डॉ. इरफान हबीब यांच्या पुस्तकावर बंदी घाला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे लिखाण असलेल्या डॉ. इरफान हबीब लिखित "द अग्रेरियन सिस्टिम ऑफ मुगल इंडिया' (1556-1707) पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी शिवभक्‍त लोक आंदोलन समितीतर्फे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत केली. डॉ. हबीब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे लिखाण असलेल्या डॉ. इरफान हबीब लिखित "द अग्रेरियन सिस्टिम ऑफ मुगल इंडिया' (1556-1707) पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी शिवभक्‍त लोक आंदोलन समितीतर्फे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत केली. डॉ. हबीब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

श्री. सावंत म्हणाले, ""डॉ. हबीब यांनी अलिगढ विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले असून, त्यांनी ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आहे. त्यांनी "द अग्रेरियन सिस्टिम ऑफ मुगल इंडिया' हे पुस्तक 1963 ला प्रसिद्ध केले. त्यानंतर या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. पुस्तकातील चुकांसंदर्भात दुरुस्ती करण्याबाबत त्यांना डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी सांगितले होते; मात्र या चुका दुरुस्त करण्यात आलेल्या नाहीत. अनेक विद्यापीठांत त्यांचे हे पुस्तक अभ्यासक्रमास आहे. मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करताना हे पुस्तक संदर्भ म्हणून वाचले जाण्याची शक्‍यताही आहे. पुस्तकातील 400 ते 405 पानांवर "मराठाज' या शीर्षकाखाली खोडसाळ लिखाण झाले आहे. महाराणी ताराबाई व चित्पावन ब्राह्मण समाजाच्या विरोधातही चुकीचे लिखाण आहे.'' 

ते म्हणाले, ""छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचे हित चिंतले. त्यांच्या उपलब्ध पत्रांत शेतकऱ्यांविषयीची तळमळ दिसून येते. असे असताना शिवरायांची शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. पुस्तकात ते शेतकऱ्यांना "नेकेड स्टार्व्हड रास्कल्स' असे म्हणत असत. तसेच मराठे फक्‍त लुटीवरच जगत असत. शिवाजी महाराजांचे म्हणणे असे, की "जर लूट नाही तर पगार नाही', असा मजकूर आहे. त्यातून छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचा इतिहास प्रसारित होणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने देशासह जगभरातील महाविद्यालयांतील इतिहास विभागांना पत्र पाठवून डॉ. हबीब यांचे हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून घेऊ नये, अशी विनंती करावी.'' डॉ. हबीब यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

श्री. मुळीक म्हणाले, ""शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवणे, असा आदेश सैन्याला दिला होता. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोड्या, धान्य, बी-बियाणे, नांगर देऊन आधार दिला होता. त्यांच्या सैन्यात तर सर्वच शेतकरी होते. त्यांना योग्य वेतन दिले जात होते. या संदर्भातील अनेक पुरावे शिवरायांच्या पत्रात उपलब्ध आहेत. त्यांना शेतकऱ्यांचा, जनतेचा राजा म्हणून गौरविले जाते.'' पत्रकार परिषदेस शैलजा भोसले, हर्षल सुर्वे, किरण चव्हाण, अजित सासने, महादेव पाटील, अवधूत पाटील, शिरीष जाधव, इंद्रजित माने, प्रकाश पाटील, उत्तम जाधव, गणी आजरेकर, मंजित माने, तसेच दत्तकुमार खंडागळे उपस्थित होते. 

विद्यापीठाकडून प्रतिसाद नाही 
विद्यापीठात छत्रपती शिवरायांबद्दलची संदर्भ साधने उपलब्ध आहेत. त्याविषयी अभ्यास व्हावा, अशी आमची इच्छा आहे. तसे विद्यापीठ प्रशासनाला कळविले होते; पण अद्याप त्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यानंतर या संदर्भ साधनांचा कुणी अभ्यास केलेला नाही, असे श्री. सावंत यांनी सांगितले. विद्यापीठात विशेष कक्ष स्थापन करण्याविषयी सांगूनही त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे श्री. मुळीक यांनी स्पष्ट केले. 

Web Title: kolhapur news Inderjit Sawant and Vasantrao Mulik