वाढीव वस्त्यांची जबाबदारी कोणाची?

सुनील पाटील
बुधवार, 13 जून 2018

कोल्हापूर - शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असणारे वडणगे (ता. करवीर) गाव सर्वार्थाने मोठे आहे. रस्ते, गटारी तसेच इतर सुविधा शहराप्रमाणेच आहेत. ग्रामपंचायतींकडून गावठाणच्या वस्त्यांसाठी सर्व सुविधा दिल्या जात आहेत. पण, गावठाणाबाहेर वाढणाऱ्या वस्त्यांना पाणीपुरवठा, वीज व रस्ते कोण देणार, असे प्रश्‍न प्राधिकरणाच्या निमित्ताने समोर येत आहेत.

कोल्हापूर - शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असणारे वडणगे (ता. करवीर) गाव सर्वार्थाने मोठे आहे. रस्ते, गटारी तसेच इतर सुविधा शहराप्रमाणेच आहेत. ग्रामपंचायतींकडून गावठाणच्या वस्त्यांसाठी सर्व सुविधा दिल्या जात आहेत. पण, गावठाणाबाहेर वाढणाऱ्या वस्त्यांना पाणीपुरवठा, वीज व रस्ते कोण देणार, असे प्रश्‍न प्राधिकरणाच्या निमित्ताने समोर येत आहेत.

या प्रश्‍नांची उत्तरे ग्रामपंचायतीकडेही नाहीत आणि प्राधिकरणाकडूनही सांगितली जात नाहीत. एकूण या गावात प्राधिकरणाबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, ‘‘गावचा विस्तार मोठा असून, चांगल्या सुविधाही आहेत. शहरातील सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे वडणगे हे हद्दवाढीत नको म्हणून आम्ही विरोध केला होता. दरम्यान, प्राधिकरणाची घोषणा झाली. सहा महिने उलटले तरीही याबाबतची ठोस भूमिका काय आहे, हे समजलेले नाही. प्राधिकरणातही शहराप्रमाणेच कर आकारले जाणार काय, अशी भीती आहे. 

बांधकाम परवाने मिळविताना ग्रामस्थांना खूपच त्रास होत आहे. प्रत्येक गावाला सध्या निधी मिळत आहे. त्यानुसार कामही होत आहेत. प्राधिकरणाची नेमकी भूमिका काय असणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सध्या गावात २० हजार लोकांना पुरेल एवढे पाण्याचे नियोजन करण्यात आले. भविष्यात या लोकसंख्येतही वाढ होणार आहे. याचे नियोजन कोण करणार, याची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. याशिवाय, वडणगे गावाबाहेर म्हणजे गावठाणाबाहेर वस्ती वाढत आहे. या वस्तीचा भार ग्रामपंचायतीने सहन करायचा की प्राधिकरण स्वतः पुढाकार घेणार, हे एकदा जाहीर होणे अपेक्षित आहे. नाहीतर हद्दवाढ नको म्हणून प्राधिकरण स्वीकारले आहे. आणि प्राधिकरणामुळेही ग्रामस्थ आतबट्ट्यात येत असतील तर आम्हाला विचार करावा लागणार आहे.’’ 

उपसरपंच सचिन पाटील म्हणाले, ‘‘प्राधिकरण म्हणजे काय, हे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ४२ गावांमध्ये जाऊन गावसभेसमोर स्पष्ट केले पाहिजे. प्राधिकरणामुळे गावे कशी सुधारणार, याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. गावठाणाबाहेर असणाऱ्या वाढीव वस्त्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या वस्त्यांसाठी किती निधी असणार, याबाबतचेही मार्गदर्शन झाले पाहिजे.’’ 

वैशिष्ट्ये : 

  •  शहरापासून सगळ्यात जवळ असणारे गाव. 
  •  नागरी वस्तीप्रमाणेच राहणीमान. 
  •  करवीरमधील राजकारणातील महत्त्वाचे गाव
Web Title: Kolhapur News increase in corporation border limit