पॉलीप्रॉपीलेन पिशव्यांचा वापरही बेकायदेशीर ठरणार

सुधाकर काशीद
बुधवार, 18 एप्रिल 2018

कोल्हापूर - धड प्लास्टिक नाही आणि धड कापडीही नाही; पण पर्यावरणपूरक पिशवी म्हणून वापर सुरू झालेल्या पॉलीप्रॉपीलेन पिशव्यांचा वापरही बेकायदेशीर ठरणार आहे.

कोल्हापूर - धड प्लास्टिक नाही आणि धड कापडीही नाही; पण पर्यावरणपूरक पिशवी म्हणून वापर सुरू झालेल्या पॉलीप्रॉपीलेन पिशव्यांचा वापरही बेकायदेशीर ठरणार आहे. या प्रकारच्या पिशव्या चालतात म्हणून काही उत्पादकांनी त्या व्यापाऱ्यांना हजारोंच्या संख्येत विकल्या आहेत. व्यापाऱ्यांनीही अशा पिशव्या चालतात की नाही याची माहिती न घेता या पिशव्या ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. लोकांचीही समजूत अशी आहे की, या पिशव्या पर्यावरणपूरक आहेत; पण प्रत्यक्षात या पिशव्या पॉलीप्रॉपीलेन (नॉन ओव्हन) आहेत. त्यामुळे अशा पिशव्यांच्या वापरावरही कारवाई होणार आहे. 

प्लास्टिकबंदी अंमलबजावणीचा पहिला फटका नित्य वापरातील प्लास्टिक पिशव्यावर झाला आहे. शंभर टक्‍के नाही; पण बऱ्यापैकी या पिशव्यांचा वापर कमी झाला आहे. काही ठिकाणी कागदी पिशव्या, काही ठिकाणी कापडी पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. मात्र या जोडीला धड कापडी नाही, अशा पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर चालू झाला आहे. अतिशय हलकी जाळीदार अशी ही पिशवी पर्यावरणपूरक आहे, असे समजून ती वापरली जात आहे.

आपल्यासोबत कापडी पिशवी हा खरोखरच पर्यावरणाला पूरक असा व्यवहार आहे. आम्ही गेले पंधरा दिवस अशा कापडी पिशव्याच वापरत आहे. कापडी पिशवी वापरली नसती तर आमच्याकडून किमान १५ ते २० प्लास्टिक पिशव्या वापरून कचऱ्यात टाकाव्या लागल्या असल्या. त्यामुळे आपली कापडी पिशवी हाच चांगला मार्ग आहे. 
- श्रीकांत औताडे,
नागरिक

अर्थात लोकांना ही पिशवी कशावरून बनवलेली आहे याची शास्त्रीय माहितीच नसल्याने त्या पिशव्यांचा वापर प्लास्टिकला पर्याय म्हणून बिनधास्त सुरू झाला आहे. पण प्रत्यक्षात या पिशव्या पॉलीप्रॉपीलेन आहेत. आणि त्याचा वापर बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र विघटनहित व अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६ अन्वये अशा पॉलीप्रॉपीलेन पिशव्यांचा वापरही कारवाईस पात्र ठरणार आहे. या पिशव्यांचा वापरच नव्हे तर त्याचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात-निर्यात व वाहतूक यालाही प्लास्टिकबंदी कायद्यानुसार बंदी आहे. 

प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून पूर्ण कापडी किंवा कागदी पिशवी हाच पर्याय आहे. पॉलीप्रॉपीलेन पिशवी पर्यावरणपूरक नाही; पण काही विक्रेते पूर्ण माहिती न घेता अशा पिशव्यांचा व्यवहारात उपयोग करत आहेत. अशा पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे, हे स्पष्ट आहे. 
- डॉ. विजय पाटील, 

   मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका 

 

Web Title: Kolhapur News illegal to use polypropylene bags