रुग्णालयांना हवाय औषधांचा ‘डोस’

अजित माद्याळे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

गडहिंग्लज - राज्यासह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम गरीब रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांवर होत असून या रुग्णालयांना लवकरच औषधांचा डोस द्यावा लागणार आहे. अन्यथा या रुग्णालयांना रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

सरकारी दवाखान्यांतील तुटवडा : अन्य रुग्णालयांत शोधावा लागतोय शिल्लक साठा

गडहिंग्लज - राज्यासह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्याचा परिणाम गरीब रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांवर होत असून या रुग्णालयांना लवकरच औषधांचा डोस द्यावा लागणार आहे. अन्यथा या रुग्णालयांना रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. या तुटवड्यावर पर्याय म्हणून जिल्ह्यात ज्या रुग्णालयात साठा शिल्लक आहे, तेथून औषधे मागवण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

सरकारी रुग्णालयातील सेवांबाबत नेहमीच बरी-वाईट चर्चा होत असते. जिल्ह्यातील काही रुग्णालयांचा कारभार चांगलाही आहे; परंतु विविध सेवा-सुविधांच्या तुटवड्यामुळे या दवाखान्यांनाही केवळ शासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही रुग्णालये अपुरे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांमुळे, तर काही दवाखाने सेवा देण्यातील निष्काळजीपणामुळे सलाईनवर आहेत.

जिल्ह्यातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्‍या रुग्णालयांमध्ये बाह्य व आंतररुग्णांची संख्या समाधानकारक आहे. कमी रुग्णसंख्येला सरकारी दवाखान्यांबाबत लोकांमध्ये असलेली मानसिकताही कारणीभूत आहे.

गतवर्षीपासून या रुग्णालयांना औषधांच्या तुटवड्याने हैराण करून सोडले आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना सेवा देण्यात अडथळे येत आहेत. बाहेरील औषधे लिहून दिल्यास सरकारी दवाखान्यात औषधे लिहून देतात काय, असा प्रतिप्रश्‍न रुग्ण करीत आहेत. स्थानिक डॉक्‍टरांना रुग्णांना कशी उत्तरे द्यायची, याची डोकेदुखी आहे. बाह्य व आंतररुग्ण संख्या अधिक असलेल्या दवाखान्यांमध्येच खऱ्या अर्थाने औषधांचा अधिक तुटवडा जाणवत आहे. मागणीपेक्षा कमी औषधांचा पुरवठा होत असल्याने अडचण येत आहे. विशेष करून सर्व प्रकारच्या अँटिबायोटीक गोळ्यांसह शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारा दोरा, सलाईन, कॉटन, ॲन्टी रॅबीज व्हॅक्‍सिन, सलाईनचे सेट आदी साहित्यांचा अधिकाधिक तुटवडा आहे. किरकोळ आजारावरील गोळ्या उपलब्ध असल्या तरी बाह्यरुग्ण संख्या अधिक असल्यास त्याचाही तुटवडा जाणवतो. यामुळे नाईलाजाने विशेष करून शस्त्रक्रियेवेळी औषधे लिहून देण्याची वेळ डॉक्‍टरांवर येत आहे. मध्यंतरी शिवसेनेने या प्रश्‍नावर आवाज उठविला. आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न झाला; परंतु पाठपुराव्यात सातत्य दिसत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्येचेच उदाहरण घेतले, तर महिन्याला सिझेरियनसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची संख्या दोनशेहून अधिक असते. प्रसूतीसाठी आणि विविध आजारांची रुग्णसंख्याही मोठी आहे. सध्या तर बाह्यरुग्णांची संख्या वाढतच असून गेल्या आठवड्यातील एकाच दिवशी पावणे पाचशे बाह्यरुग्णांची नोंद झाली. त्यामुळे येथे औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. औषधे उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसांतच साठा रिकामा होत आहे. यावरूनच इथल्या रुग्णसंख्येचा अंदाज येऊ शकतो. रुग्णालय व्यवस्थापनाला वेळोवेळी प्रासंगिक खरेदी करावी लागत आहे; परंतु त्यातून आवश्‍यक इतका साठा खरेदी करता येत नसल्याने तुटवड्याचा प्रश्‍न जैसे थेच आहे.

महिन्याभरात पुरवठा सुरळीत
शासनाकडून दरवर्षी सरकारी रुग्णालयांना लागणाऱ्या औषधांची खरेदी होत असते; परंतु गतवर्षी शासनाने औषधांची खरेदीच केली नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच औषधांच्या टंचाईत भर पडल्याची चर्चा आहे. ज्या कंपन्यांकडे मागणी नोंदवली आहे, त्यांच्याकडून मुबलक पुरवठा होत नसल्याचे कारणही दिले जात आहे. येत्या एक-दोन महिन्यांत औषधांचा पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज असल्याचे आरोग्य खात्यातील खात्रीलायक सूत्राकडून सांगण्यात आले.

‘डीपीडीसी’तून खरेदी
गतवर्षी औषधे खरेदी नसल्याने वर्षभरात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून औषधे खरेदी करावी लागत आहेत; परंतु यासाठी केवळ दहा लाखांचाच निधी मिळतो. त्यातून गरजेइतकी औषधे उपलब्ध होत नाहीत. मागणीच्या केवळ २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंतच औषधे मिळतात. तसेच स्थानिक रुग्णालयांना वर्षाकाठी मिळणाऱ्या अडीच लाखांच्या निधीतूनही अत्यावश्‍यक वेळी प्रासंगिक खरेदी करता येते. त्यातील दीड लाखांची रक्कम ऑक्‍सिजन, स्पिरीट खरेदीसाठीच लागते. 

Web Title: Kolhapur news hospital needs dose of medicines