अनधिकृत खोक्‍यांचा शहराला विळखा

सुधाकर काशीद
रविवार, 13 ऑगस्ट 2017

परवानाधारक खोक्‍यात व्यवसाय सुरू ठेवण्यास कोणाचीच हरकत नाही. अनधिकृतपणे खोकी उभे करणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे. पण संघटित विरोध केला जात आहे. टिंबर मार्केटमध्ये रस्त्याकडेला सिमेंटचे बेकायदेशीर कट्टे उभे करून व्यवसाय करण्यापर्यंत काहींची मजल गेली. कारवाईच्या वेळी महिला विक्रेत्यांना पुढे करून विरोध केला गेला.
- पंडित पोवार, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख

संख्या पोचली ५५६ वर - खोकी भाड्याने देण्याचा धंदा तेजीत; मनपाचा विभागही हतबल

कोल्हापूर - कितीही खबरदारी घेतली तरी शहरात एखाद्‌ दुसरे खोके, टपरी उभी राहणार. तेथे अनधिकृत व्यवसाय सुरू होणार, हे गृहीतच आहे. पण गेल्या काही महिन्यांत एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ५५६ खोकी, तीही लोखंडी आणि त्यात आणखी भर अशी की पक्का पाया तयार करून हमरस्त्यावर बसवली गेली आहेत. ही सर्व खोकी विनापरवाना आहेत आणि ही खोकी कुठे, कशी आणि कोणी बसवली याचा अहवालच महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने थेट आयुक्तांपर्यंत पोचवला आहे. काही पदाधिकाऱ्यांचे या खोक्‍यांना असलेले अभय व खोकी काढण्याचा प्रयत्न झाल्यास केला जाणारा सामूहिक विरोध व विरोध करताना मुद्दाम महिला आंदोलकांना पुढे करायच्या पद्धतीमुळे कारवाई थांबली आहे.

त्यातही विशेष हे की खोकी लावणारे बाजूलाच आहेत. त्यांनी परस्पर ही खोकी भाड्याने दिली आहेत. एका नाक्‍यावर उभारलेल्या खोक्‍यांपैकी निम्मी खोकी भाड्याने दिली आहेत. महिना दहा हजार रुपये त्यासाठी भाडे आकारले जात आहे.

वास्तविक परवानाधारक खोक्‍यात किंवा केबिनमध्ये गरजू खोकीधारकानेच परवाना घेऊन व्यवसाय करायचा आहे. पण काहींनी खोकी भाड्याने देण्याचाच व्यवसाय सुरू केला आहे.

शहरात २० वर्षांपूर्वी केबिन वाटपाचा मुद्दा त्यातील गैरव्यवहारामुळे गाजला. काही जागरूक नागरिक न्यायालयात गेले. हॉकर्स झोन तयार करावेत. तेथे जरूर खोकी किंवा टपऱ्यांतून व्यवसाय सुरू व्हावेत. पण सारे शहर किंवा मोक्‍याच्या जागांवर खोकी उभ करू नयेत, अशी त्यांनी याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने महापालिकेला निर्देशही दिले. पण हळूहळू एक एक नवे खोके उभे राहू लागले. त्यांची महापालिकेकडे कसलीही नोंद नाही. बघता बघता ही संख्या ५५६ च्या वर गेली. एवढ्या मोठ्या संख्येने खोकी म्हणजे त्यांची मोठी ताकदही तयार झाली आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेल्या पाहणीत गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या हद्दीत ११९, शिवाजी मार्केट हद्दीत ८२, राजारामपुरी हद्दीत १९० व ताराराणी चौक हद्दीत १०९ खोकी उभी राहिली आहेत. या शिवाय दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या केबिनच्या शेजारी तशाच रचनेची, तशाच रंगाची अनधिकृत खोकी आणून ठेवली आहेत.

गोरगरिबांना दुकानगाळा, दुकानभाडे, फर्निचर, नोकर पगार इत्यादी खर्च झेपत नाही. त्यामुळे खोक्‍यात किंवा टपरीत व्यवसाय करणे अपरिहार्य आहे. पण हा व्यवसाय कोठे करायचा, याचे झोन ठरले आहेत आणि खरोखरच गरजूंनी तेथे कष्ट करून पोट भरणे योग्यच आहे. पण घडते उलटेच आहे. ठराविकांनी या केबिन मिळवल्या आहेत. ते तेथे स्वतः कोणताही धंदा करत नाहीत. त्यांनी या केबिन भाड्याने दिल्या आहेत. भाड्याची रक्कम डोळे दिपवणारी आहे. या केबिनवर कारवाई आवश्‍यक आहे. पण विरोधामुळे सारे थांबले आहे. त्यामुळे आज ५५६ खोकी आहेत. उद्या एक हजार झाली तरी त्यात आश्‍चर्य नसणार आहे.

रात्रीत अनधिकृत खोकी
या अनधिकृत खोक्‍यांत सहा आर.टी.ओ. एजंट, सात बाँडरायटर, शंभरहून अधिक चिकन मंच्युरी, फ्राय मासा, सॅंडवीच याचे व्यवसाय आहेत. ५५६ पैकी काही खोकी बंद आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात एका रात्रीत अशी काही अनधिकृत खोकी लागली आहेत.

Web Title: kolhapur news illegal box in kolhapur