं बघितलं तर कोल्हापूर जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. जिल्ह्यात रक्तदाब असलेल्यांचे प्रमाण कमी आहे. रक्‍तदाब असलेल्या व्यक्‍तीचे प्रमाण २६.२ टक्‍के आहे. रुग्णांना जडलेल्या रक्‍तदाब म्हणजे त्यांनी स्वत:हून ओढवून घेतलेला हा आजार आहे. मटण, तेलकट, तिखट खारट खाणे, वेगवेगळ्या प्रकारची लोणची यावर त्यांचा भर आहे. व्यायामचा अभाव आहे. रोज कमीत कमी ३० मिनिटे फिरायला जा, दुपारी झोपू नका, रात्री कमी जेवण घ्या, रात्रीचे जेवण झाल्यावर दोन तासांनी झोपा, असं सांगितलं तर कोणीही ऐकत नाही. ‘मला काय होतय?’ अशाच अविर्भावात बहुतेकजण वावरतात आणि त्यामुळेच रक्‍तदाबाचे एखाद्या क्षणी शिकार ठरू शकतात. त्यामुळे कोल्हापुरात रक्‍तदाबाबद्दल जागरुकता खूप आवश्‍यक आहे. 

नियमित औषध, व्यायाम, आहारात पालेभाज्या, कडधान्ये, केळी, नारळाचे पाणी, द्राक्षे, जांभूळ, करवंद, सोयाबीन, साय काढलेले दूध, हा आहार घेतला तर रक्तदाब नक्‍की नियंत्रणात येऊ शकतो, तो नियंत्रित ठेवणे आपल्याच हातात आहे. 
- डॉ. अक्षय बाफना,
 हृदयरोग उपचार विभागाचे प्रमुख सीपीआर

 

Web Title: Kolhapur News high Blood Pressure Day Special