१५ लाख टन साखर उत्पादन वाढले

राजकुमार चौगुले
सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर - राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजापेक्षा १५ लाख टन साखरेचे जादा उत्पादन झाले. केंद्र, राज्य पातळीवर प्रलंबित असणाऱ्या निर्णयाचा फटका आता पुढील हंगामात बसण्याची शक्‍यता आहे. साखरेचे दर वाढत नसल्याने राज्यातील कारखान्यांची पुढील हंगामातही किमान ‘एफआरपी’ रक्कम देताना कसरतच होणार आहे. 

कोल्हापूर - राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजापेक्षा १५ लाख टन साखरेचे जादा उत्पादन झाले. केंद्र, राज्य पातळीवर प्रलंबित असणाऱ्या निर्णयाचा फटका आता पुढील हंगामात बसण्याची शक्‍यता आहे. साखरेचे दर वाढत नसल्याने राज्यातील कारखान्यांची पुढील हंगामातही किमान ‘एफआरपी’ रक्कम देताना कसरतच होणार आहे. 

राज्यात सध्या गळीत हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात आहे. कमी क्षमतेचे कारखाने बंद होत आहेत. कारखाने बंद होतानाही कारखान्याकडे पुरेशी रक्कम नसल्याने उत्पादकांची बाकी ठेवूनच कारखाने बंद होत आहेत.

ऊस पळवापळवीची स्पर्धा नाही
यंदा ऊस तोडणी कामगार कमी आले. त्यातच साखरेच्या दरात स्थिरता नसल्याने कार्यक्षेत्र सोडून कारखान्यांनी ऊस नेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ऊस पळवापळवीची स्पर्धा जाणवली नाही. स्वतःकडे नोंदणी केलेल्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठीच कारखाने झगडत असल्याचे दृश्‍य ऊस पट्ट्यात आहे.

याबाबतीत धोरणात्मक निर्णय न झाल्यास थकबाकीचे हे भिजत घोंगडे पुढील हंगामापर्यंत कायम राहण्याची भीती आहे. ज्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात झाली, त्या ऊस उत्पादकांना प्रामुख्याने कारखान्याची थकबाकी लवकर मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. साखरेच्या उत्पादनात व दर देण्यात आघाडीवर असणाऱ्या कारखान्यांचीच अवस्था केविलवाणी झाल्याने राज्यातील इतर भागांतही कारखाने आणि उत्पादकांची अवस्था बिकट आहे.

मार्चच्या पहिल्या सप्ताहाअखेर ७७९ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून ८७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. सुरुवातीच्या अंदाजानुसार या कालावधीपर्यंत ६५० लाख टन उसाचे गाळप होऊन, त्यातून ७२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज होता.

अंदाजानुसार सुमारे १५ लाख टन साखर जादा प्रमाणात तयार झाली. यात पुन्हा वाढच होण्याची शक्‍यता आहे. हंगाम संपेपर्यंत अंदाजापेक्षा ४० लाख टन साखरेचे जादा उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्ययक्त केला. पुढील हंगामातही उसाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने अतिरिक्त साखर साठा ही कारखान्यांची डोकेदुखी बनण्याची शक्‍यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

Web Title: Kolhapur News increase in 15 lakh tonn Sugar Production