कलानगरी, कुस्तीपंढरीच्या अभिमानाचं प्रतीक...!

पॅलेस थिएटर म्हणजेच सध्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. पूर्वी त्याच्यासमोर विस्तीर्ण मैदान होते. आता येथे प्रायव्हेट हायस्कूल, शिवाजी स्टेडियम असो किंवा एकूणच वस्ती वाढली. मात्र, पूर्वी थिएटरसमोरून शाहू मिलचे दिसणारे धुराडे.
पॅलेस थिएटर म्हणजेच सध्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. पूर्वी त्याच्यासमोर विस्तीर्ण मैदान होते. आता येथे प्रायव्हेट हायस्कूल, शिवाजी स्टेडियम असो किंवा एकूणच वस्ती वाढली. मात्र, पूर्वी थिएटरसमोरून शाहू मिलचे दिसणारे धुराडे.

कोट्यवधींचा खर्च - भविष्यात मेंटेनन्सबाबत ठोस धोरण आवश्‍यकच
कोल्हापूर - गुलामगिरीतून शुद्रातिशुद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशी जगभर महाराजांची ओळख. त्याचबरोबरीने ते जगभरात जिथे जिथे फिरले तिथल्या चांगल्या गोष्टी त्यांनी करवीर संस्थानात आणल्या आणि पुढे त्या कोल्हापूरचे भूषण ठरल्या. 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदान ही तर कलानगरी, कुस्तीपंढरी कोल्हापूरच्या अभिमानाची प्रतीकं. हा वारसा जपताना आजवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. आणखी पंधरा  कोटींचा प्रस्ताव तयार आहे. हा खर्च जरुर हा वारसा संवर्धन करण्यासाठी व्हायलाच हवा; मात्र त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेऊन भविष्यातील मेंटेनन्सबाबतचे ठोस धोरणही ठरवणे महत्त्वाचे ठरणार आहे.   
विसाव्या शतकाचे स्वागत करतानाच महाराजांनी रोममधील मैदानांच्या धर्तीवर खासबाग मैदान आणि पुढे तीन वर्षांनी पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) उभारणीला प्रारंभ केला. नाट्यगृहाच्या बांधकामाचा प्रारंभ १९०२ मध्ये झाला आणि १९१५ मध्ये ते पूर्ण झाले. १९५७ मध्ये त्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, असे नामकरण झाले. १९७९ पर्यंत हे नाट्यगृह शासनाच्या ताब्यात होते. त्यानंतर ते महापालिकेकडे आले. १९८० ते ८४ व २००३ ते २००५ या काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले; पण त्यानंतरचे उत्तरायण इतके गाजले की पूर्वीचेच थिएटर बरे, असे म्हणण्याची वेळ आली. खासबाग मैदान आणि नाट्यगृहाच्या शताब्दीचे औचित्य साधून शासनाने भरीव निधी दिला आणि त्यातून नाट्यगृह व मैदानाचे मूळ स्वरूप कायम ठेवून नूतनीकरण व संवर्धनाचा पहिला टप्प्पा नुकताच पूर्ण झाला. दुसरा टप्पा अजूनही निधीच्या प्रतीक्षेत असला तरी आता नाट्यगृह व मैदान खुले झाले आहे. नाट्यगृहाचे सध्याचे काम पाहता ते अत्यंत देखणे आणि सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेच झाले आहे.

फक्त रंगमंचाचा विचार केला तरी त्याची योग्य जपणूक केली, तर किमान शंभर वर्षे त्याला काही होणार नाही, एवढी खात्री देण्यात आली आहे. साऊंड आणि लाईट सिस्टीम्स या सध्याच्या सर्वांत अद्ययावत सिस्टीम्स असून, त्याची किंमत सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांच्या घरात आहे; मात्र ही सारी यंत्रणा अगदी व्यवस्थितपणे सांभाळण्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची (उदा. साऊंड ऑपरेटर, स्टेज असिस्टंट, गार्डनर, हेल्पर) भरती करणे अजूनही महापालिकेला शक्‍य झालेले नसल्यामुळेच गेल्या वर्षभरात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

आपलीही जबाबदारी...!
नाट्यगृह असो किंवा मैदान त्याचे जतन करताना प्रत्येक रसिक आणि क्रीडाप्रेमींचीही काही जबाबदारी आहे. नूतनीकरणानंतर नाट्यगृहासह परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर जरूर आहे. परिसरात थुंकणे, मद्यपान असे अनुचित प्रकार त्यात नक्कीच कैद होतात. नाट्यगृहात कुणी धूम्रपान करण्याचा प्रयत्न केल्यास स्मोक डिटेक्‍टर आणि कुठे शॉर्टसर्किट झालेच तर लगेच अलार्म होणार, अशी यंत्रणा असली तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणेही शक्‍य आहे; पण कारवाईपेक्षा स्वयंशिस्तच महत्त्वाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com