अनधिकृत प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास

अनधिकृत प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास

अकरावी प्रवेश - तीन टक्के राखीव जागेसाठी क्रीडा कार्यालयाकडून हवे प्रमाणपत्र

कोल्हापूर - पाच नव्हे पंचवीस प्रमाणपत्रे असूनही ती केवळ मान्यताप्राप्त संघटना अथवा जिल्हा क्रीडा कार्यालयाने घेतलेल्या स्पर्धेची नसल्याने विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. अकरावी प्रवेशासाठी राखीव तीन टक्‍क्‍यांतील जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी प्रमाणपत्रेच अनधिकृत ठरू लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना पश्‍चात्ताप होऊ लागला आहे. 

इंडियन ऑलिंपिक असोसिएशनशी संलग्नित राज्यस्तरीय संघटनांकडून खेळाडू खेळला नसल्यास काय घडू शकते, याचा अनुभव पालकांना येऊ लागला आहे. 

एखादी क्रीडा संघटना मान्यताप्राप्त आहे की नाही, याचा विचार न करता पालक पाल्याला संघटनेत प्रशिक्षणासाठी पाठवितो. बघता बघता पाल्यसुद्धा मेडलच्या राशीच्या राशी घरी आणतो. एखाद्या उपक्रमात सहभागी होतो आणि तो उपक्रम एक ‘जागतिक’ उपक्रम असल्याचे संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. भविष्यात पाल्याने मिळविलेल्या पदके व प्रमाणपत्रांमुळे त्याला नोकरी मिळेल, याची शाश्‍वती पालकांना मिळते, मात्र त्यांचा असा काही भ्रमनिरास होतो, की मिळालेली सर्व प्रमाणपत्रांची किंमतच शून्य होते. हा अनुभव आता अनेक पालकांना व विद्यार्थ्यांना येऊ लागला आहे. 

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी तीन टक्के जागा राखीव आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालय अथवा इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या संलग्नित मान्यताप्राप्त संघटनांतर्फे आयोजित क्रीडा स्पर्धांत जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेला खेळाडू असेल तर तो या जागांसाठी पात्र ठरतो. 

विभागस्तरावर पदक विजेता तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेला खेळाडूलाही या जागांवर प्रवेश दिला जातो. त्यासाठी त्याला जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून अकरावी प्रवेशासाठीचे प्रमाणपत्र दिले जाते, असे प्रमाणपत्र घेण्यासाठी क्रीडा कार्यालयाकडे रोज खेळाडूंची ये-जा सुरू आहे. एखाद्या शाळेने, क्‍लबने अथवा मान्यताप्राप्त नसलेल्या संघटनेने घेतलेल्या स्पर्धेतील प्रमाणपत्र घेऊन ते क्रीडा कार्यालयाकडे प्रवेशासाठीच्या प्रमाणपत्रांची मागणी करू लागले आहेत. 

मात्र, संघटना मान्यताप्राप्त नसल्याचे लक्षात येताच, त्यांचा हिरमोड होऊ लागला आहे. क्रीडा कार्यालयाच्या शालेयस्तरीय, महिला ग्रामीण स्पर्धांत सहभागी होण्याचे महत्त्व काय असते, याचा अनुभव ते घेऊ लागले आहेत.

अधिकृत क्रीडा प्रकारांची माहिती घ्यावी 
काही क्रीडा संघटनांचे प्रशिक्षणाचे शुल्क पालकांच्या खिशाला परवडणारे नसते, तरीही पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करता ते शुल्क देत असतात. विशेष म्हणजे संघटनांकडूनच क्रीडा साहित्य खरेदी करतात; पण जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे कोणती संघटना अथवा कोणता क्रीडा प्रकार अधिकृत आहे, याची माहिती घेण्यात टाळाटाळ करतात आणि त्याचाच फटका त्यांना बसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com