झाडाच्या मदतीने सजविले घर

सुधाकर काशीद
बुधवार, 16 मे 2018

वेसरफ (ता. गगनबावडा) या गावी सप्रे यांनी हे घर बांधले आहे. घर म्हणजे चारही बाजूंना भिंती बांधून वातावरणाशी असलेले नाते तोडणे नव्हे, तर घराची रचना अधिकाधिक खुली ठेवून घरालाच निसर्गाचा घटक बनविणे याच हेतूने हे घर बांधले.

कोल्हापूर - घर सजवायचं म्हटलं की चकचकीत फरशी, पडदे, फर्निचर, कृत्रिम फुले, दिव्यांचे झोत याचा वापर करणे हे आता ठरूनच गेले आहे; पण थोडी कल्पकता वापरली तर हे काही न करताही घर कसे सजविता येते, हे शिरीष आणि सुस्मिता सप्रे यांनी दाखवून दिले. वेसरफ येथे घर बांधण्यापूर्वी प्लॉटवर असलेले एक जंगली झाड व एक ओबडधोबड दगड तसाच ठेवून आणि त्या झाडाभोवतीच हॉल बांधून नवा आविष्कार त्यांनी साकारला आहे.

आज या एका झाडामुळे घराचा सारा हॉल सजला आणि निसर्ग जपायचाच ठरविला तर तो छोट्या-छोट्या कृतीतून कसा जपता येतो, याचे तो उदाहरण ठरला आहे. ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष बेरी यांच्या संकल्पनेतून या घराचा आराखडा तयार झाला. 

वेसरफ (ता. गगनबावडा) या गावी सप्रे यांनी हे घर बांधले आहे. घर म्हणजे चारही बाजूंना भिंती बांधून वातावरणाशी असलेले नाते तोडणे नव्हे, तर घराची रचना अधिकाधिक खुली ठेवून घरालाच निसर्गाचा घटक बनविणे याच हेतूने हे घर बांधले. आणि ज्याची खुली जागा आहे, त्याने साधारण अशीच खुली घरे बांधावीत आणि त्यातला आनंद अनुभवावा, अशी श्री. बेरी यांची अपेक्षा आहे. 

वेसरफ येथील हे घर बांधण्यापूर्वी जेव्हा ते प्लॉट पाहायला गेले त्या वेळी प्लॉटच्या मध्येच एक जंगली झाड (केळे) व ओबडधोबड दगड होता. झाड व दगड हा केंद्रबिंदू मानूनच घराचा आराखडा तयार केला गेला व झाड चक्क मध्यभागी ठेवूनच हॉल बांधण्यात आला. या झाडाला प्रकाश मिळावा म्हणून छतावर काच ठेवण्यात आली आणि प्लॉटवरच्या या झाडाची ऐटच वाढली. या ऐटदार झाडाने हॉलला वेगळीच शोभा आणली. आज हॉलमध्ये बसलेल्यांना झाडाखाली बसण्याचा आनंद मिळतो आणि शिरीष बेरी, शिरीष सप्रे, सुस्मिता सप्रे यांना या आनंदाबरोबरच एक झाड वाचविल्याचा अभिमान वाटतो. 

या घराला बांधकामासाठी गावठी वीट व चिरा वापरला आहे. या घराभोवती निसर्ग आहे; पण बंदिस्त घर बांधले असते तर या निसर्गाशी असलेली नाळ तुटली असती. एक रानटी झाडही घराची शोभा कशी वाढवू शकते, हे या घराच्या रचनेतून मी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. 
- शिरीष बेरी,
वास्तुविशारद

Web Title: Kolhapur News house decoration with tree special story

टॅग्स