दिशा घराची की समाधानाची...

सुधाकर काशीद
बुधवार, 7 जून 2017

कोल्हापूर - या घराचा प्लॉट त्रिकोणी, त्यात तो पश्‍चिम दक्षिणाभिमुख त्यामुळे प्लॉटची विक्रीच होत नव्हती. असा त्रिकोणी आणि दक्षिणेकडे तोंड करून असलेला प्लॉट म्हणजे, तो राहायला अयोग्य असे, काही ‘वास्तुशास्त्रज्ञांनी’ ठामपणे सांगितलेले. परिणाम असा की, हा एकच प्लॉट वर्षानुवर्षे पडून राहिला. पण यांनी ठरवलं, हाच प्लॉट आपण घ्यायचा आणि तेथे घर बांधून दाखवून हा वास्तुशास्त्राचा नको इतका वाढत असलेला पगडा कमी करायचा आणि त्यांनी या प्लॉटवर घर बांधले. १५ ते २० झाडे लावली. परिसर हिरवागार केला. 

आज आठ वर्षे ते या ठिकाणी सुखासमाधाने राहतात. एवढेच नव्हे तर घरासमोरच्या बागेत २० प्रकारचे पक्षीही राहतात. त्याही पुढे असे की, या आपल्या घरावर त्यांनी एक लघुपट तयार केला आणि हा लघुपट राज्य शासनाच्या वतीने यावर्षी घेतल्या गेलेल्या लघुपट स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.

आर्किटेक्‍ट मिलिंद नार्वेकर यांचे हे घर सुर्वेनगरजवळ बुद्धिहाळकरनगरात आहे. या परिसरात वस्ती वाढत होती; पण ‘अयोग्य दिशेचा’ शिक्का बसल्यामुळे एका प्लॉटची विक्रीच होत नव्हती. नार्वेकर यांनी इतरांचे सल्ले या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले व हा ४३०० चौरस फुटांचा प्लॉट घेतला. त्यावर साधारण ८०० चौरस फुटांचे चिऱ्याचे घर बांधले. स्लॅबवरचा अवास्तव खर्च टाळण्यासाठी ८० टक्के घरावर सिमेंटचे पत्रे घातले. घर बांधून उरलेल्या सर्व जागेवर चेरी, बहावा, कांचन, निलमोहर, गुलमोहर, ताम्हण, शंकासुर, बिट्टी, रातराणी, मोगरा, डाळिंब, सीताफळ, आंबा अशी झाडे लावली. झाडे वाढू लागली आणि या घराच्या आवारात विविध जातीच्या पक्ष्यांची हजेरी लागू लागली.

बुलबुल, दयाळ, वटवट्या, पिवळी चिमणी व हंगामानुसार येणाऱ्या पक्ष्यांचे हे घर म्हणजे हक्काचेच घर ठरले. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने घरात वेगळ्याच समाधानाचे सूर जाणवू लागले. घरासमोरच्या या बागेतील फळे पक्ष्यांनी खाऊन उरली तरच घरात न्यायची, हे ठरून गेले किंवा पक्ष्यांनी अर्धवट खाऊन उरलेली फळे खाण्यातच नार्वेकर कुटुंब आनंदू लागले.

आज आठ वर्षे या घरात मिलिंद नार्वेकर, सौ. स्वप्नाली, कु. निल व कु. निकिता राहतात. खूप चांगले वातावरण त्यांच्या वाट्याला आले आहे. त्यांच्या घरातले शांत, स्वच्छ, हवेशीर व नैसर्गिक प्रकाशाने भारलेले वातावरण पाहून या घराला ‘ग्रीन बिल्डिंग ॲवॉर्ड’ आर्किटेक्‍ट असोसिएशनने दिला आहे. त्यापुढे जाऊन नार्वेकर यांनी आपल्या घरावर ‘पश्‍चिमा’ ही शॉर्ट फिल्म बनवली. घर आणि घराशी जोडला गेलेला निसर्ग ही थीम त्यासाठी राबवली आणि दुसऱ्या क्रमांकाची ती मानकरी ठरली. घर दिशेवर अवलंबून नसते तर घर ताज्यातवान्या मनावर अवलंबून असते ही जाणीवच त्यांनी या निमित्ताने करून दिली.

Web Title: kolhapur news home direction