हत्ती मेल्याच्या अफवेने आजरा तालुक्यात वनविभागाची धावाधाव... 

रणजित कालेकर
बुधवार, 6 जून 2018

आजरा - येथील चाळोबा जंगलात वावरणारा हत्ती वीज पडून मेल्याची अफवा आजरा शहरात मंगळवारी (ता. 5) संध्याकाळी पसरली. या अफवेमुळे वनविभाग व शासकीय यंत्रणेचे धाबे चांगलेच दणाणले.

आजरा - येथील चाळोबा जंगलात वावरणारा हत्ती वीज पडून मेल्याची अफवा आजरा शहरात मंगळवारी (ता. 5) संध्याकाळी पसरली. या अफवेमुळे वनविभाग व शासकीय यंत्रणेचे धाबे चांगलेच दणाणले. हत्तीच्या शोधात वनविभागाच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर चाळोबा जंगल पालथी घातले; पण हत्तीचा शोध लागला नाही. हत्ती मेल्याची बातमी खोटी असून, तो हाळोली येथे असल्याचे पहाटे समजल्यावर वनविभागाचा जीव भांड्यात पडला. 

मंगळवारी दुपारनंतर आजरा शहर व परिसरात वळवाच्या पावसाने झोडपले. या काळात जोरजोरात विजेचा कडकडाट होत होता. दरम्यान, चाळोबा जंगलात वीज पडल्याची चर्चा शहर परिसरात पसरली. या काळात व्हॉटस्‌ ऍप ग्रुपवर हत्ती मेल्याचा फोटो व्हायरल झाला. या चर्चेला वेगळेच वळण मिळाले. हत्ती मेल्याच्या अफवेने चर्चेला उधाण आले. याबाबत वनविभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अनेकांची विचारणा होऊ लागली. नेमके काय झाले हे माहीत नसल्याने शासकीय यंत्रणेची पाचावर धारण बसली. 

शासकीय यंत्रणेची चक्रे हलली. तातडीने वनविभागाचे पथक चाळोबा जंगलाकडे रवाना झाले. रात्रभर जंगल परिसर पिंजून काढला; पण कोठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही. दमछाक झालेल्या पथकाला सकाळी हत्ती हाळोली येथे असल्याचा सुगावा लागला. अन्‌ पथकातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. याची बातमी वरिष्ठांना देऊन पथकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हाळोली गाठली. तेथे हत्ती येऊन नुकसान करून गेल्याची खात्री झाल्यावर पथक माघारी फिरले. आजऱ्याचे परिक्षेत्र अधिकारी एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. डी. राऊत, सुनील इंगळे, श्री. होगाडे, शिवाजी मटकर व कर्मचारी यांनी शोधमोहिमेत भाग घेतला. 

अन्‌ इकडे केळी, फणसावर ताव 
हत्ती मृत झाल्याची चर्चा सुरू होती, तेव्हा पावसाच्या माऱ्यामुळे हत्ती हाळोली येथे होता. तो काही काळ तुकाराम तावडे यांच्या परसबागेत थांबला. पाऊस थांबल्यावर त्यांने येथील फणस, केळीवर ताव मारला. तो मस्त मजेत फलहार करत होता, तर इकडे वनविभागातील कर्मचारी यांची त्रेधातिरपट उडाली होती. 

हत्तीचा वीज पडून मृत्यू झाल्याची बातमी कळाली आणि आमची धावपळ सुरू झाली. चाळोबा जंगल परिसर अक्षरक्षः पिंजून काढला. रात्रभर डोळ्यात तेल घालून शोधमोहीम घेतली. तो जिवंत असल्याचे समजताच जीव भांड्यात पडला. 
- सुनील इंगळे,
वनरक्षक, आजरा 

हत्तीकडून या परिसरात नुकसानीचे सत्र सुरूच आहे. तो वीज पडून मेल्याची अफवा समजली; पण शेतात रोज नुकसानसत्र सुरूच आहे. हे वनविभागाला सांगितले आहे. 
- लहू पाटील,
शेतकरी, दर्डेवाडी, आजरा. 

Web Title: Kolhapur News humor of Elephant Death in Ajara Taluka