गांधीनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र महिला कक्ष सुरू

राजेश मोरे
बुधवार, 20 जून 2018

कोल्हापूर - बंदोबस्त, ठाणे अंमलदार, रात्रपाळीचे कर्तव्य बजावताना महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. परंतु गांधीनगर पोलिस ठाण्यात सर्व सुविधांयुक्त अद्ययावत असे जिल्ह्यातील पहिले ‘महिला विश्रांतीगृह’ सुरू झाल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर - बंदोबस्त, ठाणे अंमलदार, रात्रपाळीचे कर्तव्य बजावताना महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. परंतु गांधीनगर पोलिस ठाण्यात सर्व सुविधांयुक्त अद्ययावत असे जिल्ह्यातील पहिले ‘महिला विश्रांतीगृह’ सुरू झाल्याने महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

महिला पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त, ठाणे अंमलदार, वायरलेस, कधी निर्भया पथक, कधी छेडछाडविरोधी पथक अशा विविध जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. कायदा सुव्यवस्थेच्या काळात दिवसरात्र काम करावे लागते. अशा महिला पोलिसांची कर्तव्य बजावताना गैरसोय होते.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, प्रसाधनगृहाची कमतरता आहे. खुद्द अद्ययावत पोलिस मुख्यालयातही स्वतंत्र महिला कक्षाची उणीव भासते. आपत्कालीन स्थितीत मुख्यालयासह परजिल्ह्यांतून, राज्यातून येणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही याचा सामना करावा लागतो. स्वतंत्र विश्रांतीगृहाच्या अभावामुळे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवघडून कर्तव्य बजवावे लागते. महिलांच्या रक्षणासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी गांधीनगर ठाण्याने एक पाऊल पुढे टाकले.

सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार महिलांसाठी विश्रांती कक्षाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला. तो तातडीने मंजूर करून घेतला. शासन निधीतून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून १४ लाखांचा अद्ययावत स्वतंत्र कक्ष उभारला. पोलिस ठाण्यासमोर स्वतंत्र इमारतीत हा कक्ष आहे. अशा प्रकारचा प्रयोग इचलकरंजीतील शिवाजीनगर ठाण्यातही सुरू झाला आहे. 

जिल्ह्यातील पोलिस ठाण्याची स्थिती 

  • पोलिस ठाणी - ३१
  • महिला कर्मचारी - ३३२ हून अधिक 

महिला विश्रांतीगृहातील सुविधा ः 

  • पोलिस ठाण्यापासून १५० फुटांवर कक्ष
  • दोन स्वतंत्र खोल्या
  • राहण्याची सोय
  • पाण्याची सुविधा 
  • प्रसाधनगृहे
  • सीसीटीव्हीचा वॉच

पोलिस ठाण्यात सुरू झालेल्या महिला विश्रांती कक्षामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाने हे काम शक्‍य झाले.
- सुशांत चव्हाण,
सहायक पोलिस निरीक्षक गांधीनगर.

Web Title: Kolhapur News independent women cell in Gandhinagar police station