"बाराईमाम'ने जपला माणुसकीचा वसा! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कोल्हापूर - जात, धर्मापेक्षा माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे, याची प्रचिती येथील बाराईमाम मोहल्ल्यातील मुस्लिम युवकांनी काल पुन्हा दिली. सध्या पवित्र रमजान पर्व सुरू असून या पर्वात त्यांनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. 

कोल्हापूर - जात, धर्मापेक्षा माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे, याची प्रचिती येथील बाराईमाम मोहल्ल्यातील मुस्लिम युवकांनी काल पुन्हा दिली. सध्या पवित्र रमजान पर्व सुरू असून या पर्वात त्यांनी माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. 

बाराईमाम मोहल्ला येथे एकुलत्या एक मुलीसह राहणाऱ्या 70 वर्षांच्या अक्काताई जाधव यांचे काल रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. रात्रीच्या नमाजनंतर मुस्लिम युवक एकत्र बसले होते. त्यावेळी अचेतन आईजवळ एकटीच रडत बसलेल्या या मुलीची माहिती त्यांना मिळाली आणि ते सर्व जण तत्काळ तेथे दाखल झाले. संबंधित मुलीला इतर कोणीच नातेवाईक नाहीत. त्यामुळे ती एकटीच टाहो फोडून रडत होती आणि आता अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्‍न तिच्यापुढे होता. येथे जमलेल्या युवकांनी मग माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांना येथे बोलावून घेतले. आदिल यांच्या पुढाकाराने बाराईमाम भागातील सर्व मुस्लिम युवकांनी एकत्र येऊन अंत्यसंस्काराची तयारी केली. तिरडी बांधण्यापासून अंत्यसंस्कारापर्यंतचे सर्व विधी या मुस्लिम युवकांनीच पूर्ण केले आणि माणुसकीचा वसा जपला. 

रमजान अन्‌ पुण्यकर्म! 
कोल्हापूर आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍य हे एक समीकरणच आहे. इस्लाम धर्माची "इमान', "नमाज', "रोजा', "हज', "जकात' ही पाच प्रमुख मूलतत्त्वे असून रमजानचे रोजे करणे व गोरगरिबांत जकात वाटप करणे धर्माने अनिवार्य (फर्ज) केले आहे. या पार्श्‍वभूमीवर "जकात' वाटपाचे नियोजन आता सर्वत्र सुरू झाले आहे. रमजानचा महिना हा शांततेचा, बरकतीचा, मांगल्याचा, बंधुभावाचा व माणुसकीचा संदेश देणारा आहे. रमजान या शब्दाची फोड अशी की रमा-जान म्हणजे आपले प्राण-जीव-मन देह चांगल्या कामात गुंतविणे. इस्लामी महिन्यांच्या तुलनेत पवित्र रमजान महिन्यात अधिक पुण्यप्राप्ती लाभते, म्हणून जकात रमजान महिन्यात आवर्जून वाटप केली जाते. समाजात आर्थिक समता राहावी, श्रीमंतांना गरिबांविषयी आपुलकी निर्माण होऊन त्यांच्या दुःखाची सदैव जाणीव राहावी, हा जकात वाटपामागील मुख्य उद्देश आहे. मात्र या साऱ्या पार्श्‍वभूमीवरही अक्काताई जाधव यांच्या अंत्यसंस्कारासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार सर्वांनाच प्रेरणादायी ठरला आहे. 

Web Title: kolhapur news Humanity muslim

टॅग्स